Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
क्रीडा

वरुणराजा हातपाय पसरी!
भारत-न्यूझीलंड दुसऱ्या लढतीवर पावसाने पाणी फेरले
वेलिंग्टन, ६ मार्च / पीटीआय
न्यूझीलंडविरुद्ध आज चौखुर उधळलेला भारतीय संघाचा रथ संततधार पावसामुळे वेस्टपॅक स्टेडियमवर थांबला आणि तेथेच उभय संघातील दुसरी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढत पंचांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच या दिवस/रात्र लढतीवर पावसाचा वरचष्मा होता. एकूण तीनवेळा या लढतीत पावासाचा व्यत्यय निर्माण झाला. मात्र, ५० षटकांची ही लढत प्रत्येकी ३४ षटकांची करण्यात आल्यानंतरही ती पूर्ण होऊ शकली नाही.भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर या अनुभवी जोडीने न्यूझीलंड गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या फटकेबाजीस प्रारंभ केला होता.

सचिनला सूर गवसल्यामुळे धोनी खूश
वेलिंग्टन, ६ मार्च/वृत्तसंस्था

आजचा सामना पावसामुळे रद्द झाला असला तरी सचिन तेंडुलकरला गवसलेला सूर ही आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केली आहे. सचिनने आजच्या लढतीत ६९ चेंडूत ६१ धावा काढल्या. तसेच वीरेंद्र सेहवागबरोबर सलामीच्या जोडीसाठी ७६ धावांची भागीदारी केली. धोनी म्हणाला की, सचिनला सूर गवसणे ही संघाच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. सलामीच्या जोम्डीने चांगली सुरुवात करून दिली तर मधल्या फळीतील फलंदाजांवर दडपण येत नाही. ते आपला नैसर्गिक खेळ करू शकतात.

सेहवागचा धसका घेतलाय -व्हेटोरी
वेलिंग्टन, ६ मार्च/वृत्तसंस्था

आमच्या गोलंदाजांनी वीरेंद्र सेहवागच्या फलंदाजीचा धसका घेतला आहे, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार डॅनिअल व्हेटोरी याने आजचा सामना रद्द झाल्यानंतर व्यक्त केली.
व्हेटोरी म्हणाला की, आम्ही जे डावपेच आखलेले असतात ते सेहवाग अक्षरश: उधळून लावतो. आपल्या इच्छेप्रमाणे तो कोणत्याही गोलंदाजाला कसेही फटकावू शकतो. त्याची आजची २६ चेंडूंतील ५४ धावांची खेळी खरोखरच स्फोटक होती. या खेळीने आमचे सारे डावपेच उधळून लावले गेले. अशा फलंदाजापुढे गोलंदाजांना हतबल होण्याखेरीज काहीही करता येत नाही.

ह्य़ुजेस-कॅटीचच्या शतकांनी ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात
दरबान, ६ मार्च / ए. एफ. पी.

फिल ह्य़ुजेस (११५) आणि सायमन कॅटीच (१०८) या सलामीवीरांनी केलेल्या दमदार शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने येथील दुसऱ्या क्रिकेट कसोटीत ७० षटकांच्या खेळानंतर ३ बाद २६६ अशी दमदार मजल मारली आहे. नाणेफेकीचा कौल अनुकूल लागताच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ह्य़ुजेस-कॅटिच या जोडीने १८४ धावांची सलामी देताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलाच घाम गाळायला लावला. केवळ ७१ चेंडूत अर्धशतकी मजल मारणाऱ्या या जोडीने ३८ व्या षटकांत संघाचे दीडशतक फलकावर लावले.

आयपीएल सुरक्षा व्यवस्थेबाबत संघांच्या मालकांनाही काळजी!
विनायक दळवी
मुंबई, ६ मार्च

भारतात होणाऱ्या निवडणुकांदरम्यान आयपीएल क्रिकेट सामन्यांना सुरक्षा देणे जिकीरीचे असेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट करण्याआधीच आयपीएलच्या ‘फ्रॅन्चायझीं’नी यंदाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत काळजी व्यक्त केली होती. गोव्यात झालेल्या ‘फ्रॅन्चायझीं’च्या बैठकीत गतवर्षीच्या स्पर्धेतील सुरक्षा व्यवस्था अत्यंत ढिसाळ होती असे मत सर्वच संघाच्या मालकांनी व्यक्त केले होते. म्हणूनच दक्षिण आफ्रिकेच्या स्टेन स्पोर्ट्स सिक्युरिटी मॅनेजमेण्ट या कंपनीकडे यंदा सुरक्षा व्यवस्था सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

