Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

शिक्षणव्यवस्थेत बदल आवश्यक - पवार
पारनेर, ६ मार्च/वार्ताहर

 

भारताचा अष्टपैलू नागरिक घडविण्यासाठी शिक्षणव्यवस्थेत मोठे बदल आवश्यक आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पोपट पवार यांनी केले. टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील संपदा प्रतिष्ठान संचलित आदर्श अध्यापक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच रावसाहेब झावरे होते. व्यासपीठावर नवोदयचे प्राचार्य आर. आर. खंदारे, तालुका कृषी अधिकारी विलास गोसावी, रावसाहेब रोहोकले, शिक्षक युवानेते अनिल पारधी, तात्या हिरवे, साहेबराव वाफारे, बबनराव झावरे, सुधाकर थोरात आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले की, राष्ट्रपुरुषांचे विचार माणसाला आदर्श बनवितात. भविष्यकाळात शेतीसमोर अनेक आव्हाने असल्याने शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश करावा. सरकारी योजनेवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतच काहीतरी करावे. लहान वयातच चांगले संस्कार देणारी शिक्षणपद्धती अंमलात आणण्याची गरज आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाज एकत्रिकरणाचे काम करावे लागेल.
ज्ञानदेव वाफारे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात समाजविकासाचा आदर्शवाद जपला पाहिजे. या वेळी रावसाहेब झावरे, प्राचार्य खंदारे यांचीही भाषणे झाली.