Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

हेलन-केलर पुरस्काराचे आज वितरण
नाशिक, ७ मार्च / प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येथील लायन्स क्लब ऑफ नाशिक-पंचवटीतर्फे प्रथमच

 

दिल्या जाणाऱ्या ‘पंचवटी स्त्री गौरव हेलन-केलर’ पुरस्काराचे वितरण उद्या, ८ मार्च रोजी सकाळी साडे नऊला पंडित कॉलनीतील लायन्स क्लबच्या सभागृहात केले जाणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्यां रजनी लिमये यांची निवड करण्यात आली आहे.
शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मतीमंद मुलांची शाळा चालवून त्यांच्यात एक वेगळी शक्ती निर्माण करण्याबरोबर या मुलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचा प्रयत्न लिमये यांनी केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल या माध्यमातून घेण्यात आली. लायन्स क्लबने यंदाच्या वर्षांपासून सुरू केलेला हा पुरस्कार दरवर्षी प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात कार्यरत स्त्री व्यक्तिमत्वाला दिला जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. ऑस्कर विजेत्या स्लमडॉग मिलेनियरचे मराठीत भाषांतर केल्याबद्दल वंदना अत्रे यांचाही यावेळी सत्कार केला जाणार आहे.
या सोहळ्यानंतर कर्करोगतज्ज्ञ डॉ. राज नगरकर यांचे ‘कर्करोग जनजागरण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. भारतीय महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण झपाटय़ाने वाढत असून या व्याधीबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. यावेळी उपस्थितांच्या शंकाचे निरसनही केले जाणार आहे. यावेळी वैद्य विक्रांत जाधव व निलीमा जाधव कर्करोग प्रतिबंध व आरोग्य रक्षणाचे आहार यावर मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन क्लबचे अध्यक्ष उमेश भदाणे, सचिन शहा यांनी केले आहे.