Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९

‘आरोग्य वसंत’ फुलवण्यासाठी..
भारतीय कला संस्कृतीची जाण ठेवण्याबरोबरच रटाळ संवाद प्रभावी करून कधी गाण्यातून, नाटय़ातून तर, कधी चित्रांतून आरोग्य संवाद साधून वस्त्यांमधील सामाजिक कार्यकर्त्यां आणि आरोग्य सख्यांनी लोणारा येथे ‘आरोग्य वसंत’ फुलवला. यापूर्वी लोकसत्ताने वस्त्यांमधील महिलांवर ‘आरोग्याची अनास्था’ ही वृत्तमालिका प्रकाशित केली होती.
नागपुरातील शुअर स्टार्टच्या मदतीने ‘आरोग्य वसंत’ कार्यशाळा प्रगती संस्थेच्या मदतीने कोराडी मार्गावरील लोणारा येथील प्रगती विकास केंद्रात घेण्यात आली.

विधिसाक्षरतेचे वेगळे तेज
न्युयॉर्कमधील कापड गिरणीत काम करणाऱ्या स्त्रियांनी ८ मार्च १९०८ ला त्यांच्या हक्काविषयी आंदोलन केले व त्यात त्यांचा विजय झाला. क्लारा झेटकीन या जर्मनीतील कार्यकर्तीने कोपनहेगन येथील स्त्रियांच्या परिषदेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव प्रथम मांडला. तेव्हापासून जगभर स्त्री संघटना या दिनानिमित्त स्त्रियांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत आहेत. पुढल्या वर्षी या दिनाला शतक पूर्ण होत आहे. या काळात स्त्रियांच्या चळवळीनेही अनेक वळणे घेतली. आंतरराष्ट्रीय स्तराप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावर, महाराष्ट्र आणि विदर्भातही अनेक घडामोडी झाल्या.

तिची आर्त हाक
ललिता गादगे

एका मोठय़ा हॉस्पिटलच्या स्वागतकक्षामध्ये बसले होते. ‘इथं गर्भलिंगनिदान केले जात नाही’ अशी पाटी सर्वच हॉस्पिटलमध्ये (कायद्याने अनिवार्य केल्यामुळे) असते, तशी इथेही होती. पाटीच्या खालीच पंचवीस-तिशीच्या पाच-सहा महिला सोनोग्राफीसाठी बसल्या होत्या. प्रश्न पडले गर्भ निरोगी, सुस्थितीत आहे का, हे बघण्यासाठी सोनोग्राफी करण्यात येणार होती की, तो मुलीचा/मुलाचा आहे, हे बघण्यासाठी? मुलीचा असेल तर तो गर्भाकुर खुडला जाणार का? आधीच्या एक-दोन मुली असतील तर हीच शक्यता होती. कायद्याने सक्त बंदी असूनही स्त्री-भ्रूण हत्या होतच आहेत. सर्वच राज्यातून मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा लक्षणीय घटलं आहे, घटतं आहे. यातून हेच वास्तव दिसत नाही का?

पुनर्वसनाच्या आश्वासनावर प्रकल्पग्रस्तांचे उपोषण संपले
बुलढाणा, ७ मार्च / प्रतिनिधी

‘आधी पुनर्वसन नंतरच धरण’ या मागणीसाठी अ‍ॅड. हरीश रावळे, वसंत भोजने यांच्या नेतृत्वाखालील ५००० प्रकल्पग्रस्त शेतकरी व महिलांच्या उपोषणाची दखल स्वत: जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, पोलीस अधीक्षक देशभ्रतार यांनी घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या व प्रकल्पग्रस्त गावांचे १०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाची घळभरणी न करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

संत नरहरी महाराजांचे निधन
खामगाव, ७ मार्च / वार्ताहर

खामगाव तालुक्यातील भालेगाव येथील संत नरहरी महाराज यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. अकोला येथील डॉ. पनपालिया यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या अंतिम दर्शनाकरिता भाविकांची गर्दी उसळली

सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या अध्यक्षपदी राजेश लहासे
बुलढाणा, ७ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या विदर्भ प्रदेशाध्यक्षपदी राजेश लहासे यांची नियुक्ती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हनुमंतराव उपरे यांनी केली.

