Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘सावरकरांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज ’
ठाणे/प्रतिनिधी : समाजातील विषमता नष्ट व्हावी म्हणून दैनंदिन आचार, विचारात व कृतीत

 

एकवाक्यता आणि अंधानुकरण अंधश्रद्धाविरुद्ध वास्तववादी दृष्टिकोनातून समाजाचे भले करता येते, असा त्यांचा विश्वास होता, म्हणून कोणाचीही तमा न बाळगता सर्व पीडितांनी संघटितपणे कृती केली तर समाजव्यवस्थेत निर्माण झालेला बिघाड नाहीसा होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यय प्रा. मिलिंद मराठे यांनी काढले.
घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथील स्व. वामनराव प्रभुदेसाई स्मृती स्वा. सावरकर व्याख्यानमालेचा समारोप करताना मराठे यांनी सावरकरांच्या जीवनमूल्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्याची आवश्यकता व्यक्त केली. व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मेजर सुभाष गावंड होते. सावरकरांचा जीवनपट उलगडताना मराठे यांनी सामाजिक समरसतेचे भान त्यांनी ठेवले होते, म्हणूनच रत्नागिरीच्या पतितपावन मंदिरामध्ये सर्वाना विनाअट प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी आंदोलन केले. त्यांनी ज्या सामर्थ्यांने अंदमानातील शिक्षा भोगली ते हिंदू संस्कृतीच्या पतंजली योग क्रियेचा आविष्कार आहे. भाषेचा शुद्ध वापर हा त्यांच्या काही आग्रहांपैकी एक होता, असे सांगताना मराठे म्हणाले, इतर भाषांचा द्वेष हे मूलतत्त्व सावरकरांना मान्य नव्हते. भाषेची विकृती ही संस्कृतीच्या ऱ्हासाला करणीभूत ठरते, या सिद्धांतावर ते ठाम होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून लेखणी मोडा आणि शस्त्र हाती घ्या, असे सांगणारे सावरकर आजच्या पाश्र्वभूमीवर किती दूरदर्शी होते हे जाणवते. मनगटातील ताकदीबरोबर बुद्धीची जोडही महत्त्वाची आहे, म्हणूनच प्रत्येक भारतीयाने आपल्या आयुष्यातील काही वर्षे लष्करी शिक्षणासाठी पर्यायाने देशासाठी देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मेजर सुभाष गावंड यांनी केले. आम्ही आपत्कालीन स्थितीत कसे वागले पाहिजे, याचे प्रशिक्षण प्रत्येकाने घेतले पाहिजे. ते असते तर छत्रपती शिवाजी ट्रर्मिनलवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात नाहक काहीजणांचे प्राण गेले नसते. बेसावधपणे झालेल्या हल्ल्यात पळून न जाता सरळ जमिनीवर झोपले असते तरीही अनेकांचे प्राण वाचले असते. घोडबंदर रोडवरील १५ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पितांबरी कंपनीचे मालक रवींद्र प्रभुदेसाई, तन्वी हर्बल प्रॉडक्टच्या मेधा मेहेंदळे उपस्थितीत होत्या. अजय जोशी यांनी व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.