Leading International Marathi News Daily
शनिवार ७ मार्च २००९

मंदीत घर खरेदी करण्यापूर्वी सावधानता ही प्रत्येकाने ठेवलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून चांगल्या घराची निवड केली पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवावयास हव्यात. त्याची ही चर्चा-
इमारत, आयुष्यात प्रत्येक माणसाचे स्वप्न असते की त्या उंच व सुंदर इमारतीत आपलासुद्धा एक फ्लॅट असावा, आपले स्वत:चे घर त्यात असावे. स्वप्ने ही प्रत्येक माणसांनी बघितलीच पाहिजेत तरच मनात व हृदयात आशा व अपेक्षांचे सप्तरंग तयार होत असतात व त्याच आशेवर माणसांची, आयुष्याची अनेक वर्षे पुढे पुढे जात असतात व त्या आशा पूर्ण करण्यासाठी मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात सतत धडपड करीत असतो. मनात जिद्द व चिकाटी असेल तर त्या स्वप्नांची पूर्तता करणेसुद्धा सहजसाध्य होऊ शकते. आपण मागे वळून बघितल्यास काळानुसार ही साध्यसुद्धा बदलत असतात, नवीन जिद्द धारण करीत असतात.
पूर्वीच्या काळी सेवानिवृत्त झालेले लोकच नवीन घर घेण्याच्या उद्देशाने किंवा नवीन घर बांधण्याच्या इच्छेने बाहेर पडत असत. आपल्या सेवेच्या कालावधीत मुला-मुलीचे शिक्षण, कर्जे काढून त्यांची लग्ने करून द्यायची, त्यांचे संसार उभे करायचे

 

व सरतेशेवटी निवृत्त होऊन आयुष्यभर जमवलेले पैसे, ग्रॅज्युटी, पीएफचे पैसे घेऊन नवीन घरांच्या शोधात फिरत असत व घर घेत असत. ही झाली वयोवृद्ध साध्यता. पण आजघडीचे चित्र खूपच वेगळे आहे. प्रत्येक तरुणाला वाटत असते की मी पहिल्यांदा उच्चशिक्षण घेईन, तीन-चार वर्षे चांगली नोकरी करून, पैसे जमवून व बाकीच्या रकमेचे कर्ज घेऊन फ्लॅट घेईन व नंतरच लग्न करीन. तर ही झाली आजची तरुण साध्यता. आपण बघितलं की ह्य़ा दोन मानसिकतेत खूप मोठा परिणामकारक बदल झाला आहे. जागतिक क्रांतीच्या बदलात भारतात होणारा व झालेला हा बदल खूपच महत्त्वाचा मानला जातो. ५८ व्या वर्षी घर घेणाऱ्या त्या माणसाचे रूपांतर आज २८ वर्षांच्या तरुणात झाले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ६० वर्षांच्या या कालखंडातील हा बदल तब्बल ३० वर्षांनी कमी झाला आहे व हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे म्हणूनच भारतीय तरुण हा जगाला आपल्या नजरेत दिसत आहे.
आयटी क्षेत्रापासून ते कॉलसेंटपर्यंतच्या सर्वच क्षेत्रात, आजच्या महागाईच्या काळातसुद्धा सर्वाना चांगलाच पगार असल्याने साहजिकच या काम करणाऱ्या वर्गाचे राहणीमान उंचावले असून त्यांच्या घराच्या आशा-अपेक्षासुद्धा खूपच उंचावल्या आहेत व या मोठय़ा पगारदारांसाठी इमारती बांधणाऱ्या बिल्डरांनी 3 BHK, 4 BHK च्या संकल्पना मांडल्या व बघता बघता जिकडे बघावे तिकडे मोठमोठय़ा एरियाचे फ्लॅटस् बांधले जाऊ लागले. या उच्च वर्गाचा सर्वात जास्त फायदा बिल्डरांनी चांगलाच घेतला व खूपच कमावता येते म्हणून ही संकल्पना उचलून धरली नि सर्वसामान्यांकडे सतत दुर्लक्ष करून त्यांना नेहमीच नाराज केले. हे सर्व घडत असतानाच मंदीची लाट अमेरिकेत निर्माण झाली व बघता बघता साऱ्या जगावर मंदीचे सावट आल्याने बुश प्रशासनाचा अखेर व तरुण ओबामांच्या राज्याभिषेकावरसुद्धा मंदीची सावली पडली नि सर्वच क्षेत्रातील उच्च