Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अशक्य नाही’
डहाणू, ६ मार्च/वार्ताहर

 

मानवता हा धर्म ठेवून कार्य केल्यास ते यशस्वी ठरते. समाजातील समस्यांचे ओझे कमी करण्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. इच्छाशक्ती असेल, तर जगात कोणतेही काम अशक्य नाही, असे प्रतिपादन वाणगाव ता. डहाणू येथील वि.म. पाटील कृषी प्रतिष्ठानच्या इमारतीच्या कोनशिला समारंभप्रसंगी अध्यक्षीय भाषणात सिप्टम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गावित यांनी केले.
याप्रसंगी पालघर येथील डॉ. ढवळे मेमोरियल ट्रस्टचे संचालक डॉ. तिवारी, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश (बाबा) जोशी, स्लमडॉग चित्रपटातील कलाकार सौरभ शुक्ला, वसंत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
वि.म. पाटील कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
ठाणे जिल्ह्यातील लोक शेती, वीट, रेती, माती इत्यादी नैसर्गिक बाबींवर अवलंबून असून, यापुढे शेतीशिवाय पर्याय राहणार नाही. शेती हाच धंदा सुरक्षित असल्याने मिलिंद पाटील यांनी कृषी प्रतिष्ठान बांधण्याचे स्तुत्य काम हाती घेतले. त्याचबरोबर समाजातील लोकांना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने त्यांनी स्वत:च्या पैशातून रुग्णवाहिका घेतली. ही रुग्णवाहिका आज लोकार्पण करण्यात येत असल्याचे राजेंद्र गावित यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी स्लमडॉग चित्रपटातील कलाकार सौरभ शुक्ला याच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली, तर निसर्गशेती कशी करायची, या विषयावर माजी शिक्षक रामचंद्र राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गांधले (जिल्हाधिकारी), प्रकाश बांगर, राजा भानुशाली, संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र दातार, गणेश पाटील, प्राचार्य (कृ. महाविद्यालय) अक्षय पाटील, रुग्णवाहिका प्रमुख उपस्थित होते.