‘हाय-प्रोफाईल’ आयपीएलच्या लढती नागपुरात
उदय रंगनाथ
नागपूर, ६ मार्च

लोकसभा निवडणूक तारखांच्या दिवशी सामने आयोजित न करण्यासह सुरक्षेच्या मुद्यावरून नव्या स्थळांवर सामने आयोजित करण्याचा तोडगा निघाल्यानंतर ‘हाय-प्रोफाईल’ इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल) स्थळ म्हणून नागपूर केंद्र निश्चित झाले. या स्पर्धेचा नवा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असला तरी त्यात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपुरातील जामठा स्टेडियमवर स्पर्धेतील लढती आयोजित करण्यावर आज मुंबईत शिक्कामोर्तब करण्यात आले.

इंग्लंडची सावध; पण आश्वासक सुरुवात
त्रिनिदाद, ६ मार्च / वृत्तसंस्था

वेस्ट इंडिजविरुद्धची पाच कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका बरोबरीत राखण्यासाठी आजपासून सुरू झालेल्या पाचव्या व अंतिम कसोटीत विजयाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय पुढे नसलेल्या इंग्लंडने पहिल्या दिवसाच्या खेळाची सुरुवात काहीशी संथ पण, आश्वासक केली.

ख्रिस ब्रॉड यांच्यावर कारवाई करा -युनूस खान
लाहोर, ६ मार्च/वृत्तसंस्था

पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणेची बदनामी करणारे वक्तव्य केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तानचा कर्णधार युनूस खान याने केली आहे.पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनीही अशाच स्वरूपाची मागणी केली आहे. ख्रिस ब्रॉड यांनी लाहोर येथे श्रीलंका खेळाडूंच्या बसवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला सुरक्षा यंत्रणेचा गलथानपणाच जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

सोमदेव विजयी; बोपण्णा पराभूत
चायनिज तायपेईविरुद्ध भारताची १-१ने बरोबरी
काओसियंग, ६ मार्च / पीटीआय
सोमदेव देवबर्मनने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत पहिला विजय नोंदवत आशिया-ओशेनिया विभागातील गट-१च्या दुसऱ्या फेरीत चायनिज तायपेईविरुद्धच्या लढतीत आव्हान कायम राखले. रोहन बोपण्णाविरुद्धच्या लढतीत विजय मिळवत यजमान संघाने आज पहिल्या दिवसअखेर १-१ अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले.

अव्वल मानांकित खेळाडू ‘गोल्डन आर्मबॅन्ड’सह खेळणार
मेलबर्न, ६ मार्च / पीटीआय

क्लेअर टेलर आणि इशा गुहा या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गोल्डन आर्मबॅन्डसह खेळण्याची संधी मिळणार आहे. आयसीसी महिला क्रिकेट क्रमवारीत टेलर व गुहा यांना अनुक्रमे महिला फलंदाज व महिला गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल मानांकन असल्यामुळे या क्रिकेटपटू उद्यापासून सुरू होत असलेल्या विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेत गोल्डन आर्मबॅन्डसह खेळणार आहेत.

इवानच्युकशी बरोबरी झाल्याने आनंद चौथ्या स्थानावर
लिनारेस (स्पेन), ६ मार्च / पी. टी. आय.

लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेच्या १२ व्या फेरीत विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला युक्रेनच्या व्ॉसिली इवानचुकशी बरोबरी स्वीकारावी लागली आणि सलग सहाव्या डावात बरोबरी झाल्याने त्याची संयुक्तपणे चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. या स्पर्धेत केवळ दोन फेऱ्या शिल्लक असताना नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने या स्पर्धेत आघाडीवर असणाऱ्या रशियाच्या अलेक्झांडर ग्रिश्चुकला हरवून खळबळ उडविली आहे. गिश्चुक या स्पर्धेत सात गुणांसह आघाडीवर असून, कार्लसन आणि इवानचुक हे ६.५ गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. विश्वनाथन आनंद आणि अर्मेनियाचा लेवॉन अ‍ॅरोनियन हे ६ गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. अ‍ॅरोनियन यालाही आज चीनच्या वॅन्ग यू विरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले.
१२ व्या फेरीचे निकाल : विश्वनाथन आनंद- भारत (६) बरोबरी वि. व्ॉसिली इवानचुक- युक्रेन (६.५), टीमूर राजाबोव्ह (५.५) बरोबरी वि. लेनियर डॉमिन्गेझ, मॅग्नस कार्लसन (६५) वि. वि. अलेक्झांडर ग्रिश्चुक (७)

