Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

कुंभार समाजाचा उद्या तेरमध्ये राज्यस्तरीय मेळावा
जामखेड, ६ मार्च/वार्ताहर

 

कुंभार समाजाचा एन. टी.मध्ये समावेश करण्याबरोबरच संत शिरोमणी गोरोबाकाका नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी तेर (जिल्हा उस्मानाबाद) येथे रविवारी (दि. ८) ११ वाजता राज्यव्यापी कुंभार समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुंभार समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव राऊत यांनी दिली.
संत गोरोबा कुंभार यांचे तेर (जिल्हा उस्मानाबाद) जन्मगाव आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, अर्थमंत्री दिलीप वळसे, गृहमंत्री जयंत पाटील, शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री पतंगराव कदम, समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते, राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील, आमदार सदाशिव लोखंडे, वदशास्त्री पांडुरंगशास्त्री देशमुख, संतपीठाचे पीठाचार्य प्रकाशमहाराज बोधले आदींसह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कुंभार समाज महासंघाचे पदाधिकारी सुरेशराव हिरे यांच्या अध्यक्षतेखाली हा राज्यव्यापी मेळावा होत आहे. राज्यभरातून ५० हजारांवर समाजबांधव उपस्थित राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
विधान परिषदेवर कुंभार समाजाचा प्रतिनिधी घेण्यात यावा, समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या संत गोरोबा कुंभार यांचे जन्मगाव असलेल्या तेर या गावाचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करावा आदी प्रमुख मागण्या या मेळाव्यात करण्यात येणार आहेत.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी नगर जिल्हा कुंभार समाज सेवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घोत आहेत. मेळाव्यासंदर्भात अधिक माहितीसाठी विनायक राऊत ९४२२२२२२०६ व ९२२६१३१५७५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.