Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

लर्निग लायसन्स व्हाया वेबसाइट!
कैलास कोरडे, मुंबई, ७ मार्च

शिकाऊ चालक परवाना म्हणजे लर्निग लायसन्स काढण्यासाठी यापुढे कोणताही दलाल

 

पकडण्याची गरज नाही अथवा आरटीओ कार्यालयात तासनतास रांगेतही उभे रहावे लागणार नाही. मोटार वाहन विभागाने आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून लर्निग लायसन्स काढण्याची ऑनलाईन नोंदणी करून अपॉइंटमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन ठरल्या दिवशी लायसन्स काढण्यासाठी जाणाऱ्यांना प्राधान्याने विनाकटकट लर्निग लायसन्स मिळू शकणार आहे.
मोटार वाहन विभागाने लर्निग लायसन्ससाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा कालपासून सुरू केली. राज्यातील कोणत्याही आरटीओ कार्यालयातून लर्निग लायसन्स काढण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करता येईल. लर्निग लायसन्स काढू इच्छिणाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी परिवहन विभागाच्या ६६६.ेंँं३१ंल्ल२ूे.्रल्ल या वेबसाइटवरील नोंदणी अर्ज भरावा लागेल. लर्निग लायसन्सखेरीज वाहन हस्तांतरण म्हणजे व्हेईकल ट्रान्स्फरसाठीही ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त दीपक कपूर यांनी दिली. ऑनलाईन अर्ज भरताना नाव, पत्ता, वय, जन्मस्थळ, ई-मेल आदी रकाने भरल्यानंतर अर्जदाराला चाचणीसाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची तारीख निश्चित करावी लागले. याखेरीज त्यावेळी कोणती कागदपत्रे सादर करणार याचीही माहिती अर्जामध्ये देता येईल. तो ‘सबमीट’ करताच अर्जदारासमोर पूर्ण भरलेला तीन पानी अर्ज ‘पीडीएफ’ स्वरुपात दिसेल. ‘ठराविक तारखेला यावेळी अमुकतमूक आरटीओ कार्यालयांत इतक्या शुल्कासह सहाय्यक आरटीओ दर्जाच्या अधिकाऱ्याला भेटा अशी सूचना असेल. त्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे घेऊन ठरलेल्या तारखेला चाचणीसाठी आरटीओमध्ये येणाऱ्यांना प्राधान्यक्रम दिला जाईल’, असे कपूर यांनी स्पष्ट केले.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, आधी वेबसाइटवर केवळ लर्निग लायसन्सचे अर्ज छापता येत होते. आता ते ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने, लायसन्स प्रक्रिया सुलभ होईल. आरटीओ कार्यालयांना कामाचे नियोजन करता येईल. त्याचबरोबर वेळ व लेखन साहित्याची बचत होईल. याखेरीज अर्जदारांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय विनाकटकट लायसन्स मिळू शकेन. वाहन हस्तांतरणासाठी अर्ज करताना नाव, पत्ता, गाडी नंबर असे ठराविक रकानेच अर्जदाराला भरावे लागतील. वाहनांच्या तांत्रिक बाबींची माहिती भरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे अर्जदारांची मोठी कटकट दूर होणार आहे. ‘वाहन हस्तांतरण करताना आठ वेगवेगळे अर्ज भरावे लागतात. ऑनलाईन नोंदणी करताना केवळ एका अर्जावर माहिती भरल्यास, उर्वरित सर्व अर्ज आपोआप भरले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनाही या सुविधेचा वापर अवघड वाटणार नाही’, असे आरटीओंतील सूत्रांनी नमूद केले. राज्य शासनाकडूनसुद्धा नागरिकांना ‘महाऑनलाईन’ या वेबसाइटच्या माध्यमातून लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र त्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागेल.