Leading International Marathi News Daily
रविवार, ८ मार्च २००९

जनजागरण विकास यात्रेच्या समारोपानिमित्त काँग्रेसने औरंगाबादेत कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि विराट सभा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. सर्व जनतेला अभिवादन करताना राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, उद्योगमंत्री नारायण राणे, महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष जयवंत आवळे. समोर सभेस जमलेला विराट जनसमुदाय.

शक्तिप्रदर्शनाने काँग्रेसचा प्रचाराचा नारळ फुटला
औरंगाबाद, ७ मार्च/खास प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक येथील सभेच्या तोडीसतोड सभा घेऊन औरंगाबादमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. आज गरवारे स्टेडियममध्ये काँग्रेस प्रदेश समितीतर्फे आयोजित जनजागरण विकास यात्रेचा समारोप आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन राष्ट्रवादीच्या नाशिकच्या सभेला जोरदार उत्तरही दिले आहे.राज्यात आमची शक्ती वाढली आहे आणि जनाधार आमच्या बाजूने आहे असे सांगत नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी सभा घेतली होती. त्यामुळे औरंगाबादच्या सभेकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. काँग्रेसनेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर देत विराट सभा औरंगाबादेत घेऊन दाखविली.

‘माउली’ थिटे
बस चालू होणारच होती. रात्रीची साडेदहा-अकराची वेळ. जागा बऱ्यापैकी होती. म्हणजे जेवढय़ा जागा भरलेल्या तेवढय़ाच रिकाम्या. आशावादी आणि निराशावादी. दोघांनाही खूश करणारी परिस्थिती होती. बस सुटणारच; तेवढय़ात एक प्रवासी आला. तिघांच्या बाकावर ऐसपैस बसलेल्या एकाला त्याने विचारले. ‘आहे का जागा; का कोणी बसलंय?’ ‘मागं रिकामीचंय की सगळी गाडी. जावा.’ ऐसपैसच उत्तर!आपली गंमत असते. गाडी भरलेली असली की, आपण काकुळतीला येऊन ‘उभा राहून येतो, पुढं ड्रायव्हरजवळ बसतो’, असं विनवत राहतो. जागा असली की, नाटकं सुरू होतात.

महिला बचत गटातून फुलली भाजीपाला शेती
हरिहर धुतमल, लोहा, ७ मार्च

शेतात काहीच पिकले नाही.. कर्जबाजारी झालो म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या. कोरडवाहू शेतात उत्पन्न जास्त होईना म्हणून गावातून शहराकडे येणाऱ्यांची वाढती संख्या अशा परिस्थिीतच वाळकेवाडी (ता. लोहा) येथील शिवकाशीबाई माणिकराव महागावकर यांनी बचत गटाच्या माध्यमातून शेतात विहीर खोदली. त्यावर चार एकरात भाजीपाल्याची शेती करून उत्पन्न काढले. जिद्द व मेहनतीतून बचत गटातून शेती ओलिताखाली आणू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण.

आत्मसन्मान जपणारी स्वयंसिद्धा
गणेश कस्तुरे, नांदेड, ७ मार्च

सुखाच्या झोक्यावरचे हिंदोळे अनुभवतानाच अचानक काळाने चहूबाजूने हल्ले चढवून दु:खाचे डोंगर उभे करावेत तरीही जरासुद्धा न खचता त्या दु:खांना समर्थपणे परतवून लावत उद्ध्वस्त होऊ पाहणाऱ्या आयुष्यात स्वत:च प्रचंड मेहनत व जिद्दीने प्राण फुंकणाऱ्या सुमनची ही कहाणी जितकी करुण तितकीच प्रेरणादायी आहे. ‘..मी कात टाकली’ म्हणत सुमनने आयुष्याला आव्हान देऊन पेलले आहे.