भारतीय ज्युनियर हॉकी संघाच्या कर्णधारपदी दिवाकर राम
नवी दिल्ली, ६ मार्च/वृत्तसंस्था

मलेशियातील जोहोर बहरू येथे ११ ते १५ मार्च या कालावधीत होणाऱ्या चार देशांच्या हॉकी स्पर्धेसाठी आज भारतीय संघ जाहीर झाला असून संघाच्या कर्णधारपदी दिवाकर राम याची नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, सिंगापूर आणि मलेशिया हे संघ सहभागी होत आहे. भारतीय संघासोबत पाच अधिकारी राहणार असून त्यात मुख्य प्रशिक्षक ए.के. बन्सल आणि प्रशिक्षक क्लारेन्स लोबो यांचा समावेश आहे. सिंगापूर व मलेशिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली जून महिन्यात होणाऱ्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत भारताची सलामीची लढत मलेशियाविरुद्ध ११ मार्चला होणार असून त्यानंतर १२ मार्चला सिंगापूरविरुद्ध लढत होईल. साखळीतील भारताचा अखेरचा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध १३ मार्चला होणार आहे. साखळी फेरीनंतर अव्वल दोन संघांदरम्यान १५ मार्चला स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. .
भारतीय संघ :- मृणाल चौबे, सी. संतोष कुमार (दोन्ही गोलरक्षक), इनोसन्ट कुल्लू, सुनील यादव, दिवाकर राम (कर्णधार), बिरेंद्र लाक्रा, विकास शर्मा, बेलसाजर होरो, अमरदीप इक्का, मनजित कुल्लू, मनदीप अंतिल, जय करण, दानिश मुजताबा, विक्टो सिंग, मोहम्मद अमिर खान, प्रमोद कुमार, मोहम्मद आसिफ खान, ललित उपाध्याय. अधिकारी - ए.के. बन्सल (मुख्य प्रशिक्षक), क्लरेन्स लोबो (प्रशिक्षक), अनुपम गुलाटी (व्यवस्थापक), श्रीकांत अय्यंगार (फिजिओ), हर्षवर्धन गंधम (पंच).

श्रीलंका खेळाडूंचे समुपदेशन
कोलंबो, ६ मार्च/वृत्तसंस्था

पाकिस्तानात झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून लवकर सावरण्यासाठी श्रीलंका खेळाडूंसाठी समुपदेशनाचा मार्ग अवलंबिला जात आहे.
पाकिस्तानातील हल्ल्यामुळे श्रीलंकेच्या सर्वच खेळाडूंना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. त्यांनी या धक्क्यातून लवकरात लवकर सावरणे गरजेचे आहे. यासाठीच त्यांचे समुपदेशन केले जात आहे, अशी माहिती श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयातील वैद्यकीय विभागाचा कार्यभार सांभाळणाऱ्या गीतांजना मेंडिस यांनी आज पत्रकारांना सांगितले.थिलन समरवीरा आणि परानाविताना यांच्या शरीरातील गोळ्या काढून टाकण्यात आल्या आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळेच आम्ही त्या हल्ल्यातून वाचलो, असे श्रीलंकेचा खेळाडू मलिंदा वर्णपुरा याने सांगितले. अतिरेक्यांनी बसचे टायर फोडले होते. त्याही स्थितीत त्याने बस मैदानापर्यंत नेण्यात यश मिळविले. त्याच्या या धाडसामुळेच आम्हा सर्वाचे प्राण वाचले, असेही त्याने सांगितले.

