Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘संतांचे विचार आचरणात आणल्यास जगात शांतता’
पाथर्डी, ६ मार्च/वार्ताहर

 

संतविचारांचे आचरण केल्यास जगात शांतता निर्माण होईल, असे मत जैन साध्वी प्रतिभाकंवरमहाराज यांनी व्यक्त केले.
होळी चातुर्मासानिमित्त प्रतिभाकंवर यांचे बारा शिष्यांसह आज सकाळी शहरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरात स्वागत कमानी लावण्यात आल्या होत्या. पाथर्डीच्या कन्या असलेल्या सुविधीजीमहाराज दीक्षा घेतल्यानंतर प्रथमच पाथर्डीत आल्याने शहरात उत्साहाचे वातावरण होते.
जैन स्थानकात प्रतिभाकंवर यांचे प्रवचन झाले. गेल्या काही वषार्ंपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहाणारे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे प्रवचनास आवर्जून उपस्थित होते.
या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, आनंदऋषी, महंमद पैगंबर दिलेली शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावयास हवी. संपूर्ण विश्वाला शांती, अहिंसा व दयेचा मंत्र महावीरस्वामींनी दिला. या मंत्राच्या आधारावर प्रत्येकाने वाटचाल केल्यास प्रत्येकाचे जीवन कृतार्थ होईल.
पाथर्डी तालुका ही संतांची भूमी असून आनंदऋषीमहाराजांच्या जन्माने ही भूमी पावन झाली आहे. या भूमीची ओढ असल्याने आपण पुन्हा एकदा आलो आहोत. पाथर्डीची कन्या सुविधा विद्वान व व्यासंगी असून त्यांचे वक्तृत्व मनाला भिडणारे आहे.
ढाकणे म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक नागरिक आनंदऋषींच्या विचारांचा वारसा जपणारा आहे. केवळ जैनधर्मीयच नाही, तर प्रत्येक धर्मातील माणसाला त्यांनी आपले मानले. धर्मप्रसारकच खरे समाजाचे रक्षक व मार्गदर्शक आहेत. पाथर्डीची कन्या साध्वी होऊन येथे आली, याचा खूप आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
या वेळी नगराध्यक्षा रंजना गर्जे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, काँग्रेस गटनेते बंडू बोरुडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रामनाथ बंग, माजी नगराध्यक्ष हिंदकुमार औटी, सुभाष घोडके, श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश गुगळे, तर आभार सुनील गांधी यांनी मानले.