Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
प्रादेशिक

सागरी क्षेत्र नियोजनात आम्हालाही सहभागी करा
देशभरातील मच्छिमारांची मागणी

रेश्मा जठार, मुंबई, ७ मार्च

कोकण किनारपट्टीवरील प्रस्तावित औष्णिक विद्युतनिर्मिती प्रकल्प असो, ओरिसातील धामरा बंदर किंवा सीझेडएम अधिसूचना. या सर्व बाबींचा थेट परिणाम स्थानिक मासेमारी करणाऱ्या समाजावर होतो. मात्र प्रत्यक्ष त्या संदर्भातील निर्णयप्रक्रियेत या समाजाला कधीच स्थान दिले जात नाही. येणाऱ्या काळात या क्षेत्रांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय देशभरात घेतले जाणार आहेत. या पाश्र्वभूमीवर देशभरातील मासेमारी करणारा समाज एकत्र आला असून त्यांनी सागरी व किनारी भागातील संरक्षित क्षेत्रांच्या सीमानिश्चितीपासून ते अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यात या समाजाला सक्रिय सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.

खऱ्या स्वरगंगेचे दर्शन हवे असेल तर घराण्यांच्या चौकटी मोडा - किशोरी आमोणकर
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

खऱ्या स्वरगंगेचे दर्शन हवे असेल तर घराण्यांच्या चौकटी मोडा. जे संगीत हृदयाला भावत नाही ते शास्त्रीय गायन नाही. सूर स्वत:ला विसरायला लावणारा हवा. तशी मांडणी हवी. कलेत एकसुरीपणा नसावा, नाही तर कला मरेल. गाणे गाताना विनाकारण शरीराचे काहीही हावभाव केले म्हणजे आपण चांगले गातो हा समज चुकीचा असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी केले. हल्लीच्या पिढीत शास्त्रीय संगीत गाताना कशा चुका केल्या जातात, हे किशोरीताईंनी काही राग गाऊन प्रत्यक्षात दाखवून दिले.

मी कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाही - अमिताभ
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

बॉलीवूडचे शहनशहा आणि माजी खासदार अमिताभ बच्चन येत्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नाहीत. मी राजकारणी नाही त्यामुळे मी प्रचारात सहभागी होणार नाही, असे त्यांनी अलीकडेच सांगितले. आयफा सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी असे विधान केले. १९८४ साली कॉँग्रेस पक्षातर्फे अमिताभ बच्चन यांनी निवडणूक लढविली होती. ते निवडूनही आले होते. समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग यांचे ते जवळचे मित्र आहेत. येत्या निवडणुकीत तुमचा कोणत्या पक्षाला पाठिंबा किंवा विरोध आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, यावर आपण कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कारण आपल्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने घेण्यात येते किंवा त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. दोन दशकांपूर्वीच अमिताभ यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली. ऐश्वर्या राय-बच्चनला निवडणुक लढविण्यासाठी विचारणा करण्यात आल्याच्या वृत्ताचाही त्यांनी यावेळी इन्कार केला.

लर्निग लायसन्स व्हाया वेबसाईट!
कैलास कोरडे, मुंबई, ७ मार्च

शिकाऊ चालक परवाना म्हणजे लर्निग लायसन्स काढण्यासाठी यापुढे कोणताही दलाल पकडण्याची गरज नाही अथवा आरटीओ कार्यालयात तासनतास रांगेतही उभे रहावे लागणार नाही. मोटार वाहन विभागाने आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून लर्निग लायसन्स काढण्याची ऑनलाईन नोंदणी करून अपॉइंटमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन ठरल्या दिवशी लायसन्स काढण्यासाठी जाणाऱ्यांना प्राधान्याने विनाकटकट लर्निग लायसन्स मिळू शकणार आहे.

साध्वी प्रज्ञासिंगची प्रकृती बिघडली
रुग्णालयात हलविण्याचे मोक्का न्यायालयाचे आदेश
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेल्या आणि सध्या कारागृहात असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिची प्रकृती बिघडल्याने तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे आदेश आज विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने दिले.

विलासरावांनी दाखल केलेल्या खटल्यात गडकरींना न्यायालयाचे समन्स
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दाखल केलेल्या बदनामीसंदर्भातील फौजदारी स्वरूपाच्या खटल्यात महानगर दंडाधिकाऱ्यांनी आज गडकरी यांच्यावर समन्स बजावले असून त्यांना ६ जून रोजी स्वत: न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत शीव-पनवेल महामार्गाचे काम इंडियाबुल्स कंपनीला देताना प्रचलित नियमांचे उल्लंघन केले.

