Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
राज्य

नोंदणी व मुद्रांक विभागाने गमावले ‘आयएसओ’ प्रमाणपत्र
सुनील कडूसकर
पुणे, ६ मार्च

आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविणारे पहिले सरकारी खाते अशी शेखी मिरविणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाला आता हे बिरुद मिरविता येणार नाही. कार्यपद्धतीच्या प्रमाणीकरणासाठी देण्यात येणारे ‘आयएसओ ९००१- २०००’ हे प्रमाणपत्र आपल्या अकार्यक्षम कार्यपद्धतीमुळेच गमाविण्याची वेळ या खात्यावर आली आहे. राज्याचे तत्कालीन नोंदणी महानिरीक्षक डॉ. नितीन करीर यांच्या प्रयत्नातून जर्मनीच्या ‘टीयूव्ही साऊथ एशिया’ या संस्थेकडून नोंदणी व मुद्रांक विभागाने हे प्रमाणपत्र मिळविले होते.

नाशिक पालिकेच्या कारभाऱ्यांकडूनच पूररेषा आखणीत बाधा
नाशिक, ६ मार्च / खास प्रतिनिधी

गंगा गोदावरीच्या किनाऱ्यालगत वास्तव्यास असलेल्या लाखो रहिवाशांच्या अस्तित्वाबाबत सुस्पष्ट दिशादर्शन करणाऱ्या ‘पूर नियंत्रण रेषा’ आखणीचे काम नाशिक महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा रखडले आहे. पाटबंधारे खात्याबरोबर या कामाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करणे अन् तब्बल ५० लाखाचा निधी उपलब्ध करून देणे एवढीच प्रक्रिया बाकी असताना पालिकेचे कारभारी नेमके येथेच खोळंबले व आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची सबब पुढे करून हात वर करायलाही मोकळे झाले.

सुरेश प्रभूंची उमेदवारी निश्चित!
खास प्रतिनिधी
रत्नागिरी, ६ मार्च

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजप-सेना युतीतर्फे शिवसेनेचे विद्यमान खासदार सुरेश प्रभू यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जात आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव डॉ. नीलेश राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असली तरी अजून तसे ठोस संकेत पक्षश्रेष्ठींकडून मिळालेले नाहीत.

शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदीच्या किमतीतच परत करण्याचे सूर्या रोशनी कंपनीस आदेश
जयंत धुळप
अलिबाग, ६ मार्च

सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीने अलिबाग तालुक्यांतील वाघविरा, चिखलीखार आणि हेमनगर या गांवांतील शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या शेतजमिनी, खरेदीच्या मूळ किमतीतच शेतकऱ्यांना परत कराव्यात, असा ऐतिहासिक अंतिम आदेश रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी रामदास खडतरे यांनी दिला आहे.

चादर कारखान्यास आग लागून ५० लाखांची हानी
सोलापूर, ६ मार्च/प्रतिनिधी

अशोक चौक परिसरात एका जेकॉर्ड चादर कारखान्यास अचानकपणे आग लागून घडलेल्या दुर्घटनेत संपूर्ण कारखाना भस्मसात झाला. यात सुमारे ५० लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर आग आटोक्यात आणायला महापालिकेच्या अग्शिामक दलास बरेच प्रयत्न करावे लागले.दत्तात्रेय राघवलू गोली यांच्या मालकीच्या या चादर कारखान्याच्या पाठीमागील बाजूस प्रथम आग लागली. त्यावेळी कारखान्यातील कामगार व रखवालदार कारखान्याच्या समोरील बाजूस विश्रांती घेत होते. आगीमुळे मोठय़ा प्रमाणात धूर येत असल्याचे लक्षात येताच त्याची माहिती महापालिकेच्या अग्शिामक दलास कळविण्यात आली. त्यानुसार काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान पाण्याच्या बंबांसह घटनास्थळी धावून आले. तब्बल १५ पाण्याचे बंब व काही खासगी पाणी टँकर्सचा वापर करुन पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली गेली. शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा कयास आहे. या आगीत कारखान्यातील प्रोसेसिंग युनिट, २५ यंत्रमाग, सुताच्या गाठी, तयार चादरी आदी सर्व माल जळून खाक झाल्याचे दिसून आले.

