Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दस्तुरखुद्द पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीलाही वाटाण्याच्या अक्षता
कल्याण/वार्ताहर

मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांची तक्रार घेण्याचे

 

निर्देश दिले असताना महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत घुले, पोलीस उपअधीक्षक विजयकुमार फुलकर हे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांच्या विरोधात तक्रार देण्यास गेले असता, तक्रार नोंदवून न घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याची ही अवस्था असेल, तर सामान्य नागरिकांना काय दर्जाची सेवा मिळत असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस उपअधीक्षक विजयकुमार फुलकर यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात २००६ मध्ये तक्रार दिली होती. त्याचा तपास सीआयडी क्राइमतर्फे सुरू आहे. त्यातील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट केल्याची तक्रार फुलकर यांनी केली होती. त्यासाठी माहिती आयुक्तांनी याबाबत माहिती मागितली होती. या कागदपत्रांबाबत माहिती न देता पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी तक्रारदार फुलकर यांच्या अर्जाचे अवलोकन न करता त्यांना अतिरंजित तथ्यहीन मजकुराचे अर्ज करण्याची मानसिक विकृती असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे, तरी अर्जदार फुलकर यांचे दाखल केलेले अपील फेटाळण्यात यावे, अशी आपली विनंती असल्याचा अहवाल दिल्याने या अहवालाने फुलकर अपमानित झाल्याने संतप्त झाले.
आपल्या अधिकाराचा गैरउपयोग करून अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी गुन्ह्याच्या कागदपत्रांचा अहवाल देण्याचे सोडून फिर्यादी पोलीस उपअधीक्षक विजयकुमार फुलकर यांची वैद्यकीय तपासणी न करता मानसिक विकृत असल्याची खोटी व खोडसाळ माहिती माहिती आयुक्तांना कळविल्याने संतप्त झालेल्या फुलकर यांनी पोलीस उपायुक्त कराळे यांच्या विरोधात तक्रार करण्यास महात्मा फुले पोलीस ठाण्यात गेले असता, सकाळी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बसवून तक्रार करू नये, यासाठी मन वळविण्याचे प्रयत्न केले व शेवटी अर्ज घेऊन त्यांची बोळवण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अ‍ॅक्टमध्ये अर्ज चौकशी असे कलम नाही. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात चौकशी प्रावधानाची तरतूद नसताना महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे फुलकर यांचे म्हणणे आहे.
बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यावर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी आपल्या अधिकाराचा गैरउपयोग केल्याने त्यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपअधीक्षक विजयकुमार फुलकर यांची आहे, तसेच आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला जाणूनबुजून त्रास देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत घुले यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस उपअधीक्षक विजयकुमार फुलकर यांनी दिलेला तक्रार अर्ज घेतला आहे. ही तक्रार पोलीस उपायुक्तांबद्दल असल्याने कायदेविषयक सल्ला घेऊन पुढची कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.