संक्षिप्त क्रीडावृत्त
दिजू व ज्वाला गट्टा यांचे आव्हान संपुष्टात
नवी दिल्ली
: ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील मिश्रदुहेरीत व्ही. दिजू व ज्वाला गट्टा यांचे आव्हान आज संपुष्टात आले. उप-उपात्यंपूर्व फेरीत पहिली गेम जिंकल्यानंतर त्यांनी कोरियाच्या यॉंग दाईली व हुयो जुआंगली यांच्याविरुध्द पराभव स्वीकारला. जागतिक क्रमवारीत १४ वे स्थान असलेल्या दिजू व ज्वाला गट्टा यांनी हा सामना २३-२१, २०-२२, १४-२१ असा गमावला. भारताच्या सायना नेहवाल व चेतन आनंद यांचे एकेरीतील आव्हान पहिल्या फेरीतच यापूर्वी संपुष्टात आले आहे,त्यामुळे दिजू व ज्वाला गट्टा यांच्यावर भारताच्या आशा केंद्रीत झाल्या होत्या.दिजू व ज्वाला गट्टा यांनी स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग करीत पहिली गेम घेतली. ही गेमही अतिशय रंगतदार झाली. मात्र भारतीय जोडीने परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवीत ही गेम घेतली. दुसरी गेमही चुरशीची झाली. मात्र उत्कंठापूर्ण झालेली ही गेम भारतीय जोडीने गमावली व तेथूनच सामन्याची सूत्रे दाईली व जुआंगली यांच्याकडे गेली.त्यांनी तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून नियंत्रण ठेवले व भारतीय जोडीस फारशी संधी दिली नाही. त्यांनी ड्रॉप शॉटस् व प्लेसिंगचा सुरेख खेळ केला. भारतीय जोडीने सामन्यास कलाटणी देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही.

भारतीय ज्युनियर हॉकी संघाच्या कर्णधारपदी दिवाकर राम
नवी दिल्ली : मलेशियातील जोहोर बहरू येथे ११ ते १५ मार्च या कालावधीत होणाऱ्या चार देशांच्या हॉकी स्पर्धेसाठी आज भारतीय संघ जाहीर झाला असून संघाच्या कर्णधारपदी दिवाकर राम याची नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, सिंगापूर आणि मलेशिया हे संघ सहभागी होत आहे. भारतीय संघासोबत पाच अधिकारी राहणार असून त्यात मुख्य प्रशिक्षक ए.के. बन्सल आणि प्रशिक्षक क्लारेन्स लोबो यांचा समावेश आहे. सिंगापूर आणि मलेशिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली जून महिन्यात होणाऱ्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत भारताची सलामीची लढत मलेशियाविरुद्ध ११ मार्चला होणार असून त्यानंतर १२ मार्चला सिंगापूरविरुद्ध लढत होईल. साखळीतील भारताचा अखेरचा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध १३ मार्चला होणार आहे. साखळी फेरीनंतर अव्वल दोन संघांदरम्यान १५ मार्चला स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. भारतीय ज्युनियर संघाने यापूर्वी हैदराबाद येथे गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेली आशिया चषक स्पर्धाजिंकण्याची कामगिरी केली आहे. विश्वविजेत्या अर्जेन्टिना आणि युरोपियन चॅम्पियन हॉलंड यांच्याविरुद्ध मालिका विजय मिळवणाऱ्या भारताने सिडनी येथे झालेल्या चार देशांचा समावेश असलेल्या युथ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावण्याची कामगिरी केली. भारतीय संघ :- मृणाल चौबे, सी. संतोष कुमार (दोन्ही गोलरक्षक), इनोसन्ट कुल्लू, सुनील यादव, दिवाकर राम (कर्णधार), बिरेंद्र लाक्रा, विकास शर्मा, बेलसाजर होरो, अमरदीप इक्का, मनजित कुल्लू, मनदीप अंतिल, जय करण, दानिश मुजताबा, विक्टो सिंग, मोहम्मद अमिर खान, प्रमोद कुमार, मोहम्मद आसिफ खान, ललित उपाध्याय. अधिकारी - ए.के. बन्सल (मुख्य प्रशिक्षक), क्लरेन्स लोबो (प्रशिक्षक), अनुपम गुलाटी (व्यवस्थापक), श्रीकांत अय्यंगार (फिजिओ) आणि हर्षवर्धन गंधम (पंच).

सराव सामन्यात द्रविडचे शतक
वेलिंग्टन : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आज सराव सामन्यात शतक झळकावत न्यूझीलंड दौऱ्याची शानदार सुरुवात केली आहे. द्रविडने (१०२) आज कँटरबरी विझार्ड्स संघाकडून खेळताना शतक झळकावले. हॅमिल्टन येथे १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी सराव मिळावा यासाठी द्रविडला स्थानिक संघातर्फे सरावाची संधी मिळाली. द्रविडने शतकी खेळी १३ चौकारांनी सजवली. ब्रेन्डन दिमित्रीच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी द्रविडने मायकल पॅप्ससोबत (१२७) दुसऱ्या गडय़ासाठी ९३ धावांची भागीदारी केली. द्रविडचे सात लढतीतील हे चौथे शतक ठरले. मोहालीत इंग्लंडविरुद्ध शतक झळकावणाऱ्या द्रविडने त्यानंतर दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बंगळुरू येथे मध्य विभागाविरुद्ध तर उपांत्य फेरीत राजकोट येथे उत्तर विभागविरुद्ध शतकाला गवसणी घातली. दरम्यान, प्रथमच न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या लेग स्पिनर अमित मिश्राने मात्र आज निराशा केली. मिश्राला आज २८ षटकात १०१ धावांच्या मोबदल्यात बळी मिळवता आला नाही. मध्यल्या फळीतील शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणलाही ओटॅगो कोल्ट संघातर्फे खेळताना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. डय़ुनेडिन येथे झालेल्या या लढतीत खेळपट्टीवर ६९ मिनिटे तळ ठोकणाऱ्या लक्ष्मणला केवळ २० धावा करता आल्या. ओटॅगो संघाचा पहिला डाव १७४ धावात संपुष्टात आला. लक्ष्मीपती बालाजीने या लढतीत एक बळी मिळवण्याची कामगिरी केली. भारतीय कसोटी संघातील अन्य दोन क्रिकेटपटू धवल कुळकर्णी व मुरली विजय यांना १३ ते १६ या कालावधीत होणाऱ्या लढतीत संधी मिळणार आहे.
संक्षिप्त धावफलक : कँटरबरी विझार्ड्स पहिला डाव ५ बाद ३८८ (राहुल द्रविड १०२, एम. पॅप्स १२७, जे.मायबर्ग १०४, अमित मिश्रा २८-१-१०१-०). ओटॅगो व्होल्ट्स पहिला डाव सर्वबाद १७४ (व्हीव्हीएस लक्ष्मण २०, एल. बालाजी १५-४-३९-१); वेलिंग्टन फायरबर्डस् पहिला डाव (२८ षटकात ४ बाद ७३).

वीरमाता जिजाऊ, डॉ. शिरोडकर उपान्त्य फेरीत
मुंबई : जय भारत क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेच्या महिला गटात वीरमाता जिजाऊ, डॉ. शिरोडकर, अंकुर स्पोर्टस् क्लब आणि शिवशक्ती महिला संघाने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. वीरमाता जिजाऊने विश्वशांती क्रीडा मंडळाचा २१-१२ असा पराभव केला. विजयी संघातर्फे आरती नार्वेकर आणि धनश्री पेडणेकरने दमदार चढाया केल्या. अन्य लढतीत डॉ. शिरोडकर संघाने अमर हिंद मंडळाचा ३३-२८ असा पराभव केला. डॉ. शिरोडकरतर्फे स्नेहल साळुंखे आणि नम्रता मोहिते यांनी दिमाखदार चढाया केल्या. कुमार गटात ओम साई क्रीडा मंडळ, नवोदित संघ, अंकुर स्पोर्टस् क्लब यांनी आगेकूच केली. ल्ल

ब्लॅक टू फिनिशसह महेंद्र बुधकरची विजयी सलामी
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या वतीने कुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या उपनगर जिल्हा मानांकन महापौर चषक कॅरम स्पध्रेत एमडीकेच्या महेंद्र बुधकरने ब्लॅक टू फिनिशची नोंद करीत विजयी सलामी नोंदविली. बुधकरने नूर मोहम्मद (कु.सभा) चा २५-९, ९-२४ २४-० असा पराभव केला. दुसऱ्या लढतीत रवि गायकवाडने (सूर्या) आरिफ बेगचा (रोहित) २५-१३, २०-१३ असा पराभव केला. तर अनिल यादवने (शिवसेवा) अन्योनी मामन (एमडीके)ला २५-२, १५-१७, २०-१५ असे हरविले.