Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी चार उमेदवारांचे पाच अर्ज
राहाता, ६ मार्च/वार्ताहर

 

शिर्डी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चारच्या २५ मार्च रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आजअखेर चारजणांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.
प्रभाग क्रमांक चार हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे. प्रभाग क्रमांक तेरामधून अलकाताई शेजवळ या अनुसूचित जातीच्या जागेवर निवडून आलेल्या असल्याने नगराध्यक्षपदाच्या अद्याप त्या एकमेव दावेदार होत्या. मात्र, प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक विष्णू थोरात यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन रिक्त झालेल्या या जागेवर आता आपली पत्नी जयश्री थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय नगराध्यक्षपदाबरोबर संस्थानचे विश्वस्तपद बोनसमध्ये मिळत असल्याने या निवडणुकीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. कालच विष्णू थोरात यांनी समर्थकांसह येऊन आपल्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना सत्ताधारी आघाडीचे छुपे समर्थन असल्याची उघड चर्चा आहे.
जयश्री विषणू थोरात यांच्याशिवाय उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये किशोर किसन चव्हाण, शैला किशोर चव्हाण व वनीता बाबासाहेब माडेकर यांचा समावेश आहे. वनीता माडेकर या गेल्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेरामधून थोडय़ा मतांनी पराभूत झाल्या होत्या.
उद्या अजार्ंची छानणी होणार आहे. ९ मार्च ते १३ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असून १४ मार्च रोजी चिन्हवाटप होऊन २५ मार्च रोजी निवडणूक होत आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी गुलाबराव खरात व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत खोसे काम बघत आहेत.