पगार घेणाऱ्या व्हाईट कॉलरवर सर्वात जास्त संक्रात आली, त्यांच्या नोकऱ्या गेल्या व त्यांच्याबरोबर बिल्डरांचेसुद्धा मनसुबे धुळीस मिळाले व रियल इस्टेटमध्ये खरी मंदी आता खरोखरीच जाणवू लागली. हातातले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, कंपनीचे रोलिंग चालवण्यासाठी, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी व स्वत:ची होल्डिंग कॅपेसिटी संपल्याने, गुंतवलेले पैसे सोडविण्यासाठी व आपल्या वरील मंदीच्या ग्रहणातून सुटका करून घेण्यासाठी व या संकटातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा ‘येरे माझ्या मागल्यांचा’ प्रयोग सुरू झाला व बिल्डरांना पुन्हा एकदा सर्वसामान्य ग्राहकवर्गाची आठवण व त्याची गरज वाटू लागली. 1 BHK व 2 BHK पुन्हा बनायला सुरुवात झाली नि बंद केलेल्या प्रॉडक्टची मागणी वाढली व बिल्डरांच्या कंपन्या ऐन मंदीत पुन्हा धडधडू लागल्या. ‘आम्ही लहान फ्लॅट बनवतच नाही’ असे हसत म्हणणाऱ्या बिल्डरांनी मग ग्राहकवर्गाला खेचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालू केली व सर्वसामान्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ची हाक दिली. एकावर एक फ्री, फ्लॅटवर पार्किंग फ्री, गाडी फ्रीपासून आलिशान भेटवस्तू, रजिस्ट्रेशन, स्टॅम्प डय़ुटी माफी व अनेक सोयी-सुविधांचा खजिना असलेली आमिषे दाखवून व त्यांच्या सोयीनुसारच विचार करायला सुरुवात केली. व्याजदरात कपात करूनसुद्धा परिस्थिती सुधारत नसल्याचे पाहून सरतेशेवटी, नाईलजाने त्यांना घराच्या किमती कमी केल्यावाचून पर्यायच उरला नाही. आणि त्यानंतर खऱ्या स्पर्धेचा आरंभ झाला.
सर्वच बिल्डरांनी आपआपल्या परीने गणिते मांडायला सुरुवात केली. कोणी पॅकेजचा फंडा काढला तर कोणी सरळ फुटामागे किंमतच कमी करून दाखवली. प्रत्येकांनी घराच्या किमतीचा आलेख खाली-खाली नेण्यास सुरुवात केली व किमतीमध्ये प्रत्यक्ष ‘करेक्शन’ करून ग्राहकवर्गाला खूष करण्याचे प्रयत्न जारी ठेवले पण या गोंधळात, अस्थिरतेच्या वातावरणात ग्राहकवर्ग पुरता गोंधळून गेला. खरंच किमती कमी झाल्या का? अजून किंमत कमी होईल का? अशा एक ना अनेक विचारांनी ग्राहकवर्गाची ‘कन्फ्युजन सिस्टिम’ खरोखरीच जास्त स्ट्राँग झाली व स्वत:ला सांभाळणे कठीण झाले.
जगात पसरलेली मंदी व त्यातच रियल इस्टेटमधील मंदी ही ‘ज्यांना घराची खरोखरच गरज आहे’ असा ग्राहकवर्ग ज्याला आपण ‘प्रत्यक्ष खरेदीदार’ अॅक्चुयल बायर’ (Actual Buyer) म्हणू त्यांच्यासाठीच आहे. यापूर्वी तेजीच्या व अव्वाच्या सव्वा किमतीच्या बाजारात ज्यांचा टिकाव लागला नाही, ज्यांनी घरखरेदी हा विषयच मनातून काढून टाकला होता त्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा आता जर का घेतला नाही तर पुढे ती गोष्ट शक्य होणार नाही, ही वेळ फक्त आपल्यासाठीच खास आली आहे व त्यातून लवकरात लवकर आपण आपल्या स्वप्नांची पूर्तता करून घेतल्याशिवाय व अशाच वेळी आपण आपला रद्द केलेला बेत पुन्हा आखायला काही हरकत नाही. यासारखी दुसरी सुवर्णसंधी येणारही नाही. सर्वसामान्य ग्राहकांशिवाय बिल्डरांना आजच्या काळात कोणी वालीच नाही. कारण त्यांचे गुंतवणूकदार फक्त तेजीच्या घोडेबाजारातच धावतात अन्यथा तोंडसुद्धा दाखवत नाहीत.
