Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

भारताचा पाकिस्तानवर दहा विकेट्सनी विजय
महिला विश्वचषक क्रिकेट
बोवराल (ऑस्ट्रेलिया) ७ मार्च/पीटीआय

भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दहा गडी राखून धूळ चारली व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज धडाकेबाज प्रारंभ केला.

 

रुमेली धर हिच्या प्रभावी गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा