Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

निवडणूक आयोगाने स्थगिती देऊनही श्रीगोंदे तहसीलदारपद रिक्तच!
श्रीगोंदे, ६ मार्च/वार्ताहर

 

येथील तहसीलदार राजेंद्र थोटे यांच्या बदलीला निवडणूक आयोगाने स्थगिती देऊनही त्यांनी शिरपूर (जि. धुळे) येथील पदभार स्वीकारल्याने मोठय़ा तांत्रिक अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या जागेवर घाईघाईने पंडित शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. थोटे यांच्या बदलीला स्थगिती मिळाल्याने शिंदे यांना पदभार न स्वीकारताच परतावे लागले.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याअगोदर जिल्ह्य़ातील महसूल यंत्रणेत राज्य सरकारने मोठे फेरफार करीत महत्त्वाच्या तहसीलदारांच्या बदल्या केल्या होत्या. यात ५ महिन्यांपूर्वी येथे आलेले थोटे यांचाही या बदलीत समावेश होता. शिरपूर (जि. धुळे) येथे त्यांची बदली झाली. थोडय़ा कालावधीत कामातून त्यांनी छाप पाडल्याने सोपानराव कासार यांच्यानंतर सक्षम तहसीलदार तालुक्याला मिळाला, अशी भावना जनतेची झाली होती. मात्र, सरकारच्या फतव्याने त्यांना जावे लागले. दरम्यानच्या काळात या बदल्यांना थेट निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. तोपर्यंत थोटे यांनी शिरपूरमधील पदभार स्वीकारला होता.
स्थगिती आदेश येण्यापूर्वी दोन महिन्यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या एका तहसीलदारांची येथे जवळपास नियुक्ती झाली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेपानंतर ती नियुक्तीही रखडली व नाशिक येथील शिंदे यांच्या नियुक्तीचा आदेश झाला. शिंदे पदभार स्वीकारण्यासाठी येथे आले. मात्र, स्थगितीमुळे त्यांना हे पद स्वीकारता आले नाही. परिणामी निवासी नायब तहसीलदार सुरेश कोळी यांच्याकडे तात्पुरता पदभार आहे. आता तांत्रिक कोंडीत लोकसभा निवडणुकीत नवीन तहसीलदार येतो की कोळी यांच्याकडेच हा पदभार राहतो, याविषयी उत्सुकता आहे.