Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
क्रीडा

भारताचा पाकिस्तानवर दहा विकेट्सनी विजय
महिला विश्वचषक क्रिकेट

बोवराल (ऑस्ट्रेलिया) ७ मार्च/पीटीआय

भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दहा गडी राखून धूळ चारली व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज धडाकेबाज प्रारंभ केला. रुमेली धर हिच्या प्रभावी गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा डाव २९ षटकांत अवघ्या ५७ धावांत कोसळला. भारताच्या अंजुम चोप्रा व अनघा देशपांडे या सलामीच्या जोडीने केवळ १० षटकांत संघास विजय मिळवून दिला. साखळी ब गटात हा उद्घाटनाचा सामना एकतर्फी ठरला. भारताची पुढील लढत इंग्लंडशी सिडनी येथे १० मार्चला होणार आहे.

आयपीएलची सलामी ब्रेबॉर्नवर होण्याची शक्यता
मुंबई, ७ मार्च / क्री. प्र.

इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनावरील अनिश्चितेचे सावट आता दूर झाले असून या स्पर्धेची सलामीची झुंज ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळविण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. आयपीएलचे प्रमुख ललित मोदी आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्यात यासंदर्भात बोलणी होणार असून त्यानंतर या स्पर्धेचा पहिला सामना ब्रेबॉर्नवर खेळविला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या सोमवारी या दोघांमध्ये चर्चा होणार आहे आणि त्यातून सन्मान्य तोडगा निघण्याची शक्यता आहे. आयपीएलचे सामने ब्रेबॉर्नवर खेळविण्यासंदर्भात जेव्हा क्लबची व्यवस्थापन समितीने क्लबच्या सदस्यांची मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला नकार देण्यात आला.

स्ट्रॉसचे मालिकेतील तिसरे शतक; इंग्लंड सुस्थितीत
पोर्ट ऑफ स्पेन, ७ मार्च / एएफपी

इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसने संपूर्ण दिवस फलंदाजी करीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील आपल्या तिसऱ्या शतकाची नोंद केली आणि पाचव्या व अखेरच्या कसोटीत इंग्लंडला भक्कम स्थिती प्राप्त करून दिली. पहिल्या दिवशी इंग्लंडचा संघ स्ट्रॉसच्या १३९ धावांच्या जोरावर २ बाद २५८ असा सुस्थितीत होता. स्ट्रॉसने ओवेस शहा व पॉल कॉलिंगवूड यांच्यासह शतकी भागीदारीही केली. स्ट्रॉसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय त्याच्यासाठीही अचूक ठरला. आपल्या आतापर्यंतच्या या दौऱ्यात १६९, १४२ अशा खेळी रचणाऱ्या स्ट्रॉसने आपल्या तिसऱ्या शतकाची नोंद केली.

ऑस्ट्रेलियाला ३५२ धावांवर रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी
दरबान, ७ मार्च / पी. टी. आय.

येथील दुसऱ्या कसोटी क्रिकेट लढतीत ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव ३५२ धावांत रोखणाऱ्या यजमान दक्षिण आफ्रिकेला हा आनंद फारकाळ उपभोगता आला नाही आणि केवळ २७ षटकांतच त्यांची ४ बाद ६२ अशी अवस्था झाली आहे. त्यात भर म्हणून कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि अनुभवी फलंदाज जॅक कॅलिस हे दोघेही जायबंदी झाल्याने त्यांना तंबूत परतावे लागले. ऑस्ट्रेलियाने सकाळी ४ बाद ३०३ धावांवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला त्या वेळी हसी आणि नॉर्थ ही जमलेली जोडी त्यांना मोठी धावसंख्या उभारून देणार असेच वाटत होते. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ६३ धावांची भागी रचल्यानंतर मॉर्केलने हसीला त्रिफळाचीत करून ही जोडी फोडली. हसीने ९ चौकारांसह ५० धावा केल्या.

भारताविरुद्ध न्यूझीलंडवरच अधिक दडपण
तिसरी ‘वन डे’ आज

ख्राईस्टचर्च, ७ मार्च / पीटीआय

आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला भारतीय संघ उद्या, होणाऱ्या तिसऱ्या लढतीतही यजमान न्यूझीलंडवर वर्चस्व कायम राखण्यास सज्ज आहे. न्यूझीलंड संघासाठी ही लढत ‘करा अथवा मरा’ धर्तीची असल्यामुळे यजमान संघावरच अधिक दडपण असल्याची पुरती कल्पना भारतीय संघाला असून नेमका याचाच फायदा घेण्यास पाहुणा संघ उत्सुक आहे. पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाकडे १-० ची आघाडी आहे. भारतीय संघाने उद्या विजय मिळवल्यास त्यांना मालिका न गमावण्याची हमी मिळेल तसेच पुढच्या दोन सामन्यात त्यांना अगदी सहजतेने मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करता येईल.

