Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘एक गाव, एक होळी’चा सामाजिक वनीकरणाचा उपक्रम
नगर, ७ मार्च/प्रतिनिधी

‘खेलो होली, इको फ्रेंडली’ अशी घोषणा करणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाने या वर्षीच्या

 

होळी सणासाठी ‘एक गाव-एक होळी’ धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. दि. १० रोजी होळी आहे.
जनतेने होळींची संख्या कमी करावी, होळी लहान करावी, त्यासाठी लाकडांचा व गोवऱ्यांचा कमीत कमी वापर करावा, होळीसाठी एरंडी वृक्षाची मोठय़ा प्रमाणावर तोड होते. त्यासाठी एरंडीची मोठय़ा प्रमाणावर लागवड हाती घ्यावी. आता पळसाला फुले येण्यास सुरुवात झाली आहे. खाली पडलेल्या फुलांचा नैसर्गिक रंग तयार करून त्याचा वापर करावा. रासायनिक रंग वापरू नये, असे आवाहन वनीकरण विभागाने केले आहे.
वनीकरण विभागाच्या स्थानिक शाखेनेही पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी इको क्लबमार्फत पर्यावरणपूरक पद्धतीने जनजागृती कार्यक्रम हाती घ्यावेत, पुरेसा नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी महिला बचतगटांची मदत घ्यावी, असा आदेश काढला आहे.
होळीबरोबरच वनातील जीवांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. वन विभागाने पर्यावरण संतुलनामध्ये वन्यजीवांचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगावे, तसेच तृणभक्षक वन्यजीवांची हत्या केल्यामुळे बिबटय़ासारख्या मांसाहारी प्राण्यांचे भक्ष्य कमी होऊन त्याचा मानवी वस्तीत वावर वाढतो हे समजावून होळीनिमित्त ससे, रानडुक्कर यांची शिकार न करण्याबाबत, तसेच वनांना आगी लावणे टाळावे, यासाठी प्रबोधन करावे, अशी अपेक्षा सामाजिक वनीकरण विभागाच्या संचालकांनी केली आहे.