लोणावळ्यात इंद्रायणी नदीपात्र स्वच्छता उपक्रम
लोणावळा, ६ मार्च/वार्ताहर

‘इंद्रायणीचे उगमस्थान हे तीर्थस्थान व्हावे,’ ही इच्छा मनात बाळगून ज्येष्ठ युवक व युवती संघाने परिसरात नदीपात्र स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे. ही स्वच्छता मोहीम राबवून १२ मार्च या तुकाराम बिजेच्या दिवशी याठिकाणी भजन-कीर्तन, नदी पूजेचे आयोजन करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर , तुकाराम महाराज यांच्या जीवनगाथेची साथ देणारी पवित्र इंद्रायणी जिने संत तुकारामाचे अभंग तेरा दिवस उराशी बाळगले त्या इंद्रायणीची लोणावळा या उगमनस्थानी अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. पात्रात सर्वत्र ड्रेनेजचे पाणी व सांड पाणी, कचरा टाकला जात असल्याने तिचे पावित्र्य नष्ट होत तिच्या दुगर्ंधीने अनेक साथीचे रोग आज पसरत आहेत. नदीपात्राला सर्वत्र पाणगवताने वेढल्याने नदीपात्रात या गवताचे गालीचे पसरले आहेत, तर आळंदीपासून लोणावळ्यापर्यंत अनेक धनदांडग्यांनी तिच्या पात्रात अनधिकृत बांधकाम करत तिचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न चालवला आहे. शासनाने या पवित्र इंद्रायणीचे पावित्र्य व अस्तित्व टिकविण्याकरिता या सर्व घटकांवर कारवाई करण्याची मागणी समाजात जोर धरत आहे.

‘शंकरराव खरात यांच्या नावाचा गैरवापर करू नये’
पुणे, ६ मार्च/ प्रतिनिधी

निवडणुकीच्या संदर्भात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या नावाचा गैरवापर करू नये, असे आवाहन डॉ. खरात यांच्या पत्नी डॉ. शकुंतला खरात यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अशा वेळी थोर साहित्यिक आणि मानवतावादी डॉ. शंकरराव खरात यांच्या नावाचा मोह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. परंतु अनेकांनी आग्रह केल्यानंतर कधीही डॉ. खरात हे निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले नव्हते. त्यांनी आपली राजकारणाची मानवतावादी व सामाजिक समतेच्या आग्रहाची भूमिका कायम राखली होती. अशा परिस्थितीत कोणीही राजकारणासाठी त्यांच्या नावाचा वापर करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाहनाच्या धडकेने काळवीट ठार
अकोला, ६ मार्च/ प्रतिनिधी

वाहनाच्या धडकेने काळवीट ठार झाल्याची घटना अकोटफैलजवळील पाचमोरी येथे गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. वन खात्याने मृत काळवीट ताब्यात घेतले आहे. दोन वर्षांचे काळवीट रस्त्याने जात असताना त्याला वाहनाची धडक लागली. त्यात काळवीट जागीच ठार झाले. या अपघातानंतर वाहनचालक पसार झाला.

निवडणूक ओळखपत्रांचे काम अपूर्ण; ठेकेदारावर कारवाई करणार
रत्नागिरी, ६ मार्च/खास प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांची निवडणूक ओळखपत्रे तयार करण्याचे काम अपूर्ण राहिले असून त्याबद्दल संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांनी आज येथे जाहीर केले. देशातील लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानुसार आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गायकवाड म्हणाले की, जिल्ह्यातील सुमारे ६५ टक्के मतदारांची ओळखपत्रे तयार झाली असून त्यांचे वाटपही सुरू आहे, पण सुमारे ३५ टक्के मतदारांची ओळखपत्रे अजून तयार होऊ शकलेली नाहीत. त्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देऊन काम पूर्ण करण्याची संधी ठेकेदाराला देण्यात आली होती. तरीसुद्धा सर्व मतदारांची ओळखपत्रे तयार होऊ शकलेली नाहीत. म्हणून संबंधित ठेकेदारांविरुद्ध कामामध्ये हलगर्जीपणा केल्याबद्दल कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मंदिरात चोरी करणारा अट्टल चोरटा गजाआड
संगमेश्वर, ६ मार्च/वार्ताहर

