Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

पुणे-सोलापूर इंटरसिटीला उन्हाळ्यात ९ जूनपर्यंत मुदतवाढ
सोलापूर, ७ मार्च/प्रतिनिधी

मुंबई-पुणेदरम्यान धावणारी इंद्रायणी एक्स्प्रेस प्रायोगिक तत्वावर सोलापूपर्यंत नेण्यास विशेष गाडी म्हणून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यानंतर उन्हाळी विशेष म्हणून हीच गाडी ३

 

एप्रिल ते ९जूनपर्यंत सेवेत राहणार आहे. या गाडीला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद यापुढेही कायम राहिल्यास या गाडीची सेवा कायमस्वरूपी चालणार आहे.
असंख्य प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नाने इंद्रायणी एक्स्प्रेस पुणे-सोलापूपर्यंत इंटरसिटीच्या स्वरूपात (गाडी क्र. ११३ व ११४) प्रायोगिक तत्वावर धावत आहे. गेल्या २३ फेब्रुवारी रोजी या गाडीचा शुभारंभ झाला होता. ९ मार्चपर्यंत धावणाऱ्या या इंटरसिटी गाडीला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता पुन्हा उन्हाळी विशेष म्हणून ३ एप्रिल ते ९ जूनदरम्यान ही गाडी धावणार आहे. प्रायोगिक तत्वावर या गाडीला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद लाभत असून एकूण १५५६ प्रवाशांची क्षमता असलेल्या या गाडीचा गेल्या शनिवारी १२५० तर रविवारी १३५५ प्रवाशांनी लाभ घेतला. त्यामुळे आगामी काळातही प्रवाशांच्या मागणीनुसार ही गाडी कायम राहण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, यंदा ३ एप्रिल ते ९ जूनपर्यंत उन्हाळ्यात पुणे-सोलापूर इंटरसिटीसह पाच विशेष रेल्वे गाडय़ा धावणार आहेत. यात उस्मानाबाद-पुणे (क्र. ११५ व ११६) गाडी आठवडय़ातून सोमवार, बुधवार व शनिवार असे तीन दिवस धावणार आहे, तर पंढरपूर-लातूर गाडी (क्र. १०१ व १०२) दररोज धावणार आहे. तसेच दादर-हैदराबाद एक्स्प्रेस (क्र. ७३१ व ७३२) रविवार व सोमवारी चालणार आहे. मदुराई-लो.टि. एक्स्प्रेस (६३१ व ६३२)आठवड्यातून एकदा गुरुवारी सुटून सोलापुरात शुक्रवारी येणार आहे. तर शनिवारी ही गाडी लोकमान्य टर्मिनसवरून सुटून रविवारी सोलापुरातून पुढे मदुराईकडे प्रस्थान करेल.