Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

सिध्देश्वर एक्स्प्रेसचे डबे वर्षभरात १८ वरून २२ पर्यंत वाढविणार
सोलापूर-कोल्हापूर रेल्वेचा प्रस्ताव विद्युतीकरण व दुहेरीकरण
सोलापूर, ७ मार्च/प्रतिनिधी

दौंड ते गुंटकलदरम्यान ५५० किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण दुहेरीकरणाचे काम

 

हाती घेण्यात आले असून त्यासाठी निधीची अडचण भासणार नाही. या कामासाठी जागतिक बँकेने अर्थसाह्य़ केले आहे. येत्या तीन वर्षांत हे काम न रेंगाळता पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ठरल्याप्रमाणे हे काम मार्गी लागल्यास मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचा भरीव विकास होऊन प्रवाशांना रेल्वे प्रवास अधिक सुखकर ठरणार आहे. त्यासाठी स्थानिक नेतृत्वाने आणखी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर-मुंबई सिध्देश्वर एक्स्प्रेसवर प्रवाशांचा असलेला सततचा भार लक्षात घेऊन या गाडीच्या डब्यांची संख्या १८ वरून २२ पर्यंत वाढविण्यात येणार असून त्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकातील पीट लाईन्सची मर्यादा २४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या सेवाविस्तारासाठी प्रवाशांना किमान एक वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सिध्देश्व्रर एक्स्प्रेसवर प्रवाशांचा भार सातत्याने वाढतच आहे. प्रवाशांची प्रतीक्षा यादी २५० पर्यंत जात असल्याने रेल्वे प्रशासनाकडून या गाडीला एक जादा डबा जोडण्यात येतो. ही सुविधाही कमी पडत असल्यामुळे आणखी तीन-चार डबे वाढविण्याचा प्रस्ताव अमलात आणणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकात पीट लाईन्सची संख्या २४ पर्यंत वाढविण्यास रेल्वे मुख्यालयाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार हे काम हाती घेऊन वर्षभरात पूर्ण करण्याचा मानस असल्याचे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ परिचालन प्रबंधक सुशील गायकवाड यांनी सांगितले. याशिवाय सोलापूर-पुणे हुतात्मा इंटरसिटीचे डबे १३ वरून १६ पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सोलापूर-कोल्हापूर इंटरसिटी रेल्वेसेवा उपलब्ध नाही. ही उणीवही येत्या वर्षभरात भरून काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी पंढरपूर-मिरज मीटरगेज रेल्वेमार्गाचे रुंदीकरणाचे काम यापूर्वीच हाती घेण्यात आले आहे. १३७ किलोमीटर अंतराचे हे काम पूर्ण होण्यासाठी एका वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. पंढरपूर-मुंबई पॅसेंजर दररोज सोडण्याचा तसेच पंढरपूर-हैदराबाद पॅसेंजर सोलापूरमार्गे प्रस्ताव आहे. पंढरपूर-सोलापूर गाडी दररोज सकाळ व संध्याकाळ सुरू करण्याचा प्रस्तावही तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पुणे-मनमाड गाडी व सिकंदराबाद-मनमाड गाडी शिर्डीपर्यंत नेण्याचाही प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
बंगलोर-मुंबई उद्यान एक्स्प्रेसची संख्या २१ वरून २४ पर्यंत वाढविण्यात येत असून त्यासाठी कर्जतनजीकच्या खंडाळा घाटात तांत्रिक चाचणी करण्यात येणार आहे. गोलगुमट एक्स्प्रेस सोलापूरहून हुबळीच्या पुढे बंगलोपर्यंत नेण्याचा प्रयत्न असून त्याशिवाय विजापूर-मुंबई जलद पॅसेंजर आठवडय़ातून चार दिवसांऐवजी दररोज सोडण्याचाही प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. सोलापूरहून नागपूरकडे जाण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने उस्मानाबाद व लातूरमार्गे सोलापूर-नागपूर रेल्वेगाडी सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सोलापूर रेल्वे स्थानकात असलेले मालघर कमी पडत असल्याने लगतच रामवाडीजवळ ६ कोटी ५० लाख खर्चाचे जंबो शेड उभारण्यात येत आहे. या जंबो शेडची ४० व्ॉगेन्सची पूर्ण मालगाडी उतरेल एवढी क्षमता राहील. सद्याचे मालघर आगामी काळात बंद करण्यात येणार आहे. येथील मालघरावरील वाढता भार कमी करण्यासाठी बाळे येथे ४ कोटी ५० लाख खर्चाचे मालघर उभारण्यात येत असून या कामाच्या निविदा लवकरच काढण्यात येणार आहेत. याशिवाय बार्शी व सांगोला येथेही मालघर उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी बार्शीत कामाला सुरुवात झाली आहे. तसेच भिगवण येथे कोळसा ठेवण्यासाठी ३५ लाखांचे सायडिंग बांधण्याचे काम पूर्ण झाल्याची माहितीही गायकवाड यांनी सांगितली.