७५ जोडप्यांचा सामूहिक विवाह
खामगाव, ७ मार्च / वार्ताहर

विठ्ठल स्वामिनी प्राणप्रतिष्ठा सोहोळ्यानिमित्त आयोजित हिंदूधर्मीय सामूहिक विवाह सोहोळ्यात ७६ जोडप्यांचा विवाह झाला. सद्गुरू भोजने महाराज संस्थानच्यावतीने हा सोहोळा आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार भाऊसाहेब फुंडकर, आमदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, आमदार नारायण गव्हाणकर आदी यावेळी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विवाह सोहोळ्यात सहभागी जोडप्यांना त्वरित १० हजारांच्या धनादेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाऊसाहेब फुंडकरांनी मनोगतात सांगितले, महाराजांच्या आशीर्वादाने आतापर्यंत सामूहिक विवाह सोहोळ्यात कुठेही बाधा पोहोचली नाही. सर्वाचा संसार सुखाने होत आहे.

धूळ उडवत व्हर्सा गाडी निघाली. नीटनेटक्या पेहरावातील पाच माणसे आत बसली होती. मागच्या सीटवर दोन मजूर आपापली अवजारं घेऊन बसले होते. शहारातून मोकळ्या रस्त्यावर येईपर्यंत आतली माणसं आपापल्या विचारात रमलेली होती. कुणीही कुणाशी बोलत नव्हते. एकदा गाव मागे पडल्यावर मात्र, सगळे जरासे सैलावले. आता हळूहळू त्यांच्यात संभाषण सुरू झाले. विशेषत: चालकात आणि त्याच्या शेजारी बसलेल्या मध्यमवयीन मित्रात. चालक हाच गाडीचा मालक होता आणि त्याच्या शेजारी बसलेला त्याचा जुना वर्गमित्र होता. खूप वर्षांनी दोघे असे एकत्र कुठेतरी निघाले होते. मिडलस्कूल ते हायस्कूल या काळात दोघे एकाच बाकावर बसत.

सुखी आणि सुरक्षित जीवन जगता यावे म्हणून मनुष्य रानटी जीवनातून उत्क्रांत होतात्सा स्वत:साठी घराची निर्मिती करू लागला. अन्य प्राण्यांसारखे झाडावर आणि गुहेमध्ये जगण्याचे सोडून त्याने घर बांधण्याचा यशस्वी प्रयोग केला. घरे बांधण्याची कल्पना त्याला कदाचित पक्ष्यांकडून मिळाली असेल, पण टिकाऊ घरे बांधणे हा त्याचा स्वत:चा शोध आहे. अर्थात हा एकाएकी नक्कीच लागलेला नाही, अनंत प्रयोगातूनच ते घडून आले आहे. निसर्गातूनच मिळणाऱ्या साधनांचा आणि संसाधनांचा वापर करून माणसाने घरबांधणीचे विविध प्रयोग केले, आणि आजही हे प्रयोग सुरू आहेत.

होळीला खेडय़ामध्ये ‘शिमगा’ म्हणतात. प्राचीन काळी उत्तरायण फाल्गुनी पुनवेस होत असे.. फाल्गुनी पुनवेस सूर्य नक्षत्रचक्रात दक्षिण दिशेच्या सीमेवर दिसला म्हणून या फाल्गुनी पुनवेस सीमेवर आलेल्या सूर्याचा दिवस म्हणून ओळखले गेले. शिमग्याचा सण म्हणजे शिवेवर आलेल्या सूर्याचा सण. उत्तर फाल्गुनी नक्षत्राची वनांची, धनधान्याची फल प्राप्ती करणारी ‘भग’ ही देवता असून या देवतेची पूजा म्हणजे तेजाची, ऊर्जेची पूजा. सूर्याचेच ‘भग’ हे एक नाव आहे. भग म्हणजे संपत्ती. भगदेव म्हणजे अन्नधान्य, पशुधन, संपत्ती देणारा देव. अग्नीच्या तेजातून जीवात्मा प्रकटला. सूर्य पृथ्वीच्या संयोगातून जीवसृष्टी निर्माण झाली त्यामुळे अग्नीतेजाला मानवी भाव अर्पण करण्यासाठी ‘होळी’ हा विधी तयार करण्यात आला. हा विधी वैदिक काळापासून कृषी-संस्कृतीने परंपरेने चालत आणलेला आहे. या उत्सवात समारंभपूर्वक एका संवत्सराचा अंत व दुसऱ्याचा आरंभ साजरा करण्यात येतो.

