Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

खऱ्या स्वरगंगेचे दर्शन हवे असेल तर घराण्यांच्या चौकटी मोडा - किशोरी आमोणकर
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

खऱ्या स्वरगंगेचे दर्शन हवे असेल तर घराण्यांच्या चौकटी मोडा. जे संगीत हृदयाला भावत नाही ते

 

शास्त्रीय गायन नाही. सूर स्वत:ला विसरायला लावणारा हवा. तशी मांडणी हवी. कलेत एकसुरीपणा नसावा, नाही तर कला मरेल. गाणे गाताना विनाकारण शरीराचे काहीही हावभाव केले म्हणजे आपण चांगले गातो हा समज चुकीचा असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी केले. हल्लीच्या पिढीत शास्त्रीय संगीत गाताना कशा चुका केल्या जातात, हे किशोरीताईंनी काही राग गाऊन प्रत्यक्षात दाखवून दिले.
किशोरी आमोणकर यांनी लिहिलेल्या ‘स्वरार्थरमणी’ या ग्रंथाचे प्रकाशन दिग्गज नाटयदिग्दशिर्का विजया मेहता यांच्या हस्ते मांटुगा येथील यशंवत नाटय़गृहात शुक्रवारी झाले. त्यावेळी किशोरीताई बोलत होत्या. याप्रसंगी जेष्ठ नाटय़कर्मी प्रभाकर पणशीकर, दाजी पणशीकर, राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘नाटय़संपदा प्रतिष्ठान’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेली अनेक वर्षे किशोरीताईंनी ग्रंथ लिहिण्याआधी अभ्यास केला, अनेक पुस्तके वाचली. त्यांनी ते विचार त्यांची शिष्या नंदिनी बेडेकर यांना सांगितले. गेली दहा वर्षे रोज सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत बेडेकर किशोरीताईंचे विचार
त्या टिपून घेत होत्या आणि त्यातूनच हे पुस्तक तयार झाल्याचे ‘नाटय़संपदा’चे अध्यक्ष अरूण फडके यांनी प्रारंभी सांगितले.
साहित्यामध्ये रससिद्धांत आहेत, त्याप्रमाणे संगीतात रससिद्धांत का असू नयेत, या अंगाने किशोरीताई गेली अनेक वर्षे शास्त्रीय संगीताचा विचार करीत होत्या. त्यातून स्वर म्हणजे काय, संगीत म्हणजे काय, गायक आणि शास्त्रीय संगीत यांच्यातील द्वैत लोपण्याची प्रक्रिया कशी घडते, साधना म्हणजे काय, श्रोता आणि गायक यांच्यातील नाते नेमके काय असावे, श्रोत्याने गाणे कसे ऐकावे, याविषयीचे मूलगामी विचार, जे अनेक वर्षांच्या साधनेतून किशोरीताईंना सुचले ते त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत, असे दाजी पणशीकर यांनी पुस्तकाबाबत विवेचन करताना सांगितले.
ज्ञान हे अलौकिक आहे, पुस्तकाच्या निमित्ताने होणारे कौतुक हे माझे कौतुक नाही तर ज्ञानाचे कौतुक आहे. कलेकडे आत्मिकदृष्टय़ा पाहायला हवे, असे सांगत किशोरी आमोणकर यांनी लेखक म्हणून त्यांची भूमिका सर्वासमोर मांडली. श्रोते सर्वज्ञ असतात. जे दिसते ते आत्ताच्या पिढीला सांगून ठेवावे यासाठी हे पुस्तक लिहिले असेही त्यांनी प्राजंळपणे कबूल केले.
विजया मेहता यांनी किशोरी आमोणकर यांची प्रकट मुलाखत घेतली. कोणत्याही कलेचा आपल्यावर परिणाम होऊ देणे आणि तो होऊ न देणे हा वेगळा प्रकार आहे. प्रत्येक रागाला वेगळे काही सांगायचे असते. मनाचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. मी गाते, हा अहंकार मिटला आणि एकरूप होऊन गायला लागले की, वेगळी अनुभती मिळते, असे किशोरी आमोणकर यांनी नमूद केले. स्वरभाषा महत्वाची असते तर बंदिशला द्वितीय स्थान आहे असे सांगताना संगीत हे अमूर्त्य आहे. त्याला स्पर्श करता येत नाही. तो अनुभवायचा असतो. कानातून संगीत साठवायचे असते, अशा शब्दात संगीताचे महत्व किशोरीताईंनी अधोरेखित केले.
राग हा स्वरब्रम्ह आहे. अनेकदा रागांच्या निमित्ताने साधनांची उपासना केली जाते. अनेकदा मैफल उशीरा सुरू होते अशी श्रोत्यांची तक्रार असते. मात्र आम्हालाही भाव भावना असतात. राग आळवायचा म्हणजे त्या अनुभवात जावे लागते. तशी परिस्थिती जमवून आणायला लागते. त्यासाठी कलाकाराला वेळ लागतो. कोणताही राग, गाण्ेा गाताना लगेच बसले की, गायला लागलो असे होत नाही. श्रोत्यांच्या हृदयापर्यंत गाणे पोहोचायचे असेल तर, गाणाऱ्याने ते हृदयापासून गायला हवे, असेही किशोरीताईंनी सांगितले.
पावसाचे लक्षण व प्रत्यक्ष पावसाळा यांच्यात फरक आहे. तसेच रागाचे आहे. रागाचे लक्षण सांगून राग अनुभवता येणार नाही. रागामध्ये स्वरांचा अभिनय होतो की नाही हे तपासले तरच गाण्याला अर्थ येतो. राग सगळे परानुभव आहेत. आपल्याआधी कोणीतरी ते तयार केले आहेत. स्वर आधी बोलतात मग गातात. राग गाताना पूर्ण एकरूप होत नाही तोपर्यंत श्रोत्यांसमोर यायची हिम्मत होत नाही, अशीही कबुली किशोरीताईंनी दिली. राग ही जुनी रचना आहे. तो बदलता येत नाही. बदललेला राग म्हणजे नवनिर्मिती नाही, असेही त्यानी नमूद केले.मुलाखतीची सुरुवात विजया मेहता यांनी केली आणि तासाभरानंतर त्या म्हणाल्या की, माझे प्रश्न संपले. यानंतरही सुमारे सव्वातास किशोरीताई आपले विचार मांडत होत्या. रात्री साडेबारापर्यंत सुरू असलेला हा कार्यक्रम संपेपर्यंत एकही श्रोता जागचा हलला नव्हता. या मुलाखतीच्या निमित्ताने किशोरीताईंच्या स्वभावाचे अनेक कंगोरे श्रोत्यांसमोर उलगडले गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.