Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
ग्रंथविश्व

ख्याल गायनातील स्थित्यंतरांचा मागोवा

‘ग्रेट आर्ट पिक्स अप व्हेअर नेचर एण्डस्’ असे म्हणतात. जीवनाची विशालता आणि पसारा आपल्या आवाक्यात घेण्याची कुवत महान कलेत असते. ऐन पावसाळ्यात समुद्रावर लाटांचे तांडव आणि सोसाटय़ाचा वारा सुटलेला असताना पर्जन्यधारांचे जमिनीवर होणारे नर्तन पाहिल्यानंतर ज्यांनी ‘मेघमल्हार’ समारोहात भीमसेन जोशींच्या गडगडाटी ताना ऐकल्या आहेत किंवा ‘पपीहा करत पिया पिया’ अशी पुकार ऐकली आहे त्यांना हे म्हणणे पटेल. अडीचशे वर्षांची परंपरा लाभलेला ‘ख्याल’ हा हिन्दुस्थानी संगीतातला सर्वात समृद्ध, सर्वाधिक श्रीमंत आणि अभिजात कलांपैकी सर्वाधिक जनप्रिय कलाप्रकार आहे. ‘ख्याल’ या प्रकाराची नाळ ध्रुपद या अगोदरच्या प्रकाराशी जोडलेली असली तरी तो ध्रुपदाची सर्व वैशिष्टय़े स्वत:मध्ये सामावून घेत, ध्रुपदाच्या मर्यादा ओलांडत विकसित होत गेला.

 