वस्तीतल्या चिंटय़ाला प्रत्येक बाबतीत मी मी करण्याची सवय होती. कुठलीही नवी गोष्ट दिसली की तिचा अनुभव घ्यायचा हा चिंटूचा स्वभावधर्म. गावात नवा चित्रपट आला की पहिल्याच दिवशीचा पहिला शो चिंटय़ाने पाहिलाच म्हणून समजा. नवा टीव्ही, नवा टेपरेकॉर्डर, नव्या बाईक्स, नवे बूट, नव्या चपला, नवे कपडे या मार्गाने सुरू झालेली त्याची भटकंती नवनव्या खाद्यपदार्थासोबतच नव्या छोकऱ्यांपर्यंत पोहोचली होती. चिंटय़ा फोकनाड मारण्यात नंबर एक. एकदा मेळघाटच्या जंगलभ्रमणानंतर परतलेल्या चिंटय़ाने मारलेली ब्लफ ऐतिहासिक होती. मित्रांनी तेथे किती वाघ पाहिले अशी पृच्छा करताच चिंटय़ाने, रात मे तालाब के किनारे एक-एक शेर आता था, और पानी पिके जाता था । हम तालाब के दिवार के पिछे छुपके सारा नजारा देख रहे थे। अशी लोणकढी थाप फेकून दिली.

राज्यात सत्तांतर होऊन शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वसंतराव नाईकांनी सत्ता सोडली त्यानंतरही शेती हा त्यांचा आवडता असलेला विषय व छंद त्यांनी पुढे चालूच ठेवला. १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या वीस कलमी कार्यक्रमाचा भाग म्हणून भूमिहीन शेतकऱ्यांना लॅन्ड सिलिंग कायद्याखाली अतिरिक्त ठरलेल्या जमिनी देण्यात आल्या होत्या. या जमिनी मिळणाऱ्या नवीन अल्पभूधारकांमध्ये पहिल्याच वर्षी शेती कसून पीक घेण्याची आर्थिक क्षमता नव्हती, यामुळे गावातील इतर शेतकऱ्यांनी नवीन अल्पभूधारक शेतकऱ्यांना जमिनीतील पहिले पीक घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असा अत्यंत मानवतावादी कार्यक्रम शासकीय पातळीवर राबवण्याचे ठरले होते.

कुठाय मंदी?
आर्थिक मंदीचा काळ आहे. कंपन्यांमध्ये नोकरकपात, खर्चकपात सुरू आहे, त्याची थोडी तरी धास्ती कुठे जाणवायला पाहिजे पण, सगळे लोकव्यवहार निर्धास्तपणे होताना दिसत आहेत. मराठी मन तर आणीबाणीशिवाय संकटाची दखलही घेत नाही. उत्सव कोणताही असू द्या , मराठी माणूस सज्ज आहे. अमेरिकेतल्या आर्थिक मंदीची भीती दाखवूनही पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन धडाक्यात साजरे झाले. अनेक लोक स्वखर्चानेही गेले अन् नाचूनही आले. हा उत्सव संपत नाही तोच अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा उत्सव हाकेवर आला आहे. तेथेही आर्थिक मंदी वगैरे काही चालणार नाही. हजारोंची गर्दी होईल.

..मग शब्द कशाला उणादुणा
मार्च सुरू झालाय. एकीकडे दहावी-बारावीच्या परीक्षांची धामधूम सुरू आहे, तर दुसरीकडे महिलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा, कार्यक्रम. त्यासाठी निमित्त आहे ८ मार्च - महिला दिन. दर वर्षी या महिला दिनाच्या निमित्ताने विविध सोहळे सुरू असतात. जागोजागी महिला मंडळांमधून भाषणं, व्याख्यानांचं आयोजन होतं. त्यातून महिलांचं प्रबोधन केलं जातं. कुठं महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं घेतली जातात. कुठं मिस अमुक-तमुकच्या धर्तीवर मिसेस तालुका, मिसेस जिल्हा स्पर्धा घेतल्या जातात. कुठं महिलांच्या व्यक्तिमत्त्व सुधारणांसाठीही कार्यक्रम राबवले जातात. कुठं आदर्श माता, स्वयंसिद्धा असे पुरस्कार दिले जातात. एक ना अनेक गोष्टी महिलांसाठी या निमित्ताने होत असतात. संक्रांतीचं हळदी-कुंकू जसं महिनाभर सुरू असतं, तसं अलीकडे हा महिला दिवस अनेक दिवसांपर्यंत सुरूच असतो.