प्रेमा, तुझा रंग कसा?
अंबाजोगाईच्या विश्रामगृहामधली दुसऱ्या दिवसाची तांबूस, लालबुंद पहाट. आदल्या दिवशी झालेल्या ‘प्रकारा’मुळं मी, खानसामा नि वॉचमन- आम्ही तिघंही रात्री ‘सावध झोपे’तच होतो, त्यामुळं तिघांनाही पहाटे साडेचार-पाच वाजताच जाग आली. खानसाम्यानं चांगला दीड-दोन ‘नवाबी’ कप भरतील असा गरमगरम चहा सुंदर थर्मासमध्ये आणला होता. त्या उत्साहातच मी अंबाजोगाई ते उदगीरची बस गाठली. त्यावेळी नि नंतर विद्यापीठाचा प्रोफेसर व मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त होईपर्यंत मजजवळ चार चाकी वाहन नव्हतं तर स्कूटरच होती.

लातूरमध्ये १३ रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
लातूर, ७ मार्च/वार्ताहर

राजर्षी शाहू महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने ‘ग्लोबल वॉर्मिग’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे १३ व १४ मार्चला आयोजन करण्यात आले असून या परिषदेत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हवामानातील बदल व जागतिक तापमानवृद्धी हे आज अतिशय महत्त्वाचे विषय बनलेले आहेत. त्याचा सर्वच सजीवसृष्टीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर चर्चा करून उपाययोजना आखणे हा या परिषदेचा उद्देश आहे. या परिषदेसाठी दिल्लीचे डॉ. आर. के. काळे, हैदराबादचे डॉ. एम. एस. कोदरकर, पश्चिम बंगालचे डॉ. पी. के. सुर, गोव्याचे डॉ. बबन इंगोले, पुण्याचे डॉ. पी. एन. महाजन, मुंबईचे डॉ. एस. व्ही. देशमुख, पुण्याचे डॉ. आर. के. त्रिवेदी, नाशिकचे डॉ. प्रमोदकुमार हिरे, कोल्हापूरचे डॉ. जी. पी. भावने व इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

महिला बचत गटांकडून व्यसनमुक्तीचा निर्धार
तुळजापूर, ७ मार्च/वार्ताहर

तुळजापूर शहर व तालुका परिसर व्यसनमुक्त करण्याचा निर्धार शहरातील १० बचत गटांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गुरुवारी व्यक्त करण्यात आला. विविध बचत गटांनी संयुक्तरित्या पत्रकारांनाही निमंत्रित केले होते. वाढत्या व्यसनाधिनतेमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक झळ लागते. त्यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो तसेच त्याचा उपसर्ग निष्पाप लहान बालकांना पोहोचतो. याची नोंद घेऊन तसेच ही व्यथा प्रत्येक घराची कथा होत असल्याने शहरातील विविध महिला गटांनी बचत गटाच्या माध्यमाने आर्थिक उन्नतीचे ध्येय गाठण्याबरोबरच व्यसनमुक्तीसाठी सक्रीय चळवळ सुरू करण्याचा निर्धार केल्याचे प्रा. शकुंतला मगर यांनी सांगितले. मधुमती अमृतराव यांनी महिला बचत गटांना शासनाकडून व बँकेच्या माध्यमाने मिळणाऱ्या सवलतींची माहिती समाजातील प्रत्येक महिलेस ज्ञात करून देण्याची गरज व्यक्त करून समाजातील विशेषत: झोपडपट्टी व असाक्षर कुटुंबात जनजागृती करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
उद्या (दि. ८) जागतिक महिला दिनाचे औचित्य लक्षात घेऊन तुळजापूर शहरातील विविध महिला गटांनी एकत्र येऊन जनजागृती फेरी काढण्याचे व समाजप्रबोधन सुरू करण्याचा संकल्प केल्याचे श्रीमती मगर व श्रीमती अमृतराव यांनी पत्रकारांना सांगितले.

