Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

कर्मचारी वर्गाअभावी संगमेश्वर दूरध्वनी केंद्रालाही टाळे ठोकण्याची वेळ
संगमेश्वर, ६ मार्च/वार्ताहर

 

संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भारत संचार निगमच्या संगमेश्वर येथील दूरध्वनी केंद्रास अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी टाळे ठोकण्याची वेळ आली असून, या कारभारात सुधारणा न झाल्यास येथील दूरध्वनी केंद्रावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय ग्राहकांनी घेतला आहे.
संपूर्ण तालुक्याचे नियंत्रण संगमेश्वर येथील दूरध्वनी केंद्रातून केले जाते. देवरुख येथील मुख्य दूरध्वनी केंद्रासह अन्य छोटी आठ दूरध्वनी केंद्रे व संगमेश्वरच्या आजूबाजूच्या गावांमधील १० दूरध्वनी केंद्रे अशा एकूण २० दूरध्वनी केंद्रांचा कारभार संगमेश्वर येथून पाहिला जातो. मात्र या दृष्टीने आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग येथे उपलब्ध नसल्याने संपूर्ण कारभाराच ठप्प पडण्याची वेळ निर्माण झाली आहे.
येथील दूरध्वनी केंद्रावरील जबाबदारी पाहता येथे किमान एक उपमंडल अभियंता, तीन कनिष्ठ अभियंता, दोन तंत्रज्ञ, तीन क्लार्क, सात लाइनमन असा किमान १६ जणांचा कर्मचारीवर्ग असणे आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये केवळ आठ कर्मचारी कार्यरत असून यांना कामाचा गाडा ओढणे केवळ अशक्य होत आहे.
संगमेश्वर दूरध्वनी केंद्रातील एक कनिष्ठ अभियंता आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन गेले, तर दुसऱ्या कनिष्ठ अभियंत्याची सातारा येथे बदली झाली. संगमेश्वर येथे मुळातच एक कनिष्ठ अभियंता कमी असताना दुसऱ्या एकमेव अभियंत्याची बदली कशी करण्यात आली, असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे.
सध्या संगमेश्वर दूरध्वनी केंद्रात एकही कनिष्ठ अभियंता कार्यरत नसून, या दोन्ही जागा गेले अनेक महिने रिक्त असून, तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दूरध्वनी केंद्राची अशी स्थिती करण्यास भारत संचार निगमचे वरिष्ठ अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
दूरध्वनी बिलांसह सर्व प्रकारच्या डिमांड नोटस् भरून घेण्यासाठी संगमेश्वर दूरध्वनी केंद्रात एक कक्ष नव्याने सुरू करण्यात आला आहे, मात्र यासाठी स्वतंत्र कर्मचारी देण्याऐवजी उपमंडल अभियंत्यांच्या लेखनिकाकडेच ही जबाबदारी देण्यात आल्याने आता त्यांच्या कार्यालयातील कामे रखडली आहेत. संगमेश्वर दूरध्वनी केंद्रासाठी आवश्यक असणारे तीन कनिष्ठ अभियंता, एक लेखनिक व आवश्यक लाइनमन वेळीच न दिल्यास शेकडो ग्राहक या दूरध्वनी केंद्रावर मोर्चा आणतील, असा इशारा देण्यात आला आहे.