Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादी बरोबर आले तर ठीक, अन्यथा ‘एकला चलो रे’ची काँग्रेसची भूमिका
औरंगाबाद, ७ मार्च/खास प्रतिनिधी

जातीयवादी शक्तीचा बिमोड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर तडजोड करावी अशी

 

अपेक्षा व्यक्त करून काँग्रेसच्या नेत्यांनी ते सोबत आले नाही तर एकला चलो रेची भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे. औरंगाबादच्या गरवारे स्टेडियमवर काँग्रेसतर्फे आयोजित विराट सभेत मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे.
काँग्रेस प्रदेश समितीच्या वतीने शनिवारी येथील गरवारे स्टेडियमच्या मैदानावर जनजागरण विकास यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने भव्य मेळावा घेण्यात आला. या सभेमध्ये आजी व माजी मुख्यमंत्री बोलत होते. चव्हाण यांनी प्रारंभीच कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या अविकसित भागाला काहीही कमी पडू दिले जाणार नाही असे आश्वासन दिले. सेना-भाजप या हिंदुत्ववादी शक्तीला पराभूत करायचे असेल तर धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यावे. राष्ट्रवादी काँग्रेसने ही भूमिका घेतली नाही तर नाईलाजाने आमच्या पक्षाचा मार्ग मोकळा आहे, असा खणखणीत इशारा अशोक चव्हाण यांनी या वेळी दिला. भारतीय जनता पक्षाने राज्यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. महाराष्ट्राने काय विकास केला आहे हे सांगण्यासाठी मोदीच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे चव्हाण म्हणाले.