Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९

राष्ट्रवादी बरोबर आले तर ठीक, अन्यथा ‘एकला चलो रे’ची काँग्रेसची भूमिका
औरंगाबाद, ७ मार्च/खास प्रतिनिधी
जातीयवादी शक्तीचा बिमोड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर तडजोड करावी अशी अपेक्षा व्यक्त करून काँग्रेसच्या नेत्यांनी ते सोबत आले नाही तर एकला चलो रेची भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे. औरंगाबादच्या गरवारे स्टेडियमवर काँग्रेसतर्फे आयोजित विराट सभेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे.

पवार लढणार माढामधून
पुणे, ७ मार्च / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर सोलापूर जिल्ह्य़ातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा आज पुण्यात केली. त्यांच्या या घोषणेने पवार लोकसभा निवडणूक लढणार की नाहीत, लढले तर कोणत्या मतदारसंघातून लढतील अशा सर्व चर्चाना आज पूर्णविराम मिळाला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मोहिते कुटुंबीयांमध्ये मोठा कलह निर्माण झाला होता. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच माजी खासदार प्रतापसिंह मोहितेपाटील यांनी थेट प्रचाराचा नारळ फोडून आपण रिंगणात असल्याचे जाहीर केले होते. तर, दुसरीकडे त्यांचे बंधू व राज्याचे पर्यटनमंत्री विजयसिंह मोहितेपाटील यांना आपल्या चिरंजीवांना (रणजित) माढय़ातून लोकसभेवर पाठवायचे होते. हा गृहकलह विकोपाला जाऊ लागल्याने विजयसिंह मोहितेपाटील यांनी पवार यांनाच माढय़ातून लढावे अशी गळ घातली. पवारसाहेब स्वत माढय़ातून लढणार असतील तर आपण माघार घेऊ, अशी भूमिका प्रतापसिंहांनीही जाहीर केली.

शिवसेनेचे पवार पुराण
मुंबई, ७ मार्च/प्रतिनिधी

खोटेपणा, थापेबाजी, विश्वासघात, दगाबाजी रसायन म्हणजे शरद पवार.. पवार व विश्वासार्हता यांचे नाते कधीच जमलेले नाही.. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने ३८व्या वर्षी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला.. दादा, मृणाल गोरे, दत्ता पाटील यांच्याशिवाय त्यांचेच गुरू यशवंतराव चव्हाण आणि सोनिया गांधी यांनाही दगाफटका केला.. शरद पवार हा एक राजकीय विश्वासघाताचाच प्रवास आहे.. ही निरीक्षणे आहेत शिवसेनेची. अधिकृतपणे शिवसेनेच्याच प्रचार साहित्यात प्रकाशित झालेली, पण त्याचा सोयीस्कर विसरही पडलेली..पवार पुराण हे शिवसेनेचेच एक अधिकृत प्रकाशन.. शिवालयातून प्रकाशित झालेले, म्हणजे तुलनेने तसे ताजे.. किऱ्रण वाडीवकर हे त्या पुस्तिकेचे प्रकाशक.. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या जनतंत्र २००९ या प्रदर्शनात ही पुस्तिका ठेवण्यात आली आहे..

युतीचे घोळाचे गुऱ्हाळ सुरूच
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिवसेना आणि भाजपमध्ये अनुक्रमे २० आणि २५ जागांवर समाधानकारक चर्चा झाली असली तरी राज्यातील तीन मतदारसंघ युतीमधील चर्चेतील कळीचा मुद्दा ठरले आहेत. या तीनपैकी सर्व जागांवर शिवसेनेने दावा केला असून भाजपही त्यापैकीच एका जागेवर अडून बसल्याने आज झालेल्या चर्चेत समाधानकारक तोडगा निघून शकला नाही. परिणामी तीन जागांचा तिढा अद्यापही कायम आहे.

