Leading International Marathi News Daily
रविवार, ८ मार्च २००९

गाडय़ाच गाडय़ा चोहीकडे, गेले रस्ते कुणीकडे..?
शनिवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत स्टेशन रस्ता, त्याला येऊन मिळणारे शहरातील इतर रस्ते व मागील पर्यायी कोठीचा रस्ता अशा सर्वच मार्गावर वाहनांची कोंडी होऊन रहदारी जागेवर स्तब्ध झाली होती. ही कोंडी एवढी जबरदस्त होती की, वरील सर्व मार्गावर लांबपर्यंत फक्त वाहनेच होती, रस्ताच दिसत नव्हता. कोंडीत अडकलेल्या एसटी बसेसमधील प्रवाशीही कंटाळून मध्येच उतरून गेले.

आठ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या
नगर, ७ मार्च/प्रतिनिधी

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, नगरचे प्रांताधिकारी विकास पानसरे यांच्यासह आठ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्यांचे आदेश आज येथे मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील रहिवासी असलेल्या बहुतेकांच्या बदल्या झाल्या. नगरचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून विवेक गायकवाड यांची नियुक्ती झाली.

‘.. तर काँग्रेसला त्यांच्याच भाषेत उत्तर’
राष्ट्रवादीच्या बैठकीत इशारा

नगर, ७ मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसची वाढलेली ताकद मान्य करण्यास काँग्रेस पक्ष तयार नसल्यास काँग्रेसला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल. आगामी निवडणुकीतही राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसला दाखवून देऊ, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी येथे बोलताना दिला. नगरच्या जागेवर पक्ष बाहेरचा उमेदवार लादणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘व्हेज नगरी’
एकदा मित्रांसोबत
हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो
वेटरने डिश सांगितल्या
व्हेज जयपुरी
व्हेज हैदराबादी
व्हेज पटियाला
व्हेज कोल्हापुरी
मी म्हणालो,
‘व्हेज नगरी’ आहे का?
मित्र हसायला लागले
अन् तो वेटर
ये कौनसा नया डिश है।
म्हणत निघून गेला

प्रा. सुधीर शर्मा यांचे हृदयविकारामुळे निधन
नगर, ७ मार्च/प्रतिनिधी

येथील ‘सीएसआरडी’चे (सेंटर फॉर स्टडिज फॉर रिसर्च डेव्हलपमेंट) संचालक, ‘ज्ञानोदय’चे संपादक आणि भिंगारच्या ख्राईस्ट चर्चचे सहायक धर्मगुरू रेव्ह. प्रा. डॉ. सुधीर देवीप्रसाद शर्मा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी शैलजा व दोन मुले असा परिवार आहे.

सात महिलांचा आज श्रीरामपूरला गौरव
श्रीरामपूर, ७ मार्च/प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या महिला गौरव पुरस्कारासाठी शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७ महिलांची निवड करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त गेल्या चार वर्षांपासून पालिका विविध उपक्रम राबवून महिला सप्ताह साजरा करते. जागतिक महिलादिनी उद्या (रविवार) सायंकाळी ५ वाजता आगाशे लॉन्स येथे ‘महिला गौरव पुरस्कारा’ने सात महिलांना सन्मानित केले जाणार आहे. या वर्षीच्या पुरस्कारासाठी मोहिनी हॉस्पिटलच्या संचालिका स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सरिता देशपांडे, शिक्षिका पुष्पा पोखरकर, वर्षां जोशी, सुमनताई नेवासकर, महेमुदा शेख, कंथाबाई दिवे, वच्छलताई काळे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या वेळी बुलढाणा येथील स्मिता देशमुख यांचा ‘मी जिजाऊ बोलते’ हा एकपात्री प्रयोग होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास अभिनेत्री कंगणा राणावत उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास महिलांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पालिका सहेली ग्रूपने केले आहे.