‘महिलांनी शेतीपूरक व्यवसाय करावेत’
गेवराई, ७ मार्च/वार्ताहर

स्वयंसहायता बचत गट चळवळीमुळे ग्रामीण भागात महिलांचे चांगले संघटन निर्माण झाले आहे. उद्योजकीय कौशल्ये आत्मसात करून महिलांनी शेतीपूरक व्यवसाय करावेत, असे आवाहन कृषी अधिकारी रामेश्वर चांडक यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड व गजानन सेवाभावी संस्था गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौशल्यवृद्धी प्रशिक्षण शिबाराचे उद्घाटन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. रनजकर यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत संस्था समितीतील विस्तार अधिकारी एस. आर. मुराडी, कृषी अधिकारी रामेश्वर चांडक, बळीराजा कृषी मंचचे अध्यक्ष मुरलीधर घोडके यांची यावेळी प्रमुख उपस्थित होते. श्री. चांडक म्हणाले, बचत गटामुळे महिलांना आर्थिक व्यवहाराची जाणीव झाली. एकमेकींच्य सहकार्याने गरजा भागविण्याचे ज्ञान मिळाले. शेतीमधील कच्च्या मालाचा वापर करून अनेक व्यवसाय महिलांना करणे शक्य आहे.

लोहा मतदारसंघात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी
लोहा, ७ मार्च/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार संतोष गोरड यांनी लोहा-कंधार तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर आपापल्या कार्यक्षेत्रात आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील राजकीय पक्षांचे झेंडे, जागोजागी लावलेले बॅनर नगरपालिकेने काढून घेतले. राजकीय पक्षांसंदर्भाने असलेले बॅनर, झेंडे काढल्याचे आदेश देण्यात आले आहेत. तहसीलदार संतोष गोरड यांनी लोहा-कंधार तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

स्टेट बँक ऑफ हैदराबादतर्फे बचत गटांना कर्ज
परभणी, ७ मार्च/वार्ताहर

स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेच्या पालम परिसरातील ९० गावांतील २६५ स्वयंसाहाय्यता समूहांना बँकेशी जोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात बचत गटातील महिलांना ५३ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. बँकेने स्वयंसाहाय्यता समूह बँक जोडणी कार्यक्रम हाती घेतला आहे. औरंगाबाद विभागामध्ये मार्च २००८ अखेर बचत गटांना १०८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. अशी माहिती उपमहाव्यवस्थापक के. लक्ष्मीशा यांनी या कार्यक्रमात दिली.

सिडकोच्या नोटिशीला स्थगिती देणार -अशोक चव्हाण
औरंगाबाद, ७ मार्च/खास प्रतिनिधी

वाळूज महानगर जमीन हटाव संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसमोर शंभर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. जवळपास तीन तास ते येथील लेमन ट्री हॉटेलच्या आवारात बसले होते. या आंदोलनकर्त्यांना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलासा दिला. सिडकोच्या नोटीसला तात्पुरती स्थगिती दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री त्यांनी या समितीला दिले. संघर्ष समितीचे सदस्य पंजाबराव वडजे पाटील, अशोक जाधव, बाबू शिंतोडे, किशोर बिलवाल, संतोष धुमाळ आणि पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या प्रश्नाची माहिती श्री. वडजे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिली. सिडकोच्या शंभर टक्के अधिग्रहणास स्थगिती द्यावी, अशी विनंती या शेतकऱ्यांनी केली आहे. सिडकोचे अधिकारी कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. सिडकोच्या नोटिसीला स्थगिती देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

नांदेड महापालिकेच्या महिला-बालकल्याण सभापतिपदी कॉंग्रेसच्या रेखा वझरकर
नांदेड, ७ मार्च/वार्ताहर

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण समिती सभापतिपदी काँग्रेसच्या रेखा वझरकर तर उपसभापतिपदासाठी याच पक्षाच्या शालिनीताई पवळे हळदेकर यांची बिनविरोध निवड झाली. महिला बाल कल्याण समितीच्या सभापती व उपसभापतींचा एक वर्षांचा कार्यकाळ संपल्याने या दोन्ही पदांवर नवीन महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे रेखा वझरकर व शालिनीताई पवळे यांनी अनुक्रमे सभापती व उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केले. अन्य कोणत्याही पक्षाचे उमेदवारी अर्ज न आल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात होती. स्थायी समितीच्या सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. या पदासाठी काँग्रेस पक्षाकडून आणखी दोन महिला इच्छुक होत्या; परंतु काँग्रेसचे स्वीकृत सदस्य श्याम दरक यांनी वझरकर, पवळे यांना अर्ज भरण्यास सुचविले होते.

