Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९

कोण पेलणार भाजपचे आव्हान? भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
वामन तुरिले, भंडारा, ६ मार्च

१९५२ पासूनच्या अनेक निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला ठरलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पुनर्रचनेमुळे थोडा बदल झाला असला, तरी या बालेकिल्ल्याला अनेकदा यशस्वी खिंडार पाडणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अन्य सर्व पक्ष स्वतंत्र किंवा संघटितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे निश्चित आहे. तुल्यबळ लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भारतीय जनता पार्टी असेच चित्र राहण्याची शक्यता आहे. पुनर्रचनेनंतर संपूर्ण भंडारा जिल्हा व गोंदिया जिल्ह्य़ातील तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी हे तालुके भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात असून आमगाव, देवरी, सालेकसा हे आदिवासीबहुल तालुके वजा झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी घोषित केली नसली तरी ही जागा पटेल घराण्याकडेच राहील, हे निश्चित आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघ काँग्रेसशी युतीवर अ‍ॅड. आंबेडकरांची मदार
क्रांतिकुमार ओढे, अकोला, ६ मार्च

काँग्रेसशी फारकत घेतल्यामुळे दोनदा पराभव पत्करावा लागलेले भारिप-बमसंचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विजयाची मदार काँग्रेसशी युतीवर अवलंबून आहे. भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेला अकोला लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात मिळवण्याचे आव्हान काँग्रेस, भारिप-बमसं व इतर पक्षासमोर आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भारिप-बमसंची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. १९८५ पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे प्रभुत्व होते. त्यानंतर या मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रभावाला ओहोटी लागली. प्रकाश आंबेडकर यांचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर काँग्रेसपासून दूर जाऊ इच्छिणाऱ्या मतदाराला भारिप-बमसंच्या रूपाने पर्याय मिळाला.

अकोल्यात पाणी टंचाई; संतप्त नागरिकांची
आयुक्तांच्या निवासस्थानी धाव

अकेाला, ६ मार्च/ प्रतिनिधी

पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या जुने शहरातील नागरिकांच्या रोषाला महापालिका आयुक्त जी.एन. कुर्वे यांना गुरुवारी रात्री सामोरे जावे लागले. पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर नागरिक शांत झाले. अकोला जुने शहरात गेल्या दोन दिवसापासून पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. संतप्त नागरिकांनी गुरुवारी रात्री महापालिकेचे आयुक्त जी. एन. कुर्वे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. पाणीटंचाईचा गंभीर प्रष्टद्धr(२२४)न त्यांनी आयुक्तांपुढे मांडला.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ७६.४२ टक्के मतदारांना ओळखपत्रे
चंद्रपूर, ६ मार्च/ प्रतिनिधी

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात १५ लाख ३६ हजार २९८ मतदार असून आतापर्यंत ७६.४२ टक्के मतदारांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत. ३ लाख ५३ हजार २९९ मतदारांना ओळखपत्रे देणे शिल्लक असून लवकरच तेही काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करून निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

युतीने जागा न सोडल्यास चंद्रपुरातून स्वतंत्रपणे लढणार -चटप
चंद्रपूर, ६ मार्च/ प्रतिनिधी

गेल्या निवडणुकीत सोबत असलेल्या भाजप शिवसेनेसोबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून युतीने ही जागा सोडली नाही तर त्यांच्यासोबत असलेली आमची आघाडी निश्चित तुटेल व आम्ही स्वतंत्रपणे लढू, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आमदार वामनराव चटप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. संघटनासमर्थित स्वतंत्र भारत पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी लोकसभेच्या दोन जागा जिंकणे आवश्यक आहे. पक्षाने सात जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या निर्णयानुसार गेल्या आठ महिन्यापासून या मतदार संघात प्रचार सुरू केला आहे. गेल्यावेळी आम्ही युतीसोबत होतो. यावेळी युतीने आमच्या पक्षाची मागणी मान्य करावी, अशी अपेक्षा आहे.

रामटेक मतदारसंघात कामठी ‘इन’, मोर्शी ‘आऊट’!
नागपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

रामटेक लोकसभा मतदारसंघातून मोर्शी हा विधानसभा मतदारसंघ निघून गेल्यानंतर संपूर्ण मतदारसंघ नागपूर जिल्ह्य़ातच आल्याने प्रशासकीयदृष्टय़ा सोयीचे झाले आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच हा मतदारसंघ राखीव झाल्याने अनुसूचित जातीला येथून संसदेत प्रतिनिधित्व करण्याची हमखास संधी मिळणार आहे. हा मतदारसंघ विस्ताराने बराच मोठा असला तरी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या मतदारसंघात १५ लाख १३ हजार ६८३ मतदार आहेत. नागपूर लोकसभेत असणारा कामठी हा विधानसभा मतदारसंघ आता रामटेक लोकसभेत गेला आहे, तर रामटेकमधील मोर्शी मतदारसंघ वर्धा लोकसभेत गेला आहे.

