Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘पाणी विभागातील कर्मचाऱ्यांचे पाणीचोरीला सहाय्य ’
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारीच

 

पाणीचोरीला सहाय्य करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे गटनेते विश्वनाथ राणे यांनी पालिकेच्या महासभेत केला.
पाणी महसुलाचे अपेक्षित उत्पन्न आणि वसूल झालेली रक्कम या विषयावर महासभेत चर्चा सुरू असताना राणे यांनी टीका केली. ते म्हणाले, जानेवारी १९९५ नंतरच्या झोपडय़ांना पाण्याची जोडणी देऊ नये, असे असताना १९९५ नंतर शहरात अनेक नवीन झोपडय़ा, अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. तेथे राहणारी कुटुंबे कोठून पाणी पितात. हे पाणी देण्याचे काम पाणी पुरवठा विभागातील कर्मचारीच करीत असतात. पाणीचोरीला पाणीपुरवठा विभागातील कर्मचारीच सहकार्य करीत असल्याने ते पाणीचोरीची कनेक्शन्स कशी पकडणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सदानंद थरवळ म्हणाले, गांधीनगरमध्ये आर्यव्रत सोसायटी आहे. या सोसायटीचे पदाधिकारी पालिकेकडे गेल्या दीड वर्षांपासून सोसायटीला पाण्याचा मीटर जोडण्यासाठी विनवण्या करीत आहेत. परंतु अधिकारी तुम्ही पाणी वापरा मग मीटरचे बघू, अशी टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. जे रहिवासी स्वत:हून इमारतीला मीटर बसविण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना तात्काळ मीटर जोडणी आवश्यक आहे. पण बेजबाबदार, निष्क्रीय अधिकारी भ्रष्टाचाराच्या गाळात गुंतल्याने ते या विषयाकडे लक्ष देत नाहीत.
हर्षवर्धन पालांडे, विमल गायकवाड यांनी प्रशासनावर टीका केली. रमेश म्हात्रे म्हणाले, पाणीपुरवठा विभागाला अनधिकृत पाणीचोरीवर नियंत्रणे आणणे जमत नसेल तर त्यांनी खासगी एजन्सीच्या माध्यमातून काम सुरू करावे. कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी आपण अलिकडेच पाणी विभागाचा पदभार स्वीकारला आहे. पाणीपुरवठा विभागातील अनेक कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
गेल्या वर्षभरात ६०० अनधिकृत नळजोडणीधारकांकडून ८५ लाखाचा महसूल जमा करण्यात आला आहे. यापूर्वी महसुलाबाबत जे निर्णय झाले होते, जे ठराव झाले होते, त्यावेळी आपण पाणीपुरवठा विभागात नव्हतो, असे कुलकर्णी म्हणाले.