पण मंदीत घर खरेदी करण्यापूर्वी सावधानता ही प्रत्येकाने ठेवलीच पाहिजे. नाहीतर दररोज येणाऱ्या नवनवीन आकर्षक जाहिरातींच्या फंदात अडकले जाण्याची व फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. ग्राहकवर्गात खळबळ माजेल अशा पद्धतीने या जाहिराती वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर व रस्त्यांवर मोठमोठे होर्डिग्ज सतत झळकत असल्याने आपल्या मनावर ताबा ठेवून व प्रत्येक गोष्टीची खातरजमा करून चांगल्या घराची निवड केली पाहिजे. नामांकित
व प्रतिष्ठित बिल्डरांना जाहिरात देण्याची गरज भासत नाही. कारण त्यांचा माल हा त्यांच्या गुणवत्तेवर, नावावर व अगोदर केलेल्या उत्तम कामांवर, सॅटिस्फाईड कस्टमरवर विकला जातो म्हणूनच त्यांना ‘जेनुयन’, ‘रॉयल’, ‘प्रोफेशनली’ म्हटले जाते. पण सर्वच बिल्डर हे आपआपल्या पद्धतीने इमारतीची विक्री करीत असतात व आपल्याला चांगल्या घराची निवड करण्यासाठी बऱ्याच बाबी माहिती असायला हव्यात. एक नजर या गोष्टींवर टाकू या!
१) ज्या बिल्डरचे आपण घर घेऊ इच्छितो तो नामांकित बिल्डर (Reputed Builder) व त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रकल्पांची पाहणी, वेळेवरती ताबा दिलेल्या इमारती व लोकांचे त्यांच्याविषयी मार्केटमध्ये असलेले मत व त्यांच्या अगोदरच्या ग्राहकांमध्ये त्याचे मत हे सर्व पाहणे गरजेचे आहे.
२) संगणकावर बनवलेल्या रंगीबेरंगी ब्रोशरवर भुलू नका, पेमेंट शेडय़ुलचा नीट विचार करावा.
३) इमारतीचे नकाशे, आराखडे, डिझाईन व स्पेसिफिकेशन (Specifications) बघावेत व ते सर्व प्लॅन महानगरपालिकांकडून पास झालेले आहेत की नाही ते पाहावे.
४) प्लॅनमध्ये असणारा प्लॅटचा कारपेट एरिया व त्यावर केलेले लोडिंग किती टक्के आहे? ३० टक्के, ४० टक्के किंवा त्याहून अधिक या बिल्डरांच्या गणिती पद्धतीचा नीट अभ्यास करायला व त्या सर्वाचा हिशेब प्रत्येक ग्राहकाला यायलाच पाहिजे व या एरियाच्या संदर्भातच ग्राहकांची जास्त फसवणूक होण्याची शक्यता असते.
५) प्रत्यक्ष साईटवर जाऊन जागेची पाहणी करावी व त्या प्रकल्पासाठी महानगरपालिकेने दिलेल्या दाखल्यांची प्रतसुद्धा बघावी. त्यामध्ये
१. जमीनमालकाचे नाव व पत्ता, फोन नंबर २. विकासकाचे नाव, पत्ता व फोन नंबर ३. सिटी-सव्र्हे नंबर ४. कमेन्समेंट सर्टिफिकेट (Commencement Certificate) चा नंबर व तारीख. ५. आयओडी (IOD) नंबर व तारीख ६. आर्किटेक्टचे नाव, पत्ता व लायसन्स नंबर ७. आरसीसी कन्सल्टंटचे नाव, पत्ता व लायसन्स नंबर ८. प्लॉट एरिया (Plot Area) ९. नियोजित बांधकाम एरिया (Proposed Built up Area) १०. प्लिंथ एरिया (Plinth Area) ११. परवानगी मंजुरीची तारीख व त्या मंजुरीचा नंबर १२. आर.जी. एरिया (नियोजित रिझव्र्ह एरिया) १३. यूएलसी नंबर व तारीख (ULC No. & date)
वरील १ ते १३ पर्यंतच्या सर्व परवानगीचे नंबर तारखेसहित बोर्डवर लावणे व प्रत्यक्ष इमारतीच्या, प्रकल्पाच्या जागेवर लावणे बंधनकारक आहे. वरील सर्व परवानगी असल्यास तो प्रकल्प सरकार मंजूर आहे असे समजावे व अशाच ठिकाणी आपण घर घ्यावे.