महिला कैद्याची कारागृहात आत्महत्या
अमरावती, ६ मार्च / प्रतिनिधी

स्वत:च्या मुलीची हत्या करण्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या महिलेने येथील मध्यवर्ती कारागृहात महिलांच्या बराकीतील शौचालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. नंदा श्रीकृष्ण इंगळे (३२), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अंजनगावसुर्जी तालुक्यातील कारला येथील रहिवासी असलेल्या या महिलेवर तिची ५ वर्षीय मुलगी मयूरी हिची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप होता.

११ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार रविवारी
१५ मार्चला पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याचे अनावरण

चंद्रपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

‘महिला जग बदलवू शकतात’ हा संदेश देत सवरेदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालयाच्यावतीने येत्या ८ मार्चला जागतिक महिला दिवसानिमित्त ११ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. १५ मार्चला पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री व संस्थाध्यक्ष शांताराम पोटदुखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवार ८ मार्चला इंदिरा गांधी प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी ५ वाजता महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महिला दिनानिमित्त आयोजित या मेळाव्याला समाजसेविका साधनाताई आमटे हजर राहतील.

धुळवडीनंतरच राजकीय रंगवर्षांव
लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन आता चार दिवस लोटले तरी राजकीय वातावरण तापलेले नाही. उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली आणि पारा चढू लागला तरी राजकीय तंबूत शांतता आहे. प्रत्यक्ष प्रचाराला अजून महिनाभराचा अवकाश असल्याने राजकीय नेते मंडळी सध्या जुळवाजुळव करण्यात गुंतली आहे. प्रमुख राजकीय पक्ष उमेदवारांची निवड करण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहेत. तसेही उमेदवारी कुणाला द्यायची हे आधीच ठरलेले असते तरी निवडीचा फार्स करावा लागतो. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य यावे यासाठी हे प्रकार केले जातात. काँग्रेसचे निरीक्षक नुकतेच येथे येऊन गेले.

बुलढाणा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला
राजेंद्र शिंगणेच उमेदवार?

बुलढाणा, ६ मार्च / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससाठी कळीचा व तेवढाच प्रतिष्ठेचा मुद्दा बनलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागा अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीने आपल्या पारडय़ात टाकून घेण्यात यश संपादन केले आहे.

बुद्ध पौर्णिमा उत्सव समितीची कार्यकारिणी
बल्लारपूर, ६ मार्च / वार्ताहर
येथील बुद्ध पौर्णिमा उत्सव समितीची नुकतीच बैठक होऊन त्यात कार्यकारिणी निवडण्यात आली.
या समितीच्या कार्यकारिणीत अध्यक्ष शिवदास बेताल, सरचिटणीस रितेश बोरकर, उपाध्यक्ष गजानन पाटील, कार्याध्यक्ष देवराव मेश्राम, सहसचिव श्रीनिवास मासे, कोषाध्यक्ष सुनील कुरेकर आहेत. सल्लागार समिती- सुखदेव मून, पी.एल. शेंडे, आनंदराव ठमके, शत्रुघ्न ब्राह्मणे, दिगंबर झामरे, सखाराम पेडगुलवार, अशोक खोब्रागडे, लक्ष्मण करमनकर, विलास मोगरे, नानाजी कुरेकर, सदस्य- विकास पेडगुलवार, प्रशांत उमरे, प्रफुल्ल भालेराव, प्रभाकर रामटेके, अमोल आयरे यांचा समावेश आहे.

गटई कामगारांसाठी ‘स्टॉल’ योजना
भंडारा, ६ मार्च / वार्ताहर

पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला बसून आपली सेवा देत असतात. या व्यावसायिकांना वारा, ऊन्ह, पाऊस यापासून संरक्षण मिळावे. त्यांची आर्थिक उन्नती व्हावी याकरिता सामाजिक न्याय विभागामार्फत १०० टक्के शासकीय अनुदानावर गटई कामगारांना लोखंडी पत्र्यांचे स्टॉल पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर मोफत पत्र्याचा स्टॉल व ५०० रुपये अनुदान दिले जात आहे.
या योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १५ मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे.
इच्छुक अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रासह १५ मार्च ०९ पर्यंत विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, कार्यालय वाघमारे बिल्डींग राजगोपालाचारी वॉर्ड, भंडारा येथे कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे कळवण्यात आले आहे.

ब्राह्मण महासंघाच्या वतीने चंद्रशेखर आझाद स्मृतिदिन
खामगाव, ६ मार्च / वार्ताहर

चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त जलालपुरा भागात गोपाल शर्मा यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. गोपाल शर्मा यांनी क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्राह्मण महासंघाचे शेखर पुरोहित, संजय शर्मा, सचिन कुलकर्णी, अ‍ॅड. आपटे, राम माजगावकर, निक्की बोहरा, सचिन शर्मा, परशुराम सेनेचे अध्यक्ष राजू नेटके, राजेश जोशी, सर्वेश शर्मा उपस्थित होते.

