Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

श्रीरामपूर काँग्रेसमधील गटबाजी निकाली
श्रीरामपूर, ६ मार्च/प्रतिनिधी

आमदार गोविंदराव आदिक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, काँग्रेसअंतर्गत गटबाजीही निकाली निघाली आहे!
सन १९८०मध्ये माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी आदिकांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला. त्यानंतर दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू होता. सन १९८५मध्ये आदिक काँग्रेसमध्ये आले. त्या काळातही मुरकुटेंबरोबर त्यांचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू राहिला. सन ८५पासून आदिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला. त्या काळात मुरकुटे हे पवारांचे समर्थक राहिले. जनता दल, अपक्ष, तसेच शिवसेनेत मुरकुटे गेले. नंतर पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले. परंतु आदिकांच्या विरोधात पवारांनी पक्ष न बघता मुरकुटेंना कधी छुपी, तर कधी उघड मदत केली. मुरकुटेंनी आदिकांवर जहरी टीका केली. त्यांच्या समर्थकांना चोप दिला. दोघांमधील कटुता सतत वाढतच राहिली.
मुरकुटेंच्या पराभवासाठी ९९मध्ये आदिकांनी आमदार जयंत ससाणे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. ससाणे निवडून आले. पाच वर्षे दोघे एकत्र होते. परंतु २००४च्या विधानसभा निवडणुकीत आदिकांना राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळत असेल, तर निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मुरकुटे यांनी दिला. ससाणेंनी आदिकांना विरोध केला आणि खासदार बाळासाहेब विखे यांच्याशी उघड युती करून त्यांचे नेतृत्व मान्य केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपासून आदिक-ससाणे हे काँग्रेसमध्ये असूनही दोघांमध्ये राजकीय संघर्ष राहिला. मुरकुटे-आदिक एकत्र आले.
विधानसभा निवडणुकीत मुरकुटे हे विरोधी पक्षाचे उमेदवार असूनही त्यांना आदिकसमर्थकांनी विरोध केला. परंतु आदिकांना जाहीर विरोध करता आला नाही. विखे यांच्या साथीने ससाणे यांनी आदिकांच्या विरोधात पक्षीय पातळीवर हायकमांडकडे आघाडी उघडली. आदिक यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये मुरकुटे यांना मदत केली. अशोक कारखाना निवडणुकीत ससाणेंच्या मंडळाचा पराभव झाला. त्यास आदिकांचा हातभार लागला.
स्थानिक पातळीवर आदिक-मुरकुटे युती असली, तरी दोघांचे पक्ष वेगवेगळे होते. मात्र, आता दोघे एकाच पक्षाच्या व्यासपीठावर येत आहेत. आदिकसमर्थकांची बैठक येत्या सोमवारी (दि. ९) होत असून, आता दोघांच्याही समर्थकांची एकत्रित बैठक मंगळवारी (दि. १०) होणार आहे. आदिक-मुरकुटे युतीचे नवे पर्व तयार झाले आहे. आज काँग्रेसभवनमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे व आदिकांमध्ये चर्चा झाली, तसेच भानुदास मुरकुटे यांच्याशी त्यांची चर्चा झाली.
पक्षांतर्गत वादामुळे ससाणे यांना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मदत केली. त्यांच्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदाची मुदत संपलेली असूनही मुदतवाढ मिळवून दिली. आदिक यांनी पक्षनेतृत्वाला लक्ष्य केले असताना ससाणे सावध होते. पक्षांतरानंतरही ते मौन बाळगून होते. आरोप-प्रत्यारोपांच्या धुळवडीत त्यांनी भाग घेतला नाही. आदिक पक्षात असताना त्यांच्यावर टीकाही त्यांनी कधी केली नाही. आदिकांच्या पक्षत्यागानंतर त्यांचे समर्थक सचिन गुजर, राजन भल्ला, संजय छल्लारे हे मोजके कार्यकर्ते आदिकांवर टीका करीत होते. मात्र, जिल्ह्य़ाच्या राजकारणात दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांच्या टीकेचा फारसा गांभीर्याने विचार केला गेला नाही.
पूर्वी काँग्रेसला दोन तालुकाध्यक्ष होते. एल. पी. थोरात हे आदिकसमर्थक, तर अरुण नाईक ससाणेसमर्थक होते. जिल्हाध्यक्ष विनायक देशमुख हे आदिकांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांच्याशी ससाणे यांचे मतभेद होते. आता देशमुख व थोरात राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यामुळे पक्षाला नाईक हे एकमेव तालुकाध्यक्ष राहिले आहेत. पक्षाची सारी सूत्रे ससाणेंकडे आल्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी संपून पक्षाची तालुक्यात ससाणेंच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू झाली आहे.
ससाणे यांची जिल्ह्य़ाच्या राजकारणात विखेंशी मैत्री असली, तरी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. माजी मुख्यमंत्री देशमुखांनी त्यांना आदिकांना शह देण्यासाठी मदत केली. परंतु आता आदिक पक्षात नसल्याने देशमुखांकडून किती प्रतिसाद मिळतो, हे काळ ठरविणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या निवडीच्या वेळी ससाणे यांनी देशमुखांचा सल्ला मानला होता.
आता काँग्रेसअंतर्गत संघर्षांत ससाणेंना उघड भूमिका घ्यावी लागणार असून, देशमुख किंवा मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तसेच जिल्ह्य़ात विखे की थोरात या दोघांपैकी एकाची साथ घ्यावी लागेल. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव झाला आहे. ससाणेंचा विधान परिषदेवर डोळा आहे.