Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘स्लमडॉग’फेम आयुषचा उद्या नागरी सत्कार
रत्नागिरी, ६ मार्च/खास प्रतिनिधी

 

यंदाच्या वर्षी ‘ऑस्कर’ पुरस्कारांची खैरात झालेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील बालकलाकार आयुष खेडेकर याचा येत्या रविवारी (८ मार्च) येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
जयहिंद प्रतिष्ठानतर्फे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाबाबत माहिती देताना आमदार उदय सामंत यांनी सांगितले की, मूळचा रत्नागिरीचा असलेला आयुष होळीच्या सणासाठी येथील परटवणे भागातील त्याच्या घरी येणार आहे. ‘स्लमडॉग’मध्ये छोटय़ा जमालची आयुषने साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली. रत्नागिरीच्या नावलौकिकामध्ये त्याच्या या कामगिरीने भर पडली आहे, म्हणून येत्या रविवारी आयुषचा खास नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमामध्ये ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ स्पर्धेतील उपविजेता प्रथमेश लघाटे यालाही गौरविण्यात येणार आहे.
नऊ वर्षांंचा आयुष आपल्या आई-वडिलांसह मुंबईला भाईंदर येथे राहतो. त्याची आई सायली खेडेकर शिक्षिका असून, वडील महेश खेडेकर बॉम्बे मोटर्स या कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. त्यांचे मूळ घर परटवणे भागातील खेडेकरवाडीमध्ये असून, आयुषचे आजी-आजोबा येथे राहतात. गणेशोत्सव आणि होळीच्या सणाला खेडेकर कुटुंबीय येथे येतात. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर आयुषसह त्याचे आई-वडील प्रथमच रत्नागिरीमध्ये येत असल्यामुळे खेडेकरवाडीत उत्साहाचे वातावरण आहे.