खामगाव पंचायत समितीची आमसभा
खामगाव, ६ मार्च / वार्ताहर

गाव पातळीवर ग्राम पंचायतच्या माध्यमातून लोकाभिमुख कार्य करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांनी समन्वय ठेवून नियोजन करावे, संपूर्ण स्वच्छता अभियान कार्यक्रम यशस्वीपणे राबवून ‘निर्मल ग्राम विकसित ग्राम’ करण्याचा ग्रामस्थांनी संकल्प घ्यावा, असे आवाहन आमदार दिलीप सानंदा यांनी केले. खामगाव पंचायत समितीची वार्षिक आमसभा व सरपंच मेळावा संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज सभागृहात नुकताच पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. वार्षिक आमसभेला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी पी.एल. सोरमारे, उपसभापती शकुंतला उन्हाळे, प्रमिला टिकार, ज्योती तायडे, दिलीप मारके, संजय तायडे, श्रीराम तिवाले, अजय तायडे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर तापू लागले
चंद्रपूर, ६ मार्च/ प्रतिनिधी

मार्च महिन्याला सुरुवात होताच उन्हाचा पारा झपाटय़ाचे चढायला सुरुवात झाली असून शहरात आज ४०.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली. पावसाने फटका दिल्याने यंदा वातावरण उष्ण असतानाच मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ापासून उन्हाळय़ाला सुरुवात झाली आहे. एक दोन दिवस वातावरणात उकाडा नव्हता. मात्र ४ मार्चपासून उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. आज चंद्रपूर शहरात ४०.२ अंश सेल्सियस तपामानाची नोंद घेण्यात आली. गुरुवारी ब्रह्मपुरी शहरात ४०.३ अंश तापमानाची नोंद घेतली गेली. मार्च महिन्याची सुरुवातच कडक उन्हाने झाल्याने एप्रिल व मे या कडक उन्हाळय़ाच्या महिन्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता आताच काही लोकांनी कुलर सुरू केले आहेत.

भारिप-बहुजन महासंघाचा मेळावा
खामगाव, ६ मार्च / वार्ताहर
युवकांनी सत्ता परिवर्तनासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केले. लाखनवाडा चिंचपूर येथील पक्ष मेळाव्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुंडलिक तायडे होते. याप्रसंगी व्ही.पी. दांडगे, श्रीकृष्ण काळणे, रमेश सिरसाट, भीमराव गवई, अंबादास वानखडे, नीलेश दीपके, सैय्यद मुन्शी, रमेश गवारगुरूउपस्थित होते. संचालन बाबुराव वानखडे यांनी केले. आभार कैलास वाकोडे यांनी मानले.

चंद्रपुरात अंगणवाडी सेविकांचा मेळावा
चंद्रपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

शहरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांचा मेळावा वाल्मीकी मंदिरात घेण्यात आला. याप्रसंगी बोलताना संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, महिलांना सहा महिन्यांपासून मानधन नाही. एक वर्षांपासून अंगणवाडीचे भाडे नाही. दिवाळी भेट अजूनपर्यंत मिळाली नाही, याचे मुख्य कारण म्हणजे प्रकल्प अधिकारी डॉ. एम.ए. खोब्रागडे यांचे उदासीनतेमुळेच बल्लारशा शहरी प्रकल्प अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांमध्ये वाढ झाली आहे. डॉ. खोब्रागडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असल्याकारणानेच ते बल्लारपूर शहरी महिलांच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याचे प्रा. रमेशचंद्र दहिवडे म्हणाले. याप्रसंगी सरिता कामतवार, पावडे उपस्थित होत्या.

आदिवासी हलबा महिला मेळावा
चंद्रपूर, ६ मार्च / प्रतिनिधी

अखिल भारतीय आदिवासी हलबा महिला समितीच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येत्या ८ मार्चला सकाळी ११ ते ५ पर्यंत विणकर सभागृहात जनजागरण महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन भारतीय संचार निगमचे उपमंडल अभियंता अल्का पौनीकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आदिवासी विचारवंत डॉ. रिमा निनावे तर प्रमुख पाहुण्या म्हणून आदिम महिला समस्या निवारण समितीच्या अध्यक्ष संगीता पौनीकर, हलबा दर्पणच्या संपादक अ‍ॅड. नंदा पराते, राष्ट्रीय आदिवासी हलबा महापंचायत अभ्यास गट सदस्य पुंडलिक नंदूरकर, विनोद नंदूरकर उपस्थित राहणार आहेत. आदिवासी अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी हलबा महिला समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

पाचमोरीत वाहनाच्या धडकेने काळवीट ठार
अकोला, ६ मार्च/ प्रतिनिधी

वाहनाच्या धडकेने काळवीट ठार झाल्याची घटना अकोटफैलजवळील पाचमोरी येथे गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. वन खात्याने मृत काळवीट ताब्यात घेतले आहे. दोन वर्षांचे काळवीट रस्त्याने जात असताना त्याला वाहनाची धडक लागली. त्यात काळवीट जागीच ठार झाले. या अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. अकोटफैल पोलिसांनी वन अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी एम. जी. गुल्हाने यांच्या आदेशानुसार वनरक्षक सुनील चिरंगे यांनी मृत काळवीट ताब्यात घेतले. काळविटाचे विच्छेदन करण्यात येत असून वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याानुसार वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.