Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

नऊ महिन्यात सहा गटशिक्षणाधिकारी बदलले
चिपळूण, ६ मार्च/वार्ताहर

 

येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला जणू ग्रहणच लागले आहे. शिक्षक संघटनांमधील राजकीय वादामुळे येथील शिक्षण विषय जिल्हा परिषदेलाच डोकेदुखीचा ठरत आहे. या वादामुळे येथे अवघ्या नऊ महिन्यांत सहा गटशिक्षणाधिकाऱ्यांची बदली झाली असून, केसरकर यांनी सातवे शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असून, ते प्रभारी कार्यभार पाहणार आहेत.
या शिक्षण विभागातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पदवीधर प्राथमिक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, केंद्रप्रमुख संघटना या संघटना महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या विरोधात आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापासून सदस्यांपर्यंत तर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत या वादाने राजकीय वळण घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हा राजकीय वाद ठरत आहे.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बाबतीत तक्रारी वाढू लागल्याने तसेच त्यांच्याबाबतीत नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असल्याने चिपळूण तालुक्यात हे पद अद्याप प्रभारीच राहिले आहे. गटशिक्षणाधिकारी एस. जी. सवादकर यांनी ३१ मे ०८ रोजी येथील गटशिक्षणाधिकारी पदभार सोडल्यानंतर ए. पी. कांबळे, यू. जी. कोळी, शिगवण, सुभेदार, जोशी आदींनी हा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली. वर्षभरात येथे एकूण सात प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.