Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिकांची पेन्शन रुपये ३५०० करावी’
सावंतवाडी, ६ मार्च/वार्ताहर

 

महाराष्ट्र शासनाने दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना किमान रुपये ३५०० पेन्शन करावी, असा ठराव इंडियन एक्स सव्‍‌र्हिसेस लीग महाराष्ट्रच्या कार्यकारिणीत करण्यात आला. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना सादर करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
इंडियन एक्स सव्‍‌र्हिसेस लीग महाराष्ट्रच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबई येथे महाराष्ट्राचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.
सहाव्या वेतन आयोगाचा फरक अनेक माजी सैनिकांना स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे अद्याप देण्यात न आल्याचे नागपूर येथील कार्यकारिणी सदस्य वानखेडे यांनी सांगितले. यावेळी अध्यक्षांनी एस. बी. आय.च्या पेन्शन सेलशी त्वरित संपर्क साधला असता काही माजी सैनिकांच्या वेतनाच्या तफावतीमुळे व संगणक तांत्रिक दोषामुळे काही अडचणी निर्माण झालेल्या असून चालू महिन्यात माजी सैनिकांना फरक अदा करण्यात येईल, असे एस. बी. आय.कडून यावेळी सांगण्यात आले.
गार्ड ट्रेनिंग सेंटरसाठी आवश्यक ती परवानगी आता मिळाली असून त्यामुळे आय. ई. एम. एल.चा कर्जत प्रकल्प लवकरच मार्गी लागेल व आय. ई. एस. एल.मार्फत सर्व जिल्हा केंद्राच्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड प्रशिक्षण केंद्र चालू करण्यात येतील. दहा वर्षे सेवा झालेल्या व सेवेतून परत आलेल्या माजी सैनिकांना प्रोराटा पेन्शन मिळण्यासाठी संघटनेतर्फे दिल्ली हायकोर्टामध्ये केस दाखल करण्यात आलेली होती. त्यापैकी ३० नेव्ही जवानांच्या बाजूने निकाल लागला असून केस मंजूर झाली. आर्मी व एअरफोर्सच्या ९२ लोकांचे अपील सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी दिली.