Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पवार लढणार माढामधून
पुणे, ७ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर सोलापूर जिल्ह्य़ातील माढा लोकसभा

 

मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा आज पुण्यात केली. त्यांच्या या घोषणेने पवार लोकसभा निवडणूक लढणार की नाहीत, लढले तर कोणत्या मतदारसंघातून लढतील अशा सर्व चर्चाना आज पूर्णविराम मिळाला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मोहिते कुटुंबीयांमध्ये मोठा कलह निर्माण झाला होता. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच माजी खासदार प्रतापसिंह मोहितेपाटील यांनी थेट प्रचाराचा नारळ फोडून आपण रिंगणात असल्याचे जाहीर केले होते. तर, दुसरीकडे त्यांचे बंधू व राज्याचे पर्यटनमंत्री विजयसिंह मोहितेपाटील यांना आपल्या चिरंजीवांना (रणजित) माढय़ातून लोकसभेवर पाठवायचे होते. हा गृहकलह विकोपाला जाऊ लागल्याने विजयसिंह मोहितेपाटील यांनी पवार यांनाच माढय़ातून लढावे अशी गळ घातली. पवारसाहेब स्वत माढय़ातून लढणार असतील तर आपण माघार घेऊ, अशी भूमिका प्रतापसिंहांनीही जाहीर केली. या पाश्र्वभूमीवर मोहिते कुटुंबीयांतील गृहकलह मिटवण्यासाठी तसेच निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीला सोपा असलेल्या माढा मतदारसंघाला पवार यांनी पसंती दिली. या मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार, असा निर्वाळा त्यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.
शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत विचारले असता पवार म्हणाले की, राज्यातील बऱ्याच मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी, अशी बोलावणी येत होती. पण यावेळी आपली इच्छा राज्यसभेवर जाण्याची होती. राज्यसभेवर गेले की सहा वर्ष निवडणुकांची झंझट नसते. परंतु, आता माढा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय झाला आहे. हा मतदारसंघ अजून नवा आहे, त्याबाबत काय व कशी मोर्चेबांधणी करायचे ते बघावे लागेल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाबाबत विचारले असता ते म्हणाले की, या विषयी उद्या (रविवारी) बैठक होणार आहे. प्रफुल्ल पटेल व अहमद पटेल हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आपण पंतप्रधान व्हावे म्हणून समाजवादी पक्षाने पाठिंबा देऊ केला होता का, यावर ते म्हणाले, पुरेसे संख्याबळ होईपर्यंत या दृष्टीने विचार करणे योग्य नाही. एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले तर हा प्रश्नच येणार नाही. मोठे पक्ष निवडणुकीमध्ये आहेत, त्यातील काही आपले मित्रही आहेत. त्यांना वाटते की, या निवडणुकीनंतर सरकार बनविण्यासाठी छोटय़ा पक्षांची गरज लागेल. तथापि, आपल्याला वस्तुस्थितीची पूर्ण कल्पना आहे. कोणताही अतार्किक विचार आपण करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेस मुळातच कमी जागा लढविणार असेल, तर आपण पंतप्रधानपदाचा विचार कसा करू, असे सांगतानाच ज्यांना महाराष्ट्राची काहीही माहिती नाही, असे लोक मुद्दाम आपल्याला टार्गेट करून तसा प्रचार करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांची ‘लाईन’ वेगळी आहे. प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देताना त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. समाजवादी पक्षानेही सरकार वाचविण्यासाठी अशीच मदत केली होती, त्यामुळे त्यांचेही आम्ही ऋणी आहोत.
तिसऱ्या आघाडीबद्दल विचारले असता, यासंदर्भात आपल्याशी कोणाचेही बोलणे झालेले नाही की आपणही कोणाशी बोललेलो नाही. बहुजन समाज पक्षाचा उमेदवार फक्त निवडणुकीतच कळतो. इतर वेळी मात्र दिसत नाही, अशी खिल्लीही त्यांनी उडविली.
‘माढा लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. खरे तर यंदा आपल्याला लोकसभा निवडणुकीला उभे राहण्याची अजिबात इच्छा नव्हती. पक्षाच्या नेत्यांनी मात्र आपल्याला त्यासाठी भरीला घातले. प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विजयसिंह मोहितेपाटील अशा सुमारे ४० नेत्यांनी प्रसारमाध्यमांकडे आपल्या उमेदवारीचा निर्णय जाहीर करून टाकला. पक्षाने आपल्याला उमेदवारी देण्याचा निर्णय जाहीर केल्याने आपण माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार आहोत’