Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

निवडणूक अधिकाऱ्यांच्या तंबीमुळे माळवाडगावला महापूजेचा कार्यक्रम रद्द!
माळवाडगाव, ६ मार्च/वार्ताहर

 

सत्यनारायण महापूजा काय? साधा नारळदेखील फोडण्यात येऊ नये, अशी तंबी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळाल्याने आज माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत सत्यनारायण महापूजा कार्यक्रम रद्द करावा लागला.
माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत अपूर्ण बांधकामामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली. मुख्य बांधकाम उत्कृष्ट झाले असले, तरी अंतर्गत रस्ते, पाण्याची टाकी, शौचालय, प्रवेशद्वार ही कामे अर्धवट असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबा घेण्यास नकार दिला होता.
हा वाद संपविण्यासाठी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माधवी राणे यांना तुमच्या पातळीवर सत्यनारायण महापूजा करून ताबा घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले.
आज सकाळी हार-फुले, पूजासाहित्य आले असतानाच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत श्रीरामपूरच्या तहसीलदारांनी ‘आचारसंहिता काळात आपणास नारळदेखील फोडता येणार नाही’, अशा सूचना दिल्याने या सत्यनारायण महापूजा साहित्याचा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गाशा गुंडाळावा लागला.
सत्यनारायण कार्यक्रम रद्द झाला असला, तरी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशानुसार गाजावाजा न करता जुन्या इमारतीमधून नवीन इमारतीत सामान आणण्यात येऊन कामकाज, रुग्णतपासणी मात्र सुरू करण्यात येणार आहे.