Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

शिर्डीची पाणीपुरवठा योजना प्राधिकरण, ठेकेदारामुळे रखडली - शेळके
राहाता, ६ मार्च/वार्ताहर

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे शिर्डीची पाणीपुरवठा योजना रेंगाळली आहे. येत्या दहा दिवसांत ही योजना कार्यान्वित न झाल्यास रास्ता रोको करून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा शिर्डी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी दिला आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे की, सन २००४ साली शिर्डीसाठी १५.८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस सरकारने मंजुरी दिली. त्यानुसार जीवन प्राधिकरण विभागामार्फत या योजनेचे काम सुरू करण्यात आले. मात्र, हे काम चार वर्षे उलटून गेले, तरी अपूर्णच आहे. काम तातडीने पूर्ण होण्यासाठी जलसंपदामंत्री अजित पवार व पालकमंत्री दिलीप वळसे यांनी यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन जीवन प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदारास ६ जानेवारी २००९ रोजी उद्घाटनाची तारीख निश्चित करण्याची सूचना दिली होती. मात्र, त्यानंतरही कामात प्रगती झाली नाही.
त्यानंतर २४ जानेवारी रोजी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी शिर्डीत बैठक व कामाचा आढावा घेऊन जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना २० फेब्रुवारी २००९पर्यंत योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वास्तविक ही योजना मार्च २००८पर्यंत कार्यान्वित होणे गरजेचे होते. मात्र, प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदारामुळे ती पूर्णत्वास जात नसल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे.
सध्या साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, जलशुद्धीकरण यंत्रणेचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, वितरणाचे काम कामगार व मशिनरीअभावी अर्धवट अवस्थेत आहे. शिर्डीत सध्या पाणीटंचाई सुरू आहे. उन्हाळ्यात या योजनेपासून पाणी मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे काम गतीने करण्यासाठी शेळके यांनी आग्रह धरला आहे.