Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

विलासरावांनी दाखल केलेल्या खटल्यात गडकरींना न्यायालयाचे समन्स
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी

 

दाखल केलेल्या बदनामीसंदर्भातील फौजदारी स्वरूपाच्या खटल्यात महानगर दंडाधिकाऱ्यांनी आज गडकरी यांच्यावर समन्स बजावले असून त्यांना ६ जून रोजी स्वत: न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत शीव-पनवेल महामार्गाचे काम इंडियाबुल्स कंपनीला देताना प्रचलित नियमांचे उल्लंघन केले. सदर कंपनीत आपला मुलगा अमित देशमुख आणि काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची भागीदारी असलेल्या कंपनीला देशमुख यांनी ते काम दिले, असा आरोप गडकरी यांनी नागपूर येथे एका पत्रकार परिषदेत केला होता. या कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मांडण्यात आला नाही, असेही गडकरी यांनी म्हटले होते.महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात या आरोपांविरुद्ध विलासराव देशमुख यांनी फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल केला. त्यामध्ये गडकरी यांनी केलेले सर्व आरोप देशमुख यांनी फेटाळले. आपला मुलगा आणि पटेल यांच्या मुलास इंडियाबुल्स कंपनीत कोणतेही स्वारस्य नाही आणि त्या कंपनीला कंत्राट देताना ऑक्टोबर २००६ मध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात आली होती, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.