Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

युतीचे घोळाचे गुऱ्हाळ सुरूच
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिवसेना आणि भाजपमध्ये अनुक्रमे २० आणि २५

 

जागांवर समाधानकारक चर्चा झाली असली तरी राज्यातील तीन मतदारसंघ युतीमधील चर्चेतील कळीचा मुद्दा ठरले आहेत. या तीनपैकी सर्व जागांवर शिवसेनेने दावा केला असून भाजपही त्यापैकीच एका जागेवर अडून बसल्याने आज झालेल्या चर्चेत समाधानकारक तोडगा निघून शकला नाही. परिणामी तीन जागांचा तिढा अद्यापही कायम आहे.
शिवसेना आणि भाजप नेत्यांनी एकामेकांना दिलेल्या आव्हान-प्रतिआव्हानाच्या पाश्र्वभूमीवर आज प्रथम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी युतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर वरळी येथील एका हॉटेलमध्ये चर्चेची दुसरी फेरी झाली. या बैठकीला मुंडे यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि सुरेश जैन हे उपस्थित होते. शिवसेनेला २३-२५ असे तर भाजपला २६-२२ असे जागावाटपाचे सूत्र हवे आहे.
मुंबई दक्षिण, कल्याण, जळगाव आणि यवतमाळ-वाशीम या चार मतदारसंघावरून शिवसेना-भाजप युतीमधील चर्चा अडकली आहे. कल्याणच्या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. वाशीम मतदारसंघ पुनर्रचनेत गायब झाला असल्याने यवतमाळ हा मतदारसंघ शिवसेनेला विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यासाठी हवा आहे. तर मुंबई दक्षिण या मतदारसंघावर भाजप अडून बसला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर जागा भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन-राव यांच्यासाठी भाजपला हवी आहे. मुंबई दक्षिण मतदारसंघातील विद्यमान खासदार मोहन रावले यांच्या मतदारसंघातील जवळपास ४० टक्के भाग पुनर्रचनेत गेला असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केल्याचे कळते. आजच्या चर्चेच्या वेळी जळगाव मतदारसंघाबाबत विस्ताराने चर्चा झाल्याचे कळते. सुरेश जैन हे शिवसेनेत आल्याने त्यांच्यासाठी शिवसेनेला ही जागा हवी आहे, असे सूत्रांनी सांगितले.
युतीमधील पुढील चर्चा दिल्लीत होईल असे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते, त्याला प्रत्युत्तर देताना भाजपने अंतिम चर्चा मुंबईतच होईल, असे स्पष्ट केले होते. त्या पाश्र्वभूमीवर आज मुंडे आणि गडकरी यांनी मनोहर जोशी आणि सुरेश जैन यांच्याशी चर्चा केली. लालकृष्ण अडवाणी यांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा आहे का आणि शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत पाच वर्षे राहणार का, याबाबत थेट उद्धव ठाकरे यांच्याकडेच विचारणा करण्याचे कालच भाजपने जाहीर केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आज मनोहर जोशी आणि जैन यांच्याशी चर्चेच्या दोन फेऱ्या केल्या. मात्र तरीही तीन-चार जागांवरील वाद कायम असल्याने या चर्चेतून आज कोणताही तोडगा निघू शकला नाही.