Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

 

 

 

 

 

ठाण्यातील प्रभाग क्र.२९ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिशा यांना उमेदवारी देण्यात आली असून शुक्रवारी त्यांनी अर्ज भरला तेव्हा महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रवादीने सरनाईक यांचे मित्र राजन धुमाळ यांना रिंगणात उतरविले असून भाजपनेही ही निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने येथे कमालीची चुरस निर्माण झाली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड विरुध्द प्रताप सरनाईक असेच या लढतीचे स्वरूप राहणार असल्याने सर्वाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

मतदार ओळखपत्रांवर शिक्का कधी मारणार?
दिलीप शिंदे

मतदार ओळखपत्राची राबविण्यात आलेली मोहीम पुन्हा एकदा ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे बासनात गुंडाळण्याची नामुष्की निवडणूक आयोगावर ओढवली आहे. त्यामुळे ओळखपत्रासाठी स्वत: छायाचित्रे काढून अर्ज जमा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील सात लाख मतदारांची घोर निराशा झाली आहे. ही परिस्थिती संपूर्ण राज्यातील मतदार ओळखपत्र मोहिमेची असून ओळखपत्र योजनेबाबत साशंका व्यक्त केली जात आहे.

अनगाव येथील वैद्यकीय शिबिरात ३३० मुलांची तपासणी
कल्याण वार्ताहर

येथील अनंत वझे संगीत कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने अलिकडेच भिवंडी तालुक्यातील अनगाव, कवाड आणि परिसरातील ४० खेडय़ांमधील रहिवाशांसाठी बालआरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात परिसरातील लहान मुला-मुलींची विनामूल्य तपासणी करण्यात आली. परिसरातील ३३० मुलामुलींनी याचा लाभ घेतला. बालरोगतज्ज्ञ डॉ. चंदा अडवाणी आणि सहकाऱ्यांनी मुला-मुलींना तपासले.

‘संघर्ष’ च्या वतीने
‘मिळून साऱ्याजणी’

ठाणे/प्रतिनिधी : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून ‘संघर्ष’ या ठाण्यातील संस्थेतर्फे ‘मिळून साऱ्याजणी’ या चर्चात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ७ मार्च रोजी टिप-टॉप प्लाझा हॉल, तीन हात नाका येथे सायंकाळी ६ वाजता ‘मिळून साऱ्या जणी’ चा कार्यक्रम संपन्न होणार असून, ‘संघर्ष’च्या महिला शाखेतर्फे त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘मारुती ओम्नीला शेअरप्रमाणे व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी’
कल्याण/प्रतिनिधी

मारुती ओमनीला शेअर रिक्षेप्रमाणे व्यवसाय करण्यास लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी आज कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्याकडे केली. महात्मा फुले पोलिसांना याप्रकरणी सहकार्य करण्यासाठी निवेदन देण्यात आले. मनसेचे वाहतूक शाखेचे उपाध्यक्ष जयेंद्र मंडवी, जयप्रकाश घुमटकर, शहराध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने या मागण्या केल्या.

‘सावरकरांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज ’
ठाणे/प्रतिनिधी : समाजातील विषमता नष्ट व्हावी म्हणून दैनंदिन आचार, विचारात व कृतीत एकवाक्यता आणि अंधानुकरण अंधश्रद्धाविरुद्ध वास्तववादी दृष्टिकोनातून समाजाचे भले करता येते, असा त्यांचा विश्वास होता, म्हणून कोणाचीही तमा न बाळगता सर्व पीडितांनी संघटितपणे कृती केली तर समाजव्यवस्थेत निर्माण झालेला बिघाड नाहीसा होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यय प्रा. मिलिंद मराठे यांनी काढले.

दस्तुरखुद्द पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीलाही वाटाण्याच्या अक्षता
कल्याण/वार्ताहर

मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांची तक्रार घेण्याचे निर्देश दिले असताना महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत घुले, पोलीस उपअधीक्षक विजयकुमार फुलकर हे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांच्या विरोधात तक्रार देण्यास गेले असता, तक्रार नोंदवून न घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याची ही अवस्था असेल, तर सामान्य नागरिकांना काय दर्जाची सेवा मिळत असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कुंदनानी फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधास प्रथम क्रमांक
कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत उल्हासनगरच्या प्रिन्सिपॉल के.एम. कुंदनानी फार्मसी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेली तीन वर्षे कुंदनानी फार्मसीचे विद्यार्थी या स्पर्धेत हे यश संपादन करीत आहेत. बुलढाणा येथील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत राज्यातील ३८ फार्मसी कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.