‘बागवान समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतिगृहांची सोय’
श्रीरामपूर, ७ मार्च/प्रतिनिधी

विविध क्षेत्रांत शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील बागवान समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आल्याची माहिती ओबीसी सेवा संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष आसिफ बागवान यांनी दिली. राज्य बागवान एज्युकेशन ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या भिवंडी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिक्षण घेण्याची इच्छा आहे, परंतु निवासाची सोय नाही. यामुळे समाजातील अनेक हुशार विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित आहेत. आता औरंगाबाद, गुलबर्गा, कराड, भिवंडी, मिरज आणि सोलापूर या शहरांत वसतिगृहांची सोय करण्यात येणार आहे. शिक्षण घेण्याची इच्छा आणि वसतिगृहाची गरज असणाऱ्यांनी तालुका वा जिल्ह्य़ातील समाजाच्या प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन बागवान यांनी केले आहे.

नेवाशात घरफोडी; ५० हजारांचा ऐवज लंपास
नेवासे, ७ मार्च/वार्ताहर

शहरातील विवेकानंद वसाहतीमध्ये पहाटे चोरटय़ांनी अनेक घरांमध्ये हात मारून सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. बसस्थानकाजवळच विवेकानंद वसाहत आहे. या ठिकाणी आज पहाटे संजय मिटकरे यांच्या घरातून सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. मिटकरे यांची आई शेजारी सडय़ासाठी शेण आणावयास गेली असता, दर उघडे राहिले व त्यातच चोरटय़ांनी डाव साधला. शिंगी यांच्या घराच्या उघडय़ा खिडकीतून काठीच्या साहाय्याने पँटमधील ३ हजार रुपये लंपास केले. याच पद्धतीने शिर्के यांच्या घरातील १० हजार रुपये चोरीस गेले. विवेकानंद वसाहतीमध्ये दहा दिवसांपासून चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. चोरटय़ांकडून भंगार खरेदी दुकानदारांची फूस असल्याने भंगारमध्ये चांगल्या वस्तू चोरून विकण्याचा धंदा तेजीत आहे. चोरटय़ांकडे मोटारसायकली, सायकली, रिक्षांच्या बॅटऱ्या आहेत. उभ्या मोटारसायकलींचे चाके, बॅटऱ्या, सायकली चोरून त्यांचे सुट्टे भाग भंगारमध्ये विकले जातात.

रिलायन्स लातूर पॅटर्नचे फलक फाडल्याची तक्रार
नगर, ७ मार्च/प्रतिनिधी

अनेक महाविद्यालयांशेजारी लावण्यात आलेले रिलायन्स लातूर पॅटर्न (लातूर) या शैक्षणिक संस्थेचे फलक समाजकंटकांनी फाडल्याबद्दल संस्थेतर्फे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. ही संस्था ११ व १२वीच्या मुलींसाठी मार्गदर्शन करते. संस्थेने आपली माहिती देणारे फलक लावले होते. मात्र, ते कोणीतरी फाडले. व्यावसायिक स्पर्धेतून हा प्रकार घडला असावा.
या प्रकरणी आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे प्रा. के. एम. वानखेडे यांनी केली आहे.

‘नगर दक्षिणची जागा शिवसेनेला सोडावी’
कर्जत, ७ मार्च/वार्ताहर

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला द्यावी, अशी मागणी आज येथे शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आली. जिल्हा उपप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत येथे शिवसैनिकांची काल बैठक झाली. यावेळी तालुकाप्रमुख बळीराम यादव, उपतालुकाप्रमुख नारायण दळवी, अंगद रुपनर, तालुका प्रसिद्धीप्रमुख अतुल कानडे, अर्जुन शिंदे, सुभाष जाधव, चंद्रकांत घालमे, विठ्ठल सोनमाळी, धोढाड, तसेच गटप्रमुख, बूथप्रमुख उपस्थित होते. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक बूथप्रमुख, स्टॉलप्रमुख यांची बैठक घेऊन त्यांना कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय नगर दक्षिण लोकसभेची जागा शिवसेनेस द्यावी व जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दळवी यांच्याकडे केली.