पंतप्रधानपदाचे उमेदवार मनमोहनसिंगच असल्याचे पवारांकडून वदवून घ्या काँग्रेसच्या नेत्यांचा आग्रह
औरंगाबाद, ७ मार्च/प्रतिनिधी

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून डॉ. मनमोहनसिंग आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याकडून वदवून घेतल्यानंतरच त्यांच्याशी वाटाघाटी करा अशी स्पष्ट भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेतली. या वृत्ताला नाव न सांगण्याच्या अटीवर एका ज्येष्ठ नेत्याने दुजोरा दिला. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला पवार हवेत की अडवाणी? असा जाब विचारला आहे. त्याच पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीला जाब विचारणार आहे. डॉ. मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचे शरद पवार यांनी मान्य करावे अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. शरद पवारांना पंतप्रधानपद मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. जागा वाटपाची तडजोड करताना राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्याचे पडसाद काँग्रेस कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत उमटले. नाशिक येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ‘इस बार शरद पवार’ अशी भूमिका राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांनी घेतली आहे.

शिवसैनिकांना ४८मतदारसंघात ‘कामाला लागा’चे फर्मान?
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

लोकसभेच्या जागावाटपाबाबत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुरू असलेली चर्चा अद्याप पूर्ण झालेली नसतानाच युती होणार किंवा नाही हेच अंधातरी आहे असे स्पष्ट करीत शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नजीकच्या काही नेत्यांनी एका अनौपचारिक बैठकीत शिवसैनिकांना सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात ‘कामाला लागा’चे फर्मान दिले आहे. यामुळे काही शिवसैनिक उत्साहित झाले आहेत तर काही संभ्रमात पडले आहेत. शिवसैनिकांचे शिबिर दादरच्या किंग जॉर्ज हायस्कुलात आज आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मार्गदर्शन केले. भाजपबरोबर युती होणारच. आपण त्या चर्चेत सहभागी असल्यामुळे ठामपणे सांगत आहोत, असेही जोशी यांनी यावेळी सांगितले. मात्र जोशी निघून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या खास वर्तुळातील काही नेत्यांनी अनौपचारीक चर्चेत युतीचे काहीही खरे दिसत नाही, असे उपस्थित शिवसैनिकांना सांगितले. युती होईल तेव्हा पाहू. तूर्तास तुम्ही ४८ लोकसभा मतदारसंघात कामाला सुरूवात करा, असेही या नेत्यांनी सांगितले. हे नेते उद्धव यांच्या खास मर्जीतील असल्यामुळेच शिवसैनिकांमध्ये युतीबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तानात दोन बॉम्बस्फोट; दहाजण ठार
इस्लामाबाद, ७ मार्च / पी. टी. आय.

पाकिस्तानच्या वायव्य भागात दहशतवाद्यांनी केलेल्या दोन बॉम्बस्फोटात किमान दहाजण ठार झाले तर नऊजण जखमी झाले. सीमावर्ती वायव्य प्रांतात गस्तीवर असलेल्या एका पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी रिमोट कंट्रोलने नियंत्रित केलेल्या मोटारीत बसविलेल्या बॉम्बचा स्फोट घडविला. पेशावर शहराबाहेर हा स्फोट करण्यात आला. त्यात आठजण ठार झाले व तीनजण जखमी झाले. एक व्हॅन शोधण्याच्या कामात असताना पोलिसांचे हे पथक त्या व्हॅनजवळ जाताच त्या व्हॅनमध्ये बसविलेल्या बॉम्बचा स्फोट करण्यात आला. त्यात एकजण बसलेलाही होता, असे पोलिसांनी सांगितले. या स्फोटासाठी किमान ३० किलो वजनाच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला असावा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दारा आदम खेत येथे अन्य दुसऱ्या घटनेत लष्कराच्या ताफ्यावर रस्त्यावर पेरलेल्या रिमोटकंट्रोल नियंत्रित बॉम्बचा स्फोट केला गेला. त्यात दोन नागरिक ठार झाले व सहा सुरक्षा जवान ठार झाले. या भागात तालिबानींचे अस्तित्व असून संवेदनशील म्हमून हा भाग मानला जातो.

 


 

प्रत्येक शुक्रवारी