‘पाणी विभागातील कर्मचाऱ्यांचे पाणीचोरीला सहाय्य ’
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारीच पाणीचोरीला सहाय्य करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे गटनेते विश्वनाथ राणे यांनी पालिकेच्या महासभेत केला.
पाणी महसुलाचे अपेक्षित उत्पन्न आणि वसूल झालेली रक्कम या विषयावर महासभेत चर्चा सुरू असताना राणे यांनी टीका केली. ते म्हणाले, जानेवारी १९९५ नंतरच्या झोपडय़ांना पाण्याची जोडणी देऊ नये, असे असताना १९९५ नंतर शहरात अनेक नवीन झोपडय़ा, अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. तेथे राहणारी कुटुंबे कोठून पाणी पितात. हे पाणी देण्याचे काम पाणी पुरवठा विभागातील कर्मचारीच करीत असतात. पाणीचोरीला पाणीपुरवठा विभागातील कर्मचारीच सहकार्य करीत असल्याने ते पाणीचोरीची कनेक्शन्स कशी पकडणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अंबरनाथ तालुका पत्रकार संघातर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
बदलापूर/वार्ताहर: जागतिक महिला दिनानिमित्त समाजात विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या सहा महिलांना अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेतर्फे सन्मानित करण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष अजित म्हात्रे यांनी सांगितले.अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेतर्फे नगराध्यक्षा संपदा गडकरी, बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयाच्या सुहासिनी मांजरेकर, अंजली थिटे (बँकिंग सहकार, अंबरनाथ जयहिंद बँक), अंजली भोसले (तहसीलदार, उल्हासनगर), अनुराधा जुवेकर (सामाजिक प्रशासकीय संस्था), ऊर्मिला गुप्ते (शैक्षणिक, बालवाडी भगिनी मंडळ, अंबरनाथ) या सहा महिलांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष अजित म्हात्रे यांनी सांगितले. सोमवार, ९ मार्च रोजी त्या-त्या कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला जाईल.

टीडीसी बँक निवडणूक; आत्माराम देसले रिंगणात
शहापूर/वार्ताहर : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेअरी मतदारसंघातून संचालकपदाच्या निवडणुकीसाठी शहापूर तालुक्याला राष्ट्रवादीने उमेदवारी देताना डावलल्याने शहापूरचे आत्माराम बाळू देसले हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघासाठी ७९ मतदार असून, त्यापैकी सर्वाधिक ३८ मतदार शहापूर तालुक्यातील आहेत. ‘डेअरी सोसायटीज’ या मतदारसंघासाठी ३५ वर्षांपासून सर्वाधिक मतदार असलेल्या शहापूर व मुरबाड तालुक्याला आलटूनपालटून संधी दिली जाते. मागील निवडणुकीत मुरबाडचे लक्ष्मण घुडे यांना राष्ट्रवादीने तिकीट देऊन ते निवडून आले होते.

बीएसएनएलतर्फे ग्राहक मेळावे
बदलापूर/वार्ताहर:भारत संचार निगमने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या विविध सुविधांची ग्राहकांना विस्तृत माहिती देण्यासाठी अंबरनाथ- बदलापूर येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ७ मार्च रोजी बदलापूर पूर्व संजीवनी सभागृहासमोर सकाळी ९ ते रात्री ८, रविवार, ८ मार्च रोजी सकाळी ९ ते ८ अजय राजा हॉलसमोर, बदलापूर (प) येथे हे ग्राहक मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. अंबरनाथ पूर्वेकडील कैलासनगर येथे शनिवार, १४ मार्च रोजी तर १५ मार्च रोजी पाठारे पार्क, मोतीराम पार्क, शिवसेना शाखेसमोर ग्राहक मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.या मेळाव्यात लॅण्डलाईन वा डब्ल्यू. एन. एल. (वायरलेस इन लोकल..) या सेवा नोंदविणाऱ्या ग्राहकांना कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नसून तात्काळ सेवा सुरू करण्यात येईल. कंपनीकडून आकर्षक भेटवस्तूही तसेच विनामूल्य रिचार्ज कूपनही ग्राहकांना देण्यात येणार आहे.

कल्याणच्या जवाहिऱ्यावर प्राप्तिकर विभागाचा छापा
कल्याण/प्रतिनिधी

कल्याणमधील एका नामवंत जवाहिऱ्याच्या दुकानावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला असून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. काल हा छापा टाकण्यात आल्याचे समजते. कालपासून संबंधित जवाहिऱ्याचे सर्व व्यवहार तपासण्यात येत असल्याने प्राप्तिकर विभागाला मोठे घबाड या ठिकाणी मिळाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत अधिक दुजोरा देण्यास कोणीही उपलब्ध झाले नाही. काही लोकप्रतिनिधींच्या आर्थिक हालचालींवर या विभागाचे लक्ष असल्याची जोरदार चर्चा आज दिवसभर सुरू होती. त्यामुळे कोणता लोकप्रतिनिधी या छाप्याचे लक्ष्य होतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.