आरोपींच्या जामिनावर उद्या सुनावणी शक्य
टँकर इंधन घोटाळा
, नगर, ७ मार्च/प्रतिनिधी
जिल्हा न्यायालयात शरण आलेल्या आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या टँकर इंधन घोटाळ्यातील आरोपींच्या अंतरिम जामीन अर्जावर सोमवारी (दि. ९) सुनावणी होण्याची शक्यता आहे. हे सहा आरोपी काल न्यायालयात शरण आल्यानंतर त्यांच्या वकिलांनी अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. परंतु तपासासाठी कागदपत्रे आली नसल्याने जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांनी जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी घेऊ, असे सांगितले व आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आज या प्रकरणाची कागदपत्रे व जिल्हा सरकारी वकील विवेक म्हसे यांनी आपले म्हणणे मांडले. परंतु उशीर झाल्याने न्यायालयाने आता सोमवारी जामिनावर सुनावणी ठेवली आहे. पाथर्डी टँकर घोटाळ्यातील आरोपी शंकर अकोलकर, वसंत शेळके, नसीर इनामदार, विठ्ठल ठाणगे, रामदास बटुळे, शेख शहाबुद्दीन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

बीएसएनएलच्या लेबर युनियनचे उपोषण सुरूच
नगर, ७ मार्च/प्रतिनिधी

निदर्शने, निवेदने, साखळी उपोषण करूनसुद्धा वरिष्ठ अधिकारी, कंपनीने दखल घेतली नसल्यामुळे बीएसएनएल लेबर अ‍ॅण्ड कॉन्ट्रक्ट लेबर युनियनच्या जिल्हा शाखेतर्फे येथील बीएसएनएलच्या मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना संघटनेने साकडे घातले आहे. श्रम मंत्रालयाच्या नियमानुसार किमान वेतन द्यावे, विनाकारण कामावरून कमी करू नये, बोनस, इपीएफची सुविधा द्यावी आदी मागण्यांसाठी संघटना अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. नुकतेच साखळी उपोषणही केले. मात्र, कंपनीने या आंदोलनाची अद्यापि दखल घेतली नाही. त्यामुळे दि. ५ मार्चपासून आमरण उपोषणास बसले आहेत. काल संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन व कामगार आयुक्त यांनाही निवेदन देऊन प्रश्नाकडे लक्ष वेधले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब उधार, मतिन पठाण, मुहमद शेख, रवींद्र लांडगे आदी पदाधिकारी उपोषणास बसले आहेत.

वीज कामगार संघटनेचे उद्यापासून उपोषण
नगर, ७ मार्च/प्रतिनिधी

‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता दिलीप पडळकर यांच्याकडून मिळणारी अन्यायकारक वागणूक, आस्थापना शाखेच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रीय वीज कामगार संघटना (इंटक) यांच्या वतीने सोमवार (दि. ९)पासून महावितरणच्या येथील मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. मंडल कार्यालयाने पदोन्नतीवर पदस्थापना देताना ठरावीक कर्मचाऱ्यांच्या मर्जीनुसार ३ वेळा पदस्थापनेचे आदेश काढले. विनंती बदल्या करताना ज्येष्ठता अर्जाचा विचार केला नाही. पदोन्नती नाकारलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा पदोन्नती न देणे, ठरावीक कर्मचाऱ्यांविरुद्धच आरोपपत्र दाखल केली जातात, असे आरोप संघटनेचे आस्थापना विभाग व पडळकर यांच्या विरोधात केले आहे. या प्रश्नी नाशिकच्या मुख्य अभियंत्यांशी संघटनेने ५ महिन्यांपूर्वी चर्चा केली. मात्र, आश्वासन देऊनही आजपर्यंत त्यांनी या प्रश्नांची सोडवणूक केली नसल्यामुळे न्याय मिळण्यासाठी हे उपोषण करीत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डोंगरे यांनी सांगितले.