हर्षल
ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज ४ (चार) येते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर हर्षलचा प्रभाव काय असतो, ते आपण बघू. हर्षल हा संशोधन ग्रह आहे. १७८१ साली हर्षल या शास्त्रज्ञानी याचा शोध लावला. हा विलक्षण बुद्धिमान ग्रह आहे. याला इंग्लिशमध्ये ‘युरेनस’ आणि मराठीमध्ये ‘प्रजापती’ म्हणतात. मंगळाचा आक्रमकपणा आणि बुधाची जबरदस्त आकलनशक्ती याचे मिश्रण म्हणजे हर्षल. अतिशय लहरी, विक्षिप्त, विलक्षण तिरसट, विलक्षण धाडसी, आक्रमक, शास्त्रीय प्रवृत्तीचा, सृजनशील, बुद्धिमान, अंतर्यामी, देवावर विश्वास ठेवणारा असला तरी थोडासा नास्तिकच असतो. युगप्रवर्तक, प्रत्येक गोष्ट तर्काच्या आधारे सिद्ध करायला लावणारा, प्रयोगशाळेत जे जे सिद्ध करता येते, त्यावरच विश्वास ठेवणारा.

वाशिम येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक किसन नामदेव गंगावणे यांनी ‘खुर्चीवरचा शहाणा’ हे वगनाटय़ पुस्तक रूपाने प्रकाशित करून व्यवस्थेचे प्रतिबिंब त्यात दाखवले आहे. विनोद हा वगनाटय़ाचा आत्मा मानला जातो. त्याचे पुरेपूर भान लेखकाने ठेवले आहे. नाटय़ातील पात्रे परस्परांना कोपरखिळ्या मारीत वेगाने पुढे जात असल्याने कथानक कुठेच निरस होत नाही तर अधिकाधिक वाचनीय होत जाते. पुस्तकावरून लेखकाचा वगनाटय़ाचा दांडगा अभ्यास लक्षात येतो. त्याला गण, गवळण, लावण्या असा सूर संगीताचा बाज जोडला आहे आणि जोडीला नृत्याचा भरजरी साज चढलेला आहे.मनोरंजनातून नकळत अंतर्मूख करायला लावणारे हे पुस्तक आहे. अनेकदा कायद्याची अंमलबजावणी करणारेच कायदा मोडतात. गैरव्यवहार करू नका म्हणणारेच गैरव्यवहारात सामील असतात, हा अनुभव आहे.

मानवी विकासाच्या वाटा रोखणाऱ्या आणि माणसाला पोटात भूकेचा शूळ वागवण्यास बाध्य करणाऱ्या अव्यवस्थेला लाथ मारून स्वत:च स्वत:चा सूर्य निर्माण करू पाहणाऱ्या प्रकाशगामी चळवळींच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कवी प्रसेनजीत गायकवाड यांनी ‘शून्य काळातील कविता’ हा कवितासंग्रह अर्पण केला आहे. केवळ आक्रोश, विद्रोह, दु:ख, निषेधाची भाषा या कवितासंग्रहात नाही तर अस्वस्थेबरोबर चिंतन करायला लावण्याची जबरदस्त ताकद या कवितांमध्ये आहे. समाजात राजकीय, वैचारिक, सामाजिक, बौद्धिक उलथापालथ होत असताना प्रसेनजीत यांची कविता शोषणाच्या बदलत्या व्यवस्थेची जाणीव करून देते, स्वाभिमानाने व्यवस्थेलाच झिडकारते, कधी आप्तांचे कष्ट मांडते तर कधी संतमहंतांच्या दांभिकतेवर कठोर प्रहार करते. ‘वस्ती’ कवितेत ते म्हणतात, संतमहंत नागराज हे इंगळ्या, गोमा इथल्या साध्वी हैवानासम धर्मगुरू हा वागे माणुसकीला सोडून.

