Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘मारुती ओम्नीला शेअरप्रमाणे व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी’
कल्याण/प्रतिनिधी

मारुती ओमनीला शेअर रिक्षेप्रमाणे व्यवसाय करण्यास लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी,

 

अशी मागणी मनसेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी आज कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्याकडे केली. महात्मा फुले पोलिसांना याप्रकरणी सहकार्य करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
मनसेचे वाहतूक शाखेचे उपाध्यक्ष जयेंद्र मंडवी, जयप्रकाश घुमटकर, शहराध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने या मागण्या केल्या.
कल्याण शहरात सहा आसनी रिक्षेला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक चालक, मालकांनी ओमनी गाडी खरेदी केली आहे, परंतु या गाडीला परवाना मिळत नसल्याची खंत चालकांची आहे. त्यामुळे मारुती ओमनीला शेअर रिक्षेसाठी परवाना देण्यात यावा, या गाडय़ा उभ्या करण्यासाठी कल्याण पश्चिम रेल्वे पोलीस ठाण्याजवळील वाहनतळ उपलब्ध करून देण्यात यावा, अशा मागण्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओंकडे केल्या. या मागण्यांची लवकर पूर्तता केली नाहीतर मनसे पद्धतीने आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
आरटीओ बाबासाहेब आजरी यांनी शिष्टमंडळाला सांगितले, मारुती ओमनीला थांबे देण्याचा निर्णय एकटा आरटीओ घेत नाही. यासाठी पालिका प्रशासन, वाहतूक शाखा यांची एक समिती असते. ही समिती थांबे निश्चित करते. त्यानंतर एक प्रस्ताव तयार केला जातो. कल्याण शहराचा हा प्रश्न नसून उल्हासनगर परिसराचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार वेगळा आहे.
त्यामुळे या व्यवस्थांना विचारात घेऊन मग थांबे देण्याबाबतचा विचार करण्यात येईल. तातडीने याबाबतचा निर्णय होत नाही, असे शिष्टमंडळाला सांगण्यात आले.