Leading International Marathi News Daily
शनिवार, ७ मार्च २००९
विविध

काँग्रेस प्रचारमोहिमेत सहभागी होण्यासाठी युवा व्यावसायिक उत्सुक
नवी दिल्ली, ६ मार्च/एक्स्प्रेस वृत्तसेवा

 

खासदार राहुल गांधी यांचा युवावर्गामध्ये प्रभाव वाढतोय असा दावा काँग्रेसपक्षीय नेहमी करीत असतात. हे कारण असो किंवा आर्थिक मंदी. कारण कोणतेही का असेना परंतू काँग्रेसच्या प्रचारमोहिमेच्या कामांमध्ये सहभागी करुन घेण्याची विनंती जगातील अनेक युवा व्यावसायिकांनी या पक्षाच्या प्रचारधुरिणांकडे केली आहे. पक्षकार्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणारे जयराम रमेश यांना युवा व्यावसायिकांकडून काँग्रेसच्या प्रचारमोहिमेत सहभागी करून घेण्याची विनंती करणारे किमान ५० इ-मेल दररोज येतात. आयआयटीचे पदवीधर, एमबीए, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व अन्य क्षेत्रातील व्यावसायिकांचा मुख्यत्वे हे इ-मेल पाठवितात. हे मेल जगभरातून येत असतात. यासंदर्भात जयराम रमेश यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चारच दिवसांच्या आत मला २५० इ-मेल आले. आपल्याला काँग्रेसच्या प्रचारमोहिमेत आम्हाला सहभागी करून घ्यावे अशी विनंती युवा व्यावसायिकांनी या इ-मेलमध्ये केली होती. २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळातही काँग्रेसच्या प्रचारमोहिमेत सहभागी करून घेण्यासंदर्भात अनेकांचे असेच इ-मेल आले होते अशी आठवणही जयराम रमेश यांनी सांगितली. काँग्रेस पक्षाकडे प्रचारमोहिम सांभाळण्यासाठी युवा कार्यकर्त्यांची वानवा नाही. राहुल गांधी यांनी युवक काँग्रेस व एनएसयुआयला पक्षाच्या प्रचारासाठी प्रेरित केले आहे. प्रचारमोहिमेमध्ये सहभागी करून घेण्याची विनंती युवा व्यावसायिकांकडून होत आहे, यामागचे आर्थिक मंदी हे देखील एक कारण असावे असे सांगून जयराम रमेश म्हणाले की, राहुल गांधी हे युवकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि युवा मतदार हे काँग्रेससाठी अत्यंत महत्वाचे आहेत.

विदेशी परिचारिकांना आता अमेरिकेत ‘नो एन्ट्री’
वॉशिंग्टन, ६ मार्च/पीटीआय

अमेरिकेतील आरोग्य क्षेत्रास परिचारिकांची मोठय़ा प्रमाणावर टंचाई जाणवत असली तरी भारतासह अन्य देशांतील परिचारिकांना येथे नोकरी देण्यास अध्यक्ष ओबामा बराक यांनी विरोध दर्शविला आहे. अमेरिकेतील रोजगार संधी अन्यत्र जाऊ नयेत यासाठी आऊटसोर्सिगला विरोध करणाऱ्या ओबामांनी अंदाजपत्रक सादर करताना अनुदानाचा फायदा केवळ आऊटसोर्सिगशिवाय काम करणाऱ्या कंपन्यांनाच मिळेल, असे जाहीर केले होते. ओबामा यांच्या या धोरणाचा भारतासह माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या देशांना चांगलाच फटका बसणार आहे. भारताने या धोरणाच्या विरोधात टीकेचा सूरही लावला होता. आऊटसोर्सिगपाठोपाठ ओबामांनी विदेशी परिचारिकांना अमेरिकेत नोकरीस विरोध केल्याने याचा चांगलाच फटका भारतासह तिसऱ्या जगातील आशियायी देशांना बसणार आहे. अमेरिकेतील रुग्णालयात भारत, चीन फिलीपाईन्समधील नागरिक प्रामुख्याने कामाला असतात. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांविषयी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या एका बैठकीत ओबामा म्हणाले की, आपणाला परिचारिका आयात कराव्या लागतात ही काही चांगली बाब नाही. परिचारिकांच्या टंचाईवर मात करण्यासाठी देशातील महिलांना प्रशिक्षित करणे हाच एक चांगला मार्ग आहे. अमेरिकेला येत्या सात वर्षांत पाच लाख परिचारिकांची टंचाई जाणवेल, असा अंदाज या बैठकीत व्यक्त करण्यात आला.