Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

नगरभूमापन कार्यालयाच्या थकित कर वसुलीसाठी पालिकेची जप्तीची कारवाई
इचलकरंजी, ७ मार्च / वार्ताहर

एकेकाळी नगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या ऐतिहासिक व सध्या नगरपालिकेच्या मालकीची

 

वास्तू असलेल्या येथील नगरभूमापन कार्यालयाच्या थकीत कर वसुलीसाठी पालिकेनेच जप्तीची कारवाई शनिवारी केली. या कार्यालयाकडे गेल्या ४ वर्षांची १ लाख ३७ हजार रुपयांची थकबाकी आहे. नगरभूमापन अधिकारी दा. मा. दोरे यांच्या हलगर्जीपणामुळे या कार्यालयावर जप्तीची नामुष्कीजनक कारवाई करण्यात आल्याने त्यांच्याविषयी कर्मचारी तसेच कामासाठी आलेल्या नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. पालिकेने घेतलेल्या भूमिकेमुळे दुपारनंतर नगरभूमापन कार्यालयातील कामकाज थंडावले.
गोिवदराव हायस्कूलसमोर नगरभूमापन कार्यालय आहे. ही वास्तू नगरपालिकेच्या मालकीची असली तरी त्याची निगा व कामकाज चालवण्याची जबाबदारी नगरभूमापन कार्यालयाची आहे. पालिकेने गेल्या चार वर्षांपासून या वास्तूची संयुक्त कर आकारणी सुरू केली आहे. मात्र नगरभूमापन कार्यालयातील अधिकारी तसेच त्यांच्या वरिष्ठांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
चार वर्षांचा कर थकित राहिल्याने पालिकेच्या जप्ती वसुली पथकाने नगरभूमापन कार्यालयास सील ठोकण्याची प्रक्रिया सुरू केली. हे समजताच द.मा.दोरे हे तातडीने कर कार्यालयात मुक्काम ठोकलेले मुख्याधिकारी त्रिंबक डेंगळ-पाटील यांना भेटले. पण त्यातून काही निष्पण्ण झाले नाही. दोरे हात हलवित कार्यालयात परतले. अखेर दुपारी दीड वाजता पालिकेचे अधिकारी मंगेश दुरूगकर यांनी जप्ती पंचनामा करून नगरभूमापन कार्यालयास सील ठोठावले. सन २००८-०९ अखेर १ लाख ३७ हजार ४५ रुपये कर भरण्याची नोटीस दोरे यांना दिली. या कारवाईत विजय घोडके, रामचंद्र उंदूरे, विनय पाटील, आण्णासाहेब कागले आदी अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.