Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

पाणीटंचाईवर मात करण्याचा युवकांचा प्रयत्न
मूर्तीजापूर, ७ मार्च / वार्ताहर
शहरातील सध्याच्या भीषण पाणीटंचाईवरील उपाययोजनांच्या अंमलबजावणीला शासकीय

 

स्तरावरून विलंब होऊ लागल्याने अखेर येथील युवकांनीच दिसेल त्या उपलब्ध साधनांचा उपाय शोधण्याचा प्रयत्न चालवला आहे. काही युवकांनी श्रमदानातून विहिरी साफ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
नगरपालिका व लोकप्रतिनिधींचे पाणीटंचाई निवारण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे तर सरकार प्रशासनही परिसरातील विविध जलसाठे कोरडे पडू लागल्याने हतबल झाल्याचे बघून अखेर येथील आठवडी बाजार व लकडगंज भागातील युवकांनी उपलब्ध विहिरींमधून ३ मार्चपासून पाणी मिळवण्याचा श्रमदानातून प्रयत्न चालवला आहे. लकडगंज परिसरातील मोठी ओसाड विहीर पिंपळे ले-आऊटमधील युवा नेते हरीश पिंपळे यांच्या पुढाकाराने केरकचरा व गाळ उपसून पाणी वापरण्यायोग्य केली आहे. सुमारे चार-पाच वर्षांपासून ही विहीर ओसाड पडून असली तरी तिच्यातील जलसाठा वर येऊ लागल्यानंतर तिच्यातील पाण्याचे शुद्धीकरण ब्लिचिंग-तुरटी आदींचा वापर करून पाणी पिण्यायोग्य करून दाखवले आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून या शहराला सतत भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका व लोकप्रतिनिधींच्या प्रलंबित आराखडे प्रस्तावांच्या अपयशी प्रयत्नांना अशा प्रकारे चोख उत्तर या युवकांनी दिले. शहरातील विविध भागातील युवावर्गही आपापल्या परिसरातील ओसाड विहिरी साफ करण्याच्या प्रयत्नात असून त्यांना विविध सामाजिक संघटनाही त्यांच्या प्रयत्नात सहभाग देण्यास तयार होऊ शकतात, असा आशावाद या मोहिमेत सहभागी युवकांनी व्यक्त केला आहे.