सुरेंद्र वर्मा यांची नाटय़शास्त्र विभागाला भेट
औरंगाबाद, ७ मार्च/प्रतिनिधी

ख्यातनाम हिंदी नाटककार आणि संगीत नाटक अकादमी साहित्य पुरस्कार विजेते सुरेंद्र वर्मा यांनी नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागास सदिच्छा भेट दिली. आपल्या आगामी नाटय़लेखनासंदर्भात ते दौलताबाद- खुलताबादच्या अभ्यासदौऱ्यासाठी दिल्लीहून आले होते. औरंगजेबच्या मुली जहाआरा आणि जेबुन्निसा यांच्या जीवनावर ते सध्या ऐतिहासिक- चरित्रात्मक नाटय़लेखन करीत आहेत. दीक्षान्त समारोहाच्या निमित्ताने आयोजित वेशभूषा प्रदर्शन, मल्टीमिडीया कक्ष आणि प्रकाशयोजना सामग्री प्रदर्शनाचीही त्यांनी आवर्जून पाहणी केली. त्यांच्यासोबत हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. माधव सोनटक्के उपस्थित होते. नाटय़शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी सुरेंद्र वर्मा यांचे स्वागत केले.

अवैध जीपचालकाचा प्रवाशांना ठोकरून पळ
धारूर, ७ मार्च/वार्ताहर

पोलीस अधिकाऱ्यांची गाडी पाहून चोरून अवैध वाहतूक करणाऱ्या जीपचालकाने दोन प्रवाशांना धडक देऊन पळ काढला. जखमींना पोलीस उपअधीक्षक गीता चव्हाण यांनी स्वत:च्या गाडीत बसवून रुग्णालयात नेले. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक गीता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक आले होते. रस्त्यावर समोरून अवैध वाहतूक करणारी जीप (क्र. एमएच २३-३५५९) आल्याचे पाहून पथकाने गाडी समोर थांबविली. अवैध वाहतूक करणाऱ्या चालकाने पळ काढताना दोन पादचारी भानुदास मैंद, विष्णू चव्हाण या दोघांना धडक दिली. धडक दिल्यानंतर चालक पसार झाला.

दोन समीक्षाग्रंथांचे उद्या प्रकाशन
नांदेड, ७ मार्च/वार्ताहर

सांस्कृतिक क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक मिळविणाऱ्या ‘आपुलकी’ या संस्थेतर्फे प्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रकाश मेदककर यांच्या ‘साहित्य विचार : प्रदेश आणि परिसर’ व ‘अनुसंधान’ या दोन समीक्षा ग्रंथांचे प्रकाशन सोमवारी (दि. ९) सायं. ६ वा. आय. टी. एम. महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. डॉ. मेदककर यांच्या या दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक व पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या ‘अंतर्नाद’ या नियतकालिकाचे संपादक भानू काळे यांच्या हस्ते होत असून, याप्रसंगी मराठीतील ख्यातनाम समीक्षक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख प्रा. बाळकृष्ण कवठेकर हे या दोन्ही पुस्तकांवर अभ्यासपूर्ण विवेचन करणार आहेत. तरी साहित्यप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिल्लोडचे उपसभापती भगवान सनान्से यांचे निधन
सिल्लोड, ७ मार्च/वार्ताहर

पंचायत समितीचे उपसभापती भगवान नारायण सनान्से यांचे आज आकस्मिक निधन झाले
ते २४ वर्षांचे होते. त्यांच्यावर उंडणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. श्री. सनान्से सिल्लोड पंचायत समितीचे तरुण उपसभापती होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला आमदार सांडू पाटील लोखंडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, रंगनाथ काळे, सभापती अशोक गरुड, तहसीलदार महादेव कोरवले, गटविकास अधिकारी तेजराव ठगे आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ख्रिश्चनांचा हिंदू धर्मात प्रवेश
उदगीर, ७ मार्च/वार्ताहर

अनंतश्री विभूषित रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराजांचा भव्य प्रवचन व दर्शन सोहळ्यात सुमारे दोन हजार ख्रिश्चन लोकांनी परत हिंदू धर्मात प्रवेश घेतला. त्यांना नाणीज धर्मपीठांच्या गुरुंनी दीक्षा दिली.नरेंद्र महाराज यांच्या प्रवचन सोहळ्याचे आयोजन जिल्हा सेवा समितीने केले होते. नाणीज धर्मपीठाच्या स्वामींच्या शिष्यांनी दोन हजार ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्यांना हिंदू धर्मात विधिवत प्रवेश दिला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे नरेंद्र महाराज येऊ शकले नाहीत.

वसमत येथे गुरुवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा
वसमत, ७ मार्च/वार्ताहर

येथील बहिर्जी कॉलेजजवळील श्री ओम साई व श्री शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रसंत श्री १०८ डॉ. शिवलिंग शिवाचार्य गुरु महाराज अहमदपूर यांच्या हस्ते १२ मार्चला होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा सकाळी ७ वा. आयोजित करण्यात आला असून ११ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गिरजाप्पा पुणेकर यांनी केले आहे.

दारूसाठी डॉक्टरांमध्ये हाणामारी
औरंगाबाद, ७ मार्च/प्रतिनिधी

दारू पिण्यास नकार देणाऱ्या एका डॉक्टराने आपल्या डॉक्टर मित्राला झोडपून काढल्याची घटना शहरात घडली. या घटनेत जखमी डॉक्टराला शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची पाळी आली. जयसिंगपुऱ्यात राहणाऱ्या डॉ. पंकज शेरमा यांना त्यांचा मित्र डॉक्टर वैभव जैन याने रस्त्यात गाठले. डॉ. जैनने वारंवार आग्रह करूनही डॉ. शेरमा यांनी दारू पाजण्यास नकार दिल्यामुळे डॉ. जैन, डॉ. अभय मुंडे, सचिन गिते या तिघांनी मिळून डॉ. शेरमा यांना चांगलेच झोडपून काढले.
शेरमा यांनीही त्या तिघांना चांगलीच चपराक दिली. मात्र रक्तबंबाळ अवस्थेत डॉ. शेरमा यांना शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉपीप्रकरणी पोलिसांकडून १५ जणांवर कारवाई
वसमत, ७ मार्च/वार्ताहर

येथील सहा परीक्षा केंद्रांच्या दोन परीक्षा केंद्रांवर कॉप्या देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, पण पोलिसांच्या बंदोबस्तामुळे कॉप्या पुरविणाऱ्यांचे काहीच चालले नाही. कॉप्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी १५ जणांवर कारवाई केली. आज इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांपेक्षा त्यांचे समर्थक मोठय़ा प्रमाणात आढळून आले. सहा केंद्रांवर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. विषेष म्हणजे जिल्हा परिषद शाळा व विवेकवर्धिनी या दोन केंद्रांवर कॉप्या देणाऱ्यांची संख्या मोठी आढळून आली. पण या दोन केंद्रांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त लावल्याने कॉपी देण्यारे हितचिंतक मात्र हतबल झाले होते. काहींनी तसा प्रयत्न केला असता ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी १५ जणांवर कारवाई केली. कॉपीमुक्तीसाठी महसूल पथक व शिक्षणाधिकाऱ्यांचे पथक फक्त केंद्रावर भेट देऊन तात्काळ निघून जात होते. त्यामुळे पोलिसांवर मोठय़ा प्रमाणावर ताण पडत होता.