‘ख्याल’ गायकीची निर्मिती केल्याचे श्रेय जाते ते सदारंग आणि अदारंग या महमदशा रंगीले बादशहाच्या दरबारातल्या बनिकारांकडे. हिन्दुस्थानी संगीत पूर्ण होते आणि प्रगल्भ बनते ते ख्यालात. नियंत्रित पण तरीही उत्स्फूर्ततेला वाव देणारा हा संगीतप्रकार! गेल्या अडीचशे वर्षांत हा संगीतप्रकार जसा बहरला आणि जनप्रिय झाला तसतसे त्यात परिवर्तनही होत गेले. राग, ठेका आणि कविता या तीन प्रमुख घटकांच्या बेमालूमपणे एकजीव होण्यातून बनलेल्या मूळ ख्यालात घराणी निर्माण होऊ लागली. एकेका घराण्याने या तीन घटकांपैकी पहिल्या दोन घटकांमध्ये फेरफार करून आपापली ओळख बनविण्याचा प्रयत्न केला. यातून जी विविधता निर्माण झाली त्यातून संगीतकला आणखी श्रीमंत झाली आणि अभ्यासकांना खाद्य उपलब्ध झाले.
दीपक राजा हे हिन्दुस्थानी संगीताचे एक अभ्यासक आहेत. ते स्वत: सतारवादक आहेत आणि गाण्याचा अभ्यास त्यांनी जयपूर-अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठतम गायिका धोंडूताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केला आहे. दीपक राजा हे उच्चविद्याविभूषित असे पत्रकार आणि व्यवस्थापन तज्ज्ञही आहेत. यापूर्वी त्यांनी ‘हिन्दुस्थानी म्युझिक : अ ट्रॅडिशन इन ट्रान्झिशन’ हे पुस्तक लिहिले होते आणि त्याची बरीच चर्चा झाली. ‘ख्याल होकॅलिझम् : कंटिन्यूटी विदीन चेंज’ या पुस्तकात त्यांनी आपली ख्याल गायकीसंबंधीची निरीक्षणे आणि मते मांडली आहेत. न्यूयॉर्कमधल्या ‘इंडिया अर्काइव्ह म्युझिक लिमिटेड’ या ध्वनिमुद्रण कंपनीने काही भारतीय गायक कलाकारांची ध्वनिमुद्रणे करून ती प्रसृत केली. त्या ध्वनिमुद्रणांसोबत कलाकारांचा आणि गायकीचा परिचय करून देणाऱ्या टिपा राजा यांनी लिहिल्या होत्या. त्यांचे विकसित स्वरूप म्हणजे हे पुस्तक.
‘ख्याल व्होकॅलिझम : कंटिन्यूइटी विदीन चेंज’ म्हणजे गेल्या दोनेकशे वर्षांत ख्याल गायकीत घडलेली स्थित्यंतरे आणि या कलेचा झालेला विकास याचा, या कलाकारांच्या संदर्भात घेतलेला आढावा होय. गेल्या १०० वर्षांत ध्वनिमुद्रणाचे तंत्र विकसित झाले. राजा यांनी सुमारे ५०० विविध ध्वनिमुद्रणे ऐकून स्वत:चे निष्कर्ष काढले आहेत. ते निष्कर्ष वाचकाला पटतीलच असे नाही पण त्यामागे एक विशिष्ट भूमिका आणि कारणमीमांसेचा प्रयत्न निश्चित आहे.
दीपक राजा यांनी ख्याल गायकीच्या पाच शैली निर्धारित केल्या आहेत. आग्रा परंपरा, ग्वाल्हेर-आग्रा संगम, जयपूर-अत्रौली परंपरा, किराणा परंपरा आणि पतियाळा परंपरा अशा या पाच शैली. या पाच शैलींमधून निर्माण झालेले ख्याल संगीत हे अत्यंत विकसित होते आणि त्यातून घडलेल्या गायक कलाकारांमुळे हिन्दुस्थानी संगीतातले सुवर्णयुग अवतरले असे राजांचे म्हणणे आहे. ३१६ पृष्ठांच्या या पुस्तकाचा सारांश एक वाक्यात सांगायचा झाला तर तो याप्रमाणे सांगता येईल की, ‘विसाव्या शतकातल्या गायक कलाकारांपैकी अब्दुल करीम खाँ यांनी श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले; अमीर खाँ यांनी त्यांना गानसमाधीचा अनुभव दिला; केशरबाई केरकरांनी त्यांना ‘आ’ वासायला लावला आणि फैयाझखाँनी त्यांना नर्तन करायला प्रवृत्त केले!’ हे सर्व कसे घडले याची प्रक्रिया दीपक राजांनी अत्यंत तलम व मुलायम इंग्रजी परिभाषा वापरून सांगितले आहे.
अर्थात राजा यांचे पूर्वग्रह किंवा दूषित मते वारंवार डोकावतातच. मुळात ख्याल गायकीचा मूळ स्रोत म्हणून गणल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर परंपरेविषयी त्यांना फारशी माहिती नाही. माहिती नसेल तर ती करून घेण्याचे कष्टही त्यांनी घेतलेले नाहीत. ‘ग्वाल्हेर-आग्रा’ अशी एक सरधोपट श्रेणी करून त्यांनी गजाननराव जोशी, यशवंतबुवा जोशी आणि उल्हास कशाळकर यांचे वर्गीकरणे केले आहे. त्यातून अस्सल ग्वाल्हेर परंपरा दुर्लक्षित राहिली आहे.
लयीचा वेग आणि गाण्यतली सूक्ष्मता यांचा चुकीचा संबंध राजा यांनी लावला आहे. विशेषत: बडय़ा ख्यालाच्या मांडणीच्या संदर्भात! कृष्णराव शंकर पंडितांसारख्या ग्वाल्हेर परंपरेच्या मूळ स्रोतातून आलेल्या गवयाने फैयाझखाँच्या मर्दानी गायकीचे अनुकरण केले असल्याचे मत लेखकाचे अज्ञान दर्शविते किंवा फैयाझखाँच्या शैलीच्या वारशासंबंधी लिहिताना ते म्हणतात की, ‘रातंजनकर शाखेचे कृष्णा गुंडो मिंडे, भट्ट आणि दिनकर कायकिणी हे शिक्षक म्हणून यशस्वी ठरले असले तरी पहिल्या प्रतीचे कलाकार म्हणून अयशस्वी ठरले.’ ज्यांनी कायकिणी अथवा चिदानंद नगरकरांच्या रंगतदार मैफली ऐकल्या आहेत त्यांना हे विधान वाचून धक्का बसेल किंवा मल्लिकार्जुन मन्सूर हे नाव वगळता त्यांना जयपूर-अत्रौली घराण्यात कुणाची दखल घ्यावी अशा पुरुष कलाकाराचे नाव आढळत नाही. रत्नाकर पै किंवा आताच्या पिढीतले दिनकर पणशीकर अथवा रघुनंदन पणशीकर यांचे काय, असा मग प्रश्न पडतो.
एखाद्या शैलीचा आढावा घेताना त्या शैलीतल्या महत्त्वाच्या सर्व गायकांचा तौलनिक अभ्यास व्हायला हवा. किराणा घराण्याचे नाव अवघ्या विश्वात दुमदुमले ते भीमसेन जोशींमुळे. त्यांना वगळून किराणाविषयी कसे लिहिता येईल? मोगूबाई कुर्डीकरांना टाळून जयपूर-अत्रौलीचा अभ्यास पूर्ण होईल का? ख्याल परंपरेचे सातत्य आणि त्यातली परिवर्तने हा अभ्यासाचा विषय असेल तर कुमार गंधर्वाचा केवळ ‘रोमँटिक बंडखोर’ म्हणून उल्लेख करणे पुरेसे आहे का? त्या मानाने ‘नव जयपूर अत्रौली’ अशा नामाभिधानाखाली किशोरी आमोणकरांच्या गायकीचे थोडेफार विश्लेषण करण्यात आले आहे, हीच काय ती चांगली बाजू. अशा उणिवा असल्या तरी हे पुस्तक अभ्यासूंनी जरूर वाचावे. उल्हास कशाळकर यांची प्रस्तावना वाचनीय असून त्यात त्यांचे पारदर्शक व्यक्तिमत्त्व दिसते.
अमरेन्द्र धनेश्वर
ख्याल व्होकॅलिझम्
कंटिन्यूटी विदीन चेंज
लेखक : दीपक राजा;
प्रकाशक : डी. के. प्रिन्टवर्ल्ड, नवी दिल्ली;
पृष्ठे ३१६; किंमत रु. ४६०.