Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मतदार ओळखपत्रांवर शिक्का कधी मारणार?
दिलीप शिंदे

मतदार ओळखपत्राची राबविण्यात आलेली मोहीम पुन्हा एकदा ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे बासनात

 

गुंडाळण्याची नामुष्की निवडणूक आयोगावर ओढवली आहे. त्यामुळे ओळखपत्रासाठी स्वत: छायाचित्रे काढून अर्ज जमा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील सात लाख मतदारांची घोर निराशा झाली आहे. ही परिस्थिती संपूर्ण राज्यातील मतदार ओळखपत्र मोहिमेची असून ओळखपत्र योजनेबाबत साशंका व्यक्त केली जात आहे.
माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. शेषन यांच्या कारकीर्दीत राबविण्यात आलेल्या मतदार ओळखपत्र मोहिमेत ठाणे जिल्ह्यातील १६ लाख ५४ हजार मतदारांना ओळखपत्रे देण्यात आली होती. उर्वरित मतदारांची ओळखपत्रे बनविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अनेकदा मोहिमा राबविल्या. मात्र ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडाला. पुन्हा गेल्या वर्षी राज्य निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र बनविण्याच्या मोहिमेस सुरुवात केली. नव्या निविदा, नवे ठेकेदार नेमण्यात आले. तसेच नवीन कल्पना लढवून प्रत्यक्षात सरकारी यंत्रणेकडून छायाचित्र काढण्याऐवजी मतदारराजाने काढलेली दोन छायाचित्रे आयोगाने दिलेल्या छापील अर्जावर चिटकवून कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले.
निवडणूक कर्मचाऱ्यांनी काही अर्ज घरोघरी वाटून उर्वरित लाखो अर्ज बुथवरच ठेवले. ज्यांना गरज असेल त्यांनी बुथवर जाऊन अर्ज घ्यावे आणि छायाचित्रे लावून पुन्हा जमा करावीत, अशी भूमिका अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आल्याने माहितीअभावी छायाचित्रे जमा करण्याचे काम रोडावले. परिणामी ६० लाख ४० हजार ३६२ मतदारांपैकी सुमारे सात लाख मतदारांची छायाचित्रे चिटकविलेले अर्ज कार्यालयात सादर होऊ शकले. उर्वरित ५७ लाख ४० हजार मतदारांपर्यंत अर्ज पोहचलेच नाहीत, तर काहींनी नावाचे अर्ज नेऊन नियोजित मुदत संपल्याने जमा केले नाहीत. मात्र जमा झालेल्या अर्जापैकी एकालाही ओळखपत्र मिळू शकले नाही. ओळखपत्र बनविण्याचे काम ज्या ठेकेदाराने घेतले आहे, त्याच्या संथ कामामुळे निवडणूक कर्मचारी देखील हैराण झाले आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदार बदलण्याची गरज जिल्हा उपनिवडणूक निर्णय अधिकारी आर. विमला यांनी व्यक्त केली. खासगी ठेकेदाराच्या कारभारामुळे मतदारांना लोकसभा निवडणुकीत ओळखपत्राविना मतदान करावे लागणार आहे.