बहुजन महासंघ कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी चारजणांना अटक
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

दहिसर पूर्व येथे २ मार्च रोजी भारतीय बहुजन महासंघाचे कार्यकर्ते यशवंत ओटले यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टीच्या तालुका सचिवासह चौघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट बाराच्या अधिकाऱ्यांनी आज अटक केली. प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. ओटले यांची दहिसर पूर्व रेल्वे स्थानकासमोर काही अज्ञात इसमांनी कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली होती.

लर्निग लायसन्स व्हाया वेबसाइट!
कैलास कोरडे, मुंबई, ७ मार्च

शिकाऊ चालक परवाना म्हणजे लर्निग लायसन्स काढण्यासाठी यापुढे कोणताही दलाल पकडण्याची गरज नाही अथवा आरटीओ कार्यालयात तासनतास रांगेतही उभे रहावे लागणार नाही. मोटार वाहन विभागाने आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून लर्निग लायसन्स काढण्याची ऑनलाईन नोंदणी करून अपॉइंटमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन ठरल्या दिवशी लायसन्स काढण्यासाठी जाणाऱ्यांना प्राधान्याने विनाकटकट लर्निग लायसन्स मिळू शकणार आहे.

युतीचे घोळाचे गुऱ्हाळ सुरूच
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिवसेना आणि भाजपमध्ये अनुक्रमे २० आणि २५ जागांवर समाधानकारक चर्चा झाली असली तरी राज्यातील तीन मतदारसंघ युतीमधील चर्चेतील कळीचा मुद्दा ठरले आहेत. या तीनपैकी सर्व जागांवर शिवसेनेने दावा केला असून भाजपही त्यापैकीच एका जागेवर अडून बसल्याने आज झालेल्या चर्चेत समाधानकारक तोडगा निघून शकला नाही. परिणामी तीन जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. शिवसेना आणि भाजप नेत्यांनी एकामेकांना दिलेल्या आव्हान-प्रतिआव्हानाच्या पाश्र्वभूमीवर आज प्रथम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी युतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर वरळी येथील एका हॉटेलमध्ये चर्चेची दुसरी फेरी झाली. या बैठकीला मुंडे यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि सुरेश जैन हे उपस्थित होते. शिवसेनेला २३-२५ असे तर भाजपला २६-२२ असे जागावाटपाचे सूत्र हवे आहे. मुंबई दक्षिण, कल्याण, जळगाव आणि यवतमाळ-वाशीम या चार मतदारसंघावरून शिवसेना-भाजप युतीमधील चर्चा अडकली आहे. कल्याणच्या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. वाशीम मतदारसंघ पुनर्रचनेत गायब झाला असल्याने यवतमाळ हा मतदारसंघ शिवसेनेला विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यासाठी हवा आहे. तर मुंबई दक्षिण या मतदारसंघावर भाजप अडून बसला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर जागा भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन-राव यांच्यासाठी भाजपला हवी आहे. मुंबई दक्षिण मतदारसंघातील विद्यमान खासदार मोहन रावले यांच्या मतदारसंघातील जवळपास ४० टक्के भाग पुनर्रचनेत गेला असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केल्याचे कळते. आजच्या चर्चेच्या वेळी जळगाव मतदारसंघाबाबत विस्ताराने चर्चा झाल्याचे कळते. सुरेश जैन हे शिवसेनेत आल्याने त्यांच्यासाठी शिवसेनेला ही जागा हवी आहे, असे सूत्रांनी सांगितले.

‘महावितरण’मध्ये सुरक्षा सप्ताह
मुंबई, ७ मार्च / प्रतिनिधी

विजेमुळे होणारे बहुसंख्य अपघात केवळ सुरक्षा उपायांची माहिती नसल्याने अथवा त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे होत असल्याने त्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘महावितरण’च्या प्रशिक्षण आणि सुरक्षा विभागाच्या वतीने ४ ते १० मार्च या कालावधीत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत परिमंडळ आणि मंडळ स्तरावर वीज सुरक्षाविषयक प्रशिक्षण, कार्यशाळा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सुरक्षा उपाययोजना तसेच प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती असलेले पोस्टर्स, बॅनर्स विभागस्तरापर्यंत वितरित करण्यात आले आहेत. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनाही माहिती देण्यात येणार आहे. सुरक्षेचे धोरण तयार करणे, त्याची वेळोवेळी समीक्षा करणे, सुरक्षेची उपकरणे खरेदी करणे, प्रशिक्षण देणे, अपघातांची कारणमीमांसा करणे आणि ते रोखण्याच्या उपाययोजना आखणे आदी जबाबदाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर टाकण्यात आल्या आहेत.