कसबा वाडा ठिकाण या गावातील नागेश्वर मंदिरामधील ३० हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या अट्टल चोरटय़ास संगमेश्वर पोलिसांनी काही तासांत मोठय़ा शिताफीने गजाआड केले आहे.
याबाबतची फिर्याद वाडा कसबा गावचे पोलीस पाटील दत्ताराम कृष्णा निवळकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे. निवळकर हे नागेश्वर मंदिराजवळ लागलेला वणवा पाहण्यासाठी गेले असता त्यांना मंदिराचा मागील दरवाजा उघडा दिसला. ते मंदिरात गेले असता त्यांना मंदिरातील साहित्याची चोरी झाल्याचे आढळले. त्यांनी याबाबत ग्रामस्थांना कल्पना दिली. नंतर ग्रामस्थांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे ए.एस.आय. पातेरे, हे. कॉ. नागले, मिलिंद चव्हाण, संतोष झापडेकर, राजू सावंत आदी घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी मंदिराची पाहणी करून सदरचा चोरटा स्थानिक असावा, असा निष्कर्ष काढून आजूबाजूच्या जंगलाची झडती घेतली. तेव्हा आरोपी हरिश्चंद्र गुरव (२२), रा. फणसवणे, गुरववाडी हा मंदिरातील मुद्देमालासह पोलिसांना सापडला. गुरव याने चांदीच्या दोन नागमूर्ती, एक चांदीची बैठक, तांब्या, पितळी घंटा, ताम्हण आदी साहित्य मंदिरातून लांबविल्याची कबुली पोलिसांजवळ दिली. गुरव हा परिसरात अट्टल चोरटा म्हणूनच कुप्रसिद्ध आहे.

शिवजयंतीची मिरवणूक रेंगाळण्यास शिवसेना कारणीभूत - मनसे
नगर, ६ मार्च/प्रतिनिधी

शिवजयंतीची मिरवणूक रेंगाळण्यास शिवसेना कारणीभूत असल्याने पोलिसांनी संबंधितांना समज द्यावी, तसेच मनसेला रात्री बारापर्यंत मिरवणूक काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा मनसेतर्फे करण्यात आली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १३ला शिवजयंती असून, मनसे गेल्या तीन वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात शिवजयंती साजरी करते. यावर्षीही शहरात मनसेतर्फे मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्यावी.शिवसेना मिरवणुकीचे नियम पाळत नाही. त्यांच्या दिरंगाईमुळे अनेक रथ, देखावे जनतेला पाहवयास मिळत नाहीत. त्यामुळे नागरिक व कार्यकर्त्यांत नाराजी असून, तणावही निर्माण होतो, असे निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी शिवसेनेला नियोजित वेळेत बाहेर पडण्यास सांगावे अशी मागणीही करण्यात आली. यावेळी मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ, नगरसेवक किशोर डागवाले, कैलास गिरवले, जिल्हाध्यक्ष आनंदा शेळके, शहराध्यक्ष सतीश मैड, वकील अनिता दिघे, डॉ. अमित पवार, राजू मंगलारप आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते बापूसाहेब देशमुख यांचा सोमवारी अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार
राशीन, ६ मार्च/वार्ताहर
ज्येष्ठ नेते बापूसाहेब देशमुख यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त येत्या सोमवारी (दि. ९) दुपारी १ वाजता कर्जत येथे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते व पालकमंत्री दिलीप वळसे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, पणनमंत्री हर्षवर्धन पाटील, शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह खासदार बाळासाहेब विखे, तुकाराम गडाख, माजी मंत्री बाबूराव बारस्कर, माजी खासदार शंकरराव काळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले, आमदार यशवंतराव गडाख, मधुकरराव पिचड, गोविंदराव आदिक, नरेंद्र घुले, सदाशिव लोखंडे, राजीव राजळे, जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, माजी मंत्री दिलीप गांधी आदी उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी ‘अमृतधारा’ या गौरव अंकाचे प्रकाशन श्री. देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन देशमुख अमृतमहोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष रामभाऊ धांडे, कार्याध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, राजेंद्र फाळके यांनी केले आहे.

पवारांच्या मेळाव्यास जामखेडचे १० हजार कार्यकर्ते येणार
जामखेड, ६ मार्च/वार्ताहर

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत १५ मार्च रोजी होणाऱ्या मेळाव्यास तालुक्यातून १० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी दिली. नगर येथे पाथर्डीचे आमदार राजीव राजळे यांच्या पक्षप्रवेशाबरोबरच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त जामखेड येथे झालेल्या बैठकीत श्री. कोठारी यांनी वरील माहिती दिली. बैठकीस जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, संदीप वर्पे, र्मचट बँकेचे अध्यक्ष दिलीप बाफना, तालुका दूध संघाचे अध्यक्ष तुषार पवार, पंचायत समितीचे सदस्य विजयसिंह गोलेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, सुभाष जायभाय उपस्थित होते.