Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नांदिवली नाला परिसरातील रहिवासी प्रदूषणाने हैराण
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेतील नांदिवली नाल्यामधून वाहून जाणाऱ्या रासायनिक

 

पाण्याच्या उग्रवासामुळे, तसेच रात्री १२ वाजल्यानंतर विविध कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या वायूमुळे सागाव, नांदिवली, गांधीनगर, सुनीलनगर परिसरातील रहिवासी घशाचे आजार, डोळे चुरचुरणे या आजाराने त्रस्त झाले आहेत.
गेले काही महिन्यांपासून रात्री १२ वाजल्यानंतर हवेत मोठय़ा प्रमाणात धूर दिसू लागतो. हे धुके असल्याचा अंदाज प्रथम नागरिकांनी घेतला. पण दररोज येणारे हे धुके नसून विविध कंपन्यांमधून सोडण्यात येणारा हा प्रदूषित वायू असल्याचे आता नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. तसेच नाल्यामधून वाहून जाणाऱ्या विविध कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाण्याचा दर्प अनेक वेळा सहन होत नाही. या सततच्या वासामुळे नाल्याच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. ऐन परीक्षेच्या काळात प्रदूषणाने डोके वर काढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी पालकांना काळजी वाटत आहे. नांदिवली नाला परिसरातील प्रदूषणामुळे एका इमारतीमधील सुमारे चार ते पाच जण आजारी असल्याची माहिती या भागातील रहिवाशांनी दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.