Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
राज्य

अण्णा हजारे यांचे मौन सुरू
पारनेर, ७ मार्च/वार्ताहर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सकाळपासून राळेगणसिद्धीमध्ये यादवबाबा मंदिरात मौन सुरू केले. कामाची दगदग, तसेच मणक्याच्या आजाराने त्रस्त असल्याने विश्रांतीसाठी मौन धरले, तरी माहितीचा अधिकार कायद्याची पाहिजे तेवढी अंमलबजावणी होत नाही. तसेच वन विभागाच्या गायब झालेल्या जमीन प्रकरणांची चौकशीत चालढकल ही कारणे मौनामागे असण्याची शक्यता आहे.

हेलन-केलर पुरस्काराचे आज वितरण
नाशिक, ७ मार्च / प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येथील लायन्स क्लब ऑफ नाशिक-पंचवटीतर्फे प्रथमच दिल्या जाणाऱ्या ‘पंचवटी स्त्री गौरव हेलन-केलर’ पुरस्काराचे वितरण उद्या, ८ मार्च रोजी सकाळी साडे नऊला पंडित कॉलनीतील लायन्स क्लबच्या सभागृहात केले जाणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्यां रजनी लिमये यांची निवड करण्यात आली आहे.

नगरभूमापन कार्यालयाच्या थकित कर वसुलीसाठी पालिकेची जप्तीची कारवाई
इचलकरंजी, ७ मार्च / वार्ताहर

एकेकाळी नगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या ऐतिहासिक व सध्या नगरपालिकेच्या मालकीची वास्तू असलेल्या येथील नगरभूमापन कार्यालयाच्या थकीत कर वसुलीसाठी पालिकेनेच जप्तीची कारवाई शनिवारी केली. या कार्यालयाकडे गेल्या ४ वर्षांची १ लाख ३७ हजार रुपयांची थकबाकी आहे. नगरभूमापन अधिकारी दा. मा. दोरे यांच्या हलगर्जीपणामुळे या कार्यालयावर जप्तीची नामुष्कीजनक कारवाई करण्यात आल्याने त्यांच्याविषयी कर्मचारी तसेच कामासाठी आलेल्या नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. पालिकेने घेतलेल्या भूमिकेमुळे दुपारनंतर नगरभूमापन कार्यालयातील कामकाज थंडावले.

पुणे-सोलापूर इंटरसिटीला उन्हाळ्यात ९ जूनपर्यंत मुदतवाढ
सोलापूर, ७ मार्च/प्रतिनिधी

मुंबई-पुणेदरम्यान धावणारी इंद्रायणी एक्स्प्रेस प्रायोगिक तत्वावर सोलापूपर्यंत नेण्यास विशेष गाडी म्हणून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यानंतर उन्हाळी विशेष म्हणून हीच गाडी ३ एप्रिल ते ९जूनपर्यंत सेवेत राहणार आहे. या गाडीला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद यापुढेही कायम राहिल्यास या गाडीची सेवा कायमस्वरूपी चालणार आहे. असंख्य प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नाने इंद्रायणी एक्स्प्रेस पुणे-सोलापूपर्यंत इंटरसिटीच्या स्वरूपात (गाडी क्र. ११३ व ११४) प्रायोगिक तत्वावर धावत आहे.

‘एक गाव, एक होळी’चा सामाजिक वनीकरणाचा उपक्रम
नगर, ७ मार्च/प्रतिनिधी

‘खेलो होली, इको फ्रेंडली’ अशी घोषणा करणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाने या वर्षीच्या होळी सणासाठी ‘एक गाव-एक होळी’ धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. दि. १० रोजी होळी आहे. जनतेने होळींची संख्या कमी करावी, होळी लहान करावी, त्यासाठी लाकडांचा व गोवऱ्यांचा कमीत कमी वापर करावा, होळीसाठी एरंडी वृक्षाची मोठय़ा प्रमाणावर तोड होते. त्यासाठी एरंडीची मोठय़ा प्रमाणावर लागवड हाती घ्यावी. आता पळसाला फुले येण्यास सुरुवात झाली आहे.

सिध्देश्वर एक्स्प्रेसचे डबे वर्षभरात १८ वरून २२ पर्यंत वाढविणार
सोलापूर-कोल्हापूर रेल्वेचा प्रस्ताव विद्युतीकरण व दुहेरीकरण
सोलापूर, ७ मार्च/प्रतिनिधी
दौंड ते गुंटकलदरम्यान ५५० किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी निधीची अडचण भासणार नाही. या कामासाठी जागतिक बँकेने अर्थसाह्य़ केले आहे. येत्या तीन वर्षांत हे काम न रेंगाळता पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ठरल्याप्रमाणे हे काम मार्गी लागल्यास मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचा भरीव विकास होऊन प्रवाशांना रेल्वे प्रवास अधिक सुखकर ठरणार आहे. त्यासाठी स्थानिक नेतृत्वाने आणखी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

ठाणे स्थायी समिती सभापतीपदी घाग, तर परिवहनवर चव्हाण बिनविरोध
ठाणे, ७ मार्च/प्रतिनिधी

ठाणे महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळा घाग, तर परिवहन समिती सभापतीपदी अपक्ष नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. ठाणे महापालिका स्थायी समितीच्या सभापतीसाठी शिवसेनेतील नगरसेवकांमध्ये चढाओढ लागली असताना, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रगुप्त ऊर्फ बाळा घाग यांना अखेर न्याय देण्यात आला. शिवसेनेचे सभागृह नेते पांडुरंग पाटील आणि राष्ट्रवादीचे दिनेश कांबळे यांनी आयत्यावेळी उमेदवारी मागे घेतल्याने सभापतीपदी घाग बिनविरोध निवडून आले, तर डबघाईस आलेल्या ठाणे परिवहन समितीला नवी उभारी देण्यासाठी सलग चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले अपक्ष नगरसेवक सुधाकर चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. चव्हाण यांच्या विरोधात आक्षेप घेतलेल्या दत्ता माने यांनी आयत्यावेळी निवडणुकीतून माघार घेतली. चव्हाण यांनी यापूर्वी महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदाची हॅटट्रिक साजरी केली होती. जनतेत लोकप्रिय असलेल्या चव्हाण यांच्याकडून परिवहन सेवेचा कारभार सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भंडारा जिल्हा परिषदेला स्वच्छतेचा पुरस्कार
भंडारा, ७ मार्च / वार्ताहर

जिल्ह्य़ातील गावे आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, शाळा व अंगणवाडीमध्ये स्वच्छतागृहाची निर्मिती करून निर्मलग्राम, शालेय स्वच्छता व आरोग्य, शिक्षण या कार्यक्रमाची भंडारा जिल्हा परिषदेने प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सन २००६-०७ च्या राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा परिषद पुरस्काराने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते १० लाखाचा पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. भंडारा जिल्ह्य़ामध्ये ५४१ ग्रामपंचायती असून सन २००५-०६ मध्ये २ ग्रामपंचायती व ०६-०७ मध्ये १८४ ग्रामपंचायतीला निर्मलग्राम पुरस्कार मिळाला. ३४.१४ टक्के ग्रामपंचायतीला निर्मलग्राम पुरस्कार मिळाले आहे. जिल्ह्य़ातील ७४६ शाळांमध्ये शालेय शौचालय बांधण्यात आले. १०६१ अंगणवाडीपैकी ९५० अंगणवाडीमध्ये स्वच्छतागृहे बांधण्यात आली.

रिलायन्स लातूर पॅटर्नचे फलक फाडल्याची तक्रार
नगर, ७ मार्च/प्रतिनिधी

अनेक महाविद्यालयांशेजारी लावण्यात आलेले रिलायन्स लातूर पॅटर्न (लातूर) या शैक्षणिक संस्थेचे फलक समाजकंटकांनी फाडल्याबद्दल संस्थेतर्फे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. ही संस्था ११ व १२वीच्या मुलींसाठी मार्गदर्शन करते. संस्थेने आपली माहिती देणारे फलक लावले होते. मात्र, ते कोणीतरी फाडले. व्यावसायिक स्पर्धेतून हा प्रकार घडला असावा. या प्रकरणी आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे प्रा. के. एम. वानखेडे यांनी केली आहे.