एलकुंचवार समजून घेताना..
एखाद्या लेखकाच्या लेखनामागील प्रेरणा नेमक्या कोणत्या असतात? त्यात आत्मपर अनुभवांचा भाग किती असतो? व्यक्तिगत अनुभवांतील आशयद्रव्याचं लेखक कलात्मक अभिव्यक्तीत कसं रूपांतर करतो? सृजनाच्या प्रक्रियेत मूळ आशयद्रव्यातलं काय काय हरवतं? काय नवं गवसतं? लेखकाला अभिप्रेत असलेलं सारंच क लाकृतीत जसंच्या तसं उतरतं का? उतरत नसेल तर का उतरत नाही? आणि जे काही लिखाणात उतरतं, त्यानं लेखकाचं समाधान होतं का? लेखणीवर लेखकाला एकदा का हुकुमत आली की अवतीभोवतीच्या सामाजिक घटना-प्रसंगांतून, व्यक्ती वा समाजजीवनातून काही मूलभूत गोष्टी हेरून, त्यांचं अर्थनिर्णयन वा विश्लेषण करून, त्यामागचे विविध कंगोरे जाणून घेत त्यांना शब्दरूप देण्याचा तो प्रयत्न करतो का? त्यात त्याला कितपत यश येतं?

महिलादिन साजरा होत असताना प्रारंभापासून महिलांनी त्यांची लढाई ही भेदाभेदविरुद्ध आणि शोषणाविरुद्ध आहे. पुरुषप्रधानता, जाती, वर्ण, वंशभेद, भांडवलशाही, अन्यायकारक रूढी, परंपरा आणि धर्मांधता याविरुद्ध होते. यामुळे त्यांना स्वातंत्र्य, समानता आणि सामाजिक न्याय मिळत नसेल, सन्मानाने जगता येत नसेल, ते ते मुद्दे घेऊन या देशातल्या स्त्रिया युनोच्या महिलादशक १९७५ पासून ८ मार्चला रस्त्यावर येऊ लागल्या आणि संघटितपणे त्यांच्या मागण्या मांडू लागल्या. त्यांच्यावर होणारे कुटुंबांतर्गत, समाजांतर्गत, शासनव्यवस्थेतून आणि कामाच्या जागेवर होणारे अत्याचार याबद्दल बोलू लागल्या आणि आपापल्या मागण्या मांडू लागल्या.१९८० पर्यंत या महिलादिनाने भारतात फार प्रस्तुतीकरण केले नव्हते पण, मथुरा बलात्कारानंतर मात्र संपूर्ण देशात बलात्काराच्या मुद्दय़ाच्या निमित्ताने अत्याचाराला उजागर करण्यासाठी ८ मार्च १९८० पासून संपूर्ण देशभर अत्याचारांच्या विरोधातच स्त्रियांच्या मागण्या पुढे आल्या. पहिली मागणी संपूर्ण देशातून ही आली होती की, सूर्यास्तानंतर कोणत्याही स्त्रीला पोलीस ठाण्यामध्ये बोलावू नये. स्त्रियांच्या गृहकामाचे मोल झाले पाहिजे.

ख्यातनाम मराठी दिवंगत अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या सिनेकारकिर्दीचा वेध घेणारे ‘सुवर्ण नायिका जयश्री गडकर नक्षत्रलेणं’ पुस्तक आज प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे पती अभिनेते बाळ धुरी यांच्याशी मारलेल्या गप्पांवर आधारित हा लेख - ‘जयश्री गडकर-धुरी अशी सुवर्णसुंदरी होती की, जिच्याजवळ अभिनयाचा परीस होता आणि त्या अभिनयाच्या परीस स्पर्शाने तिने पन्नास वर्षांचा संपूर्ण कालखंड सुवर्णमय करून टाकला,’ बाळासाहेब धुरी म्हणजे जयश्री गडकर यांचे पती बोलत होते. बाळासाहेब धुरी यांचं व्यक्तिमत्त्व कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं, असंच आहे पण, जयश्रीताईंचा आणि त्यांचा प्रेमविवाह नव्हता. एकमेकांना बघून थोरामोठय़ांच्या संमतीने झालेला तो विवाह होता आणि लग्नानंतर बाळासाहेब जयश्रीताईंची ताकद होती.