६) एन. ए. सर्टिफिकेट (NA Permission), डेव्हलपमेंट परमिशन व कमेन्समेंट सर्टिफिकेट असल्याशिवाय कोणतेही व्यवहार करू नये.
७) ताबा घेण्याची निश्चित वेळ नीट समजून घ्यावी.
८) बिल्डर आपल्याला ज्या अॅमिनिटीज, सोयीसुविधा देणार आहे त्या स्पष्ट व तपशीलवार असाव्यात. उदा. फ्लोरिंगची कंपनी, साइज व रंग, प्लंबिंगमध्ये पाण्याच्या पाईप्सची कंपनी, ग्रेड, बाथरूममधील नळ फिटिंग, कंपनी व मेक, किचनसाठी ग्रॅनाइट, स्टील सिंक, खिडक्या, ग्रिल, दरवाजे, लॉक्स, इलेक्ट्रिकमध्ये वायरची कंपनी, एमसीबी, स्विचेस, रूममधील पॉइन्टस्, भिंतीचा आतील व बाहेरील रंग, पीओपी किंवा जिप्सम या व इतर अनेक गोष्टी नीट विचारून घ्याव्यात किंवा सँपल फ्लॅट तयार असेल तर नीट व व्यवस्थितपणे पाहून घ्याव्यात. तसेच प्रत्येक गोष्टीची स्पष्टता करून घेणे सर्वात चांगले. काही शंका असल्यास किंवा काही सजेशन असल्यास त्याच वेळेस निदर्शनास आणून देणे.
प्रत्यक्ष साईटवरती नुसताच कुंपण घालून बुकिंगसाठी मंडप घातला असेल व बोर्डवर लिहिलेली कोणत्याही प्रकारची माहिती नसेल, तर नुसत्या जाहिरातीच्या व बुकिंग अमाऊन्ट कमी आहे म्हणून चेकबूक घेऊन पळत सुटू नका. ग्राहकांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की आपण दहा रुपयांची भाजी घेताना दहा चौकशा करून चांगलाच वेळ घेतो तर लाखांच्या घरासाठी किती वेळ त्यांनी द्यायला पाहिजे. एकाच दिवसात माल विकण्याची घाई बिल्डरला झाली आहे, आपल्याला नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. मी असे समजतो की लाखांचे घर घेणारा हा वर्ग नक्कीच सुशिक्षित व सुसंस्कृत आहे. चार दिवस रजा घेऊन फॅमिलीसोबत मार्केट सव्र्हे केल्याने चार ठिकाणचे भाव व गुणवत्ता समजते. चांगल्या घराची, चांगल्या बिल्डरची व रास्त वाजवी किमतीची घरे निवडणे सोपे जाईल. सदर प्रकल्पांना नामांकित बँकांची तसेच गृहवित्त पुरवठा संस्थांची मान्यता आहे की नाही हेसुद्धा बघावे व सदर प्रकल्पांची त्यांच्याकडेसुद्धा चौकशी करून खात्री करून घ्यावी.
आधीच्या प्रकल्पांसाठी बिल्डरने घेतलेल्या मोठय़ा रकमेचे कर्ज सध्याच्या मंदीत फेडणे जड जात असल्याने त्यांच्याकडून घाई होणे स्वाभाविकच आहे. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, जशी आपल्याला गरज आहे तशी गरज बिल्डरलासुद्धा आहे. त्याला शेकडो फ्लॅटस् विकायचे आहेत व आपल्याला एकच फ्लॅट घ्यायचा आहे. या विचाराने बघितले तरी किंवा ‘नशीबपण काहीतरी चीज आहे’ असे म्हणतात! मग घाई करून फसवणूक का करून घेता? तुमच्या नशिबातील ते घर दुसरं कोणी घेऊच शकत नाही व बिल्डरसुद्धा तुमच्याशिवाय कोणालाही देऊ शकत नाही असा विश्वास जर तुमच्या मनात असेल व असलाच पाहिजे कारण त्याच विश्वासावर तर हे सर्व विश्व उभे आहे, टिकून आहे, हे जग विसावले आहे व हेच एकमेव निर्विवाद सत्य असावे!!!
सुधीर ज. मुकणे
लेखक संपर्क : ९८२१३८६६१४.