सराव सामन्यात लक्ष्मणच्या ४४ धावा तर अमित मिश्राचे तीन बळी
ख्राईस्टचर्च, ७ मार्च / पीटीआय

भारताचा मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणच्या संयमी ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर चार दिवसांच्या लढतीत ओटॅगो व्होल्ट्स संघाने वेलिंग्टन फायरबर्ड्स संघाविरुद्ध दुसऱ्या दिवसअखेर वर्चस्व मिळवले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्पर्धेत विविध संघातर्फे सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम २० मार्चपासून
मुंबई, ७ मार्च / क्री. प्र.

महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम अजिंक्यपद स्पर्धा शिवाजी पार्क जिमखानातर्फे मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने २० ते २२ मार्च २००९ या कालावधीत शिवाजी पार्क जिमखाना, दादर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
राज्य संघटनेच्या विद्यमाने खेळविण्यात येणारी ही स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी अशा दोन गटांत खेळविली जाणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत राज्यातील १८ जिल्ह्य़ांतून ६०० कॅरमपटू आणि अधिकारी भाग घेणार आहेत. या प्रतिष्ठेच्या राज्य स्पर्धेमध्ये एकूण रुपये ५०,०००/- ची रोख पारितोषिके आणि चषक आणि प्रमाणपत्रे विजेत्या स्पर्धकांना प्रदान करण्यात येतील. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ५० सुरको चॅम्पियनशिप कॅरम बोर्डस् आणि अनिरुद्ध व्हाइट स्लॅम ब्रेक-टू-फिनिश कॅरम सोंगटय़ा वापरण्यात येतील. इच्छुक स्पर्धकांच्या प्रवेशिका १२ मार्च २००९ रात्रौ ९ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह आपल्या जिल्हा कार्यवाह यांच्यामार्फतच खालील ठिकाणी स्वीकारल्या जातील. नथुराम पाटील, मानद कार्यवाह, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, मेघना पेजारी नाका, पेजारी, ता. अलिबाग, जिल्हा रायगड- ४०२१०८, दूरध्वनी- ०२१४१- २५२२१७, मोबाईल- ९२७२४२७६९८. जनार्धन संगम, सहकार्यवाह, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, १/२९, दुधवाला चाळ, टिळकभवनसमोर, काकासाहेब गाडगीळ मार्ग, मुंबई-४०००२५. मोबाईल नं. ९८२१८ ९४९६१ / ९८६९०४३३२७. मुंबई जिल्ह्य़ाच्या प्रवेशिका खालील ठिकाणी ९ मार्च ते ११ मार्च २००९ सायं. ६ ते ८ वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. अरुण केदार, सचिव, मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन, शिवाजी पार्क जिमखाना, शिवाजी पार्क, दादर, मुंबई-४०००२८, मोबाईल नं. ९८६९२४४९८०, ९९८७०४५४२९

पेस-भूपती विजयी; चायनिज तैपेईविरुद्ध भारताला २-१ची आघाडी
काओसियंग, ७ मार्च / पीटीआय

लिएंडर पेस व महेश भूपती यांनी दुहेरीत त्सुंग-ह्यु यांग व चू-ह्यून यी यांची झुंज ६-४, ७-६, ६-७(२), ६-२ गुणांनी मोडून काढली आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आशिया-ओशेनिया विभागातील गट-१च्या दुसऱ्या फेरीत चायनिज तायपेईविरुद्धच्या लढतीत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. आज झालेल्या या लढतीत पहिल्या दोन सेटमध्ये पराभव स्वीकारणाऱ्या यजमान संघाच्या त्सुंग-ह्यु यांग व चू-ह्यून यी या जोडीने तिसरा सेटजिंकत रंगत निर्माण केली. अनेक ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या पेस-भूपती यांनी तिसऱ्या सेटमध्ये सहा ब्रेकपॉईंट वाचवले. टायब्रेकमध्ये महत्त्वाच्या क्षणी दुहेरी चुका केल्यामुळे पेस व भूपती यांनी तिसरा सेट गमावला. भारतीय जोडी तिसऱ्या सेटमध्ये १-५ने पिछाडीवर होती. तायपेईच्या खेळाडूंनी तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सव्‍‌र्हिस भेदण्यात यश मिळवले पण, त्यानंतर पेस-भूपती जोडीने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना सलग पाच गेमजिंकत ६-५ अशी आघाडी मिळवली पण, त्यानंतर तायपेईच्या जोडीने टायब्रेकमध्ये सरशी साधत सेटजिंकला. चौथ्या सेटमध्ये मात्र भारतीय जोडीने ६-२ गुणांनी सरशी साधत विजयावर शिक्कामोर्तब केले. आज दुहेरीतील मिळवलेल्या विजयानंतर २-१ अशी आघाडी घेणाऱ्या भारताला आशिया-ओशिनिया गटात तिसरी फेरी गाठण्यासाठी उद्या, रविवारी होणाऱ्या परतीच्या एकेरीच्या दोन लढतींपैकी एक लढत जिंकावी लागेल. एकेरीत विजयी सलामी देणाऱ्या सोमदेव देवबर्मनला उद्या, रविवारी परतीच्या एकेरीच्या लढतीत येन-हसून लूविरुद्ध खेळावे लागणार आहे. लूचा फॉर्म बघता त्याला पराभूत करण्याचे सोमदेवपुढे मोठे आव्हान असेल. रोहण बोपण्णाला मात्र एकेरीच्या लढतीत टी चेनविरुद्ध विजय मिळवण्याची संधी आहे.

आनंदची आणखी एकदा बरोबरी
लिनारेस, ७ मार्च / पीटीआय

विश्वविजेता आणि भारताचा सुपरग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याने लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेत पुन्हा एकदा बरोबरी साधली. १३व्या फेरीत आनंद आणि रशियाचा अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. आता स्पर्धेची १४वी आणि अखेरची फेरी शिल्लक असून या फेरीत जर आनंदने विजय मिळविला आणि ग्रिसचुक तसेच इव्हानचुक यांना या फेरीत पराभव स्वीकारावा लागला तरच आनंद पहिल्या स्थानावर संयुक्तपणे जागा मिळवू शकतो. आनंदने ग्रिसचुकविरुद्धच्या सामन्यात सिसिलियन नॅजडोर्फ पद्धतीचा अवलंब केला आणि सुरुवातीला सामन्यावर पकड घेतली, पण २०व्या चालीला ग्रिसचुकने आपल्या भात्यातील नवे अस्त्र काढल्यामुळे आनंदला थोडी माघार घ्यावी लागली. त्याच्या राजाकडील बाजूवर ग्रिसचुकने आक्रमण करून दडपण आणले. मात्र २९व्या चालीला ग्रिसचुककडून झालेली थोडीशी चूक आनंदला प्रोत्साहित करणारी ठरली. त्यानंतर पुन्हा एकदा ग्रिसचुकने चूक केली आणि आनंदला या सामन्यात ग्रिसचुकएवढीच तोलामोलाची स्थिती प्राप्त झाली. शेवटी ३३व्या चालीला दोघांनी बरोबरी मान्य केली. युक्रेनचा व्ॉसिली इव्हानचुक याने अर्मेनियाच्या लेव्हॉन अ‍ॅरोनियनला नमवून १३फेऱ्यांनंतर ७.५ गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे. आता ग्रिसचुक आणि इव्हानचुक संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन याला अझरबैजानच्या तैमूर राजबोव्हविरुद्धच्या सामन्यात विजयाने हुलकावणी दिली. त्यामुळे त्याला पहिल्या स्थानावर झेप घेण्यात अपयश आले. आता तो ७ गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. आनंदकडे ६.५ गुण असून तो चौथ्या स्थानावर आहे. राजबोव्ह, अ‍ॅरोनियन व वांग यू हे सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. तर लिनियर डॉमिनगेझ याच्या खात्यात ५.५ गुण असून तो अखेरच्या स्थानावर आहे.

सचिनने २०११च्या विश्वचषक स्पर्धेत खेळावे - गांगुली
पाटणा, ७ मार्च / पीटीआय

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कारकिर्दीत अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले असले तरी त्याच्यात अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक आहे. सचिनने २०११मध्ये भारतीय उपखंडात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळावे, असे मत अलीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले. आगामी विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची सचिनमध्ये क्षमता आहे पण, हा निर्णय सर्वस्वी त्याचा आहे, असेही गांगुलीने सांगितले.