Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शिवसेनेचे पवार पुराण
मुंबई, ७ मार्च/प्रतिनिधी

खोटेपणा, थापेबाजी, विश्वासघात, दगाबाजी रसायन म्हणजे शरद पवार.. पवार व विश्वासार्हता यांचे

 

नाते कधीच जमलेले नाही.. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने ३८व्या वर्षी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला.. दादा, मृणाल गोरे, दत्ता पाटील यांच्याशिवाय त्यांचेच गुरू यशवंतराव चव्हाण आणि सोनिया गांधी यांनाही दगाफटका केला.. शरद पवार हा एक राजकीय विश्वासघाताचाच प्रवास आहे.. ही निरीक्षणे आहेत शिवसेनेची. अधिकृतपणे शिवसेनेच्याच प्रचार साहित्यात प्रकाशित झालेली, पण त्याचा सोयीस्कर विसरही पडलेली..
पवार पुराण हे शिवसेनेचेच एक अधिकृत प्रकाशन.. शिवालयातून प्रकाशित झालेले, म्हणजे तुलनेने तसे ताजे.. किऱ्रण वाडीवकर हे त्या पुस्तिकेचे प्रकाशक.. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केलेल्या जनतंत्र २००९ या प्रदर्शनात ही पुस्तिका ठेवण्यात आली आहे.. राजकीय पक्षोपपक्षांच्या प्रचार व प्रसिद्धी साहित्यावर आधारलेले हे प्रदर्शन प्रबोधिनीतर्फे कालपासून राजा शिवाजी विद्यालयात सुरू झाले आहे.. त्यात शिवसेनेतर्फे मांडण्यात आलेल्या स्वत:च्या प्रकाशनांमध्ये ही पुस्तिका ठेवण्यात आली आहे.. पवार पुराणमध्ये सात प्रकरणात पवारांच्या राजकीय विश्वासघाती वृत्तीवर शिवसेनेने अधिकृतपणे लिहिले आहे.. येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ करण्याची घोषणा केली आहे, व या एकाच मुद्दय़ावर गेल्या २० वर्षांची भाजपाबरोबर असणारी युती तोडण्याचीही तयारी ठेवली आहे.. त्या पाश्र्वभूमीवर पवार पुराणाला एकदम महत्व येण्याची शक्यता आहे.. पवार पुराणात पहिले प्रकरणच शरद पवार - राजकीय विश्वासघाताचा प्रवास या शीर्षकाचे आहे तर पुढील प्रकरणांमध्ये दुसरे प्रकरण शून्य विश्वासार्हता, तिसरे प्रकरण साखर कारखानदारी गाळात, चौथे प्रकरण शेतकरी विरोधाची भूमिका, पाचवे प्रकरण साखर कारखाने उभारताना कोटय़वधींचा गैरव्यवहार, सहावे प्रकरण साखर कामगारांचे पगार वाढवले आणि आता कपातीची सूचना तर सातवे प्रकरण पवारांचे पॅकेज शेतकरी नव्हे, तर कारखानदारांना वाचविण्यासाठी या शीर्षकांची आहेत.. ९९ साली केवळ एका मताने बाजपेयी सरकार पराभूत झाले तेव्हा सोनिया गांधींच्या नावाची घोषणा करणारे पवारच पहिले नेते होते, याचा उल्लेख जसा या पुस्तिकेत आहे, तसाच त्यानंतर अवघ्या दीडच महिन्यात पवारांना सोनिया गांधींच्या विदेशी मूळाची आठवण व्हावी ही आश्चर्याची गोष्ट पवारांच्या बाबतीतच घडू शकते असेही नमूद करण्यात आले आहे ते याच पुस्तिकेत.. तिकिटासाठी पवारांनी सोनिया गांधींचे उंबरठे झिजवले होते याचे स्मरण प्रतापराव भोसलेंना उदधृत करूनही याच पुस्तिकेच देण्यात आले आहे.. पवारांविषयी आपण असे लिहिले व प्रसिद्ध केले होते याचे स्मरण सेना नेत्यांना नसावे याचे आश्चर्य प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांकडून व्यक्त केले जात होते.