Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

अण्णा हजारे यांचे मौन सुरू
पारनेर, ७ मार्च/वार्ताहर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सकाळपासून राळेगणसिद्धीमध्ये यादवबाबा मंदिरात

 

मौन सुरू केले. कामाची दगदग, तसेच मणक्याच्या आजाराने त्रस्त असल्याने विश्रांतीसाठी मौन धरले, तरी माहितीचा अधिकार कायद्याची पाहिजे तेवढी अंमलबजावणी होत नाही. तसेच वन विभागाच्या गायब झालेल्या जमीन प्रकरणांची चौकशीत चालढकल ही कारणे मौनामागे असण्याची शक्यता आहे.
हजारेंना सध्या मणक्याच्या आजाराने ग्रासले आहे. त्यांनी मागील महिन्यांत सर्व कार्यक्रम रद्द करून विश्रांती घेतली होती. त्यांना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीत होत असलेल्या वाढत्या गर्दीमुळे त्रासात भरच पडत आहे. त्यामुळे काही दिवस विश्रांतीसाठी मौन धरणार असल्याचे त्यांनी मागील आठवडय़ातच सांगितले होते.
दरम्यान, तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टचा राजीनामा त्यांनी दिला. त्यावर देवस्थान ट्रस्टने हजारेंवर आरोप कले. शुक्रवारी सायंकाळी पिंपळनेर येथे जाऊन निळोबाराय देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांबरोबर चर्चा केली. हिशेब, दप्तर व्यवस्थित नसल्याचे, तसेच लेखापरीक्षण केले नसल्याचे निदर्शनास आणून देत नाराजी व्यक्त केली होती. तसेच टीकास्त्र सोडणाऱ्या विश्वस्तांची कानउघडणी केली. या बैठकीनंतर आज सकाळपासून हजारे यांनी मौनास सुरुवात केली.
राज्य सरकार माहिती अधिकार कायद्याचा प्रसार व अंमलबजावणी करण्यात दिरंगाई करीत असल्याने अनेक वेळा अण्णांनी नाराजी व्यक्त केली होती. तरीही सरकारने याबाबत दखल घेतली नाही. तसेच वन विभागाच्या जमिनी मोठय़ा प्रमाणावर कागदावरून गायब झाल्या असून, या प्रकरणातही सरकार चौकशी करण्यास चालढकल करीत आहे, हेही कारण मौन धारण करण्यामागे असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशभर आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे. केवळ राजकीय वर्तुळात नव्हे, तर लोकांनाही निवडणुकीचेच वेध लागले आहेत. आचारसंहितेमुळे मंत्र्यांच्या स्तरावर विविध प्रश्नांवर मर्यादा आल्या आहेत. नेमक्या याच काळात सरकारकडील काही मागण्यांसंदर्भात हजारे यांनी आंदोलन सुरू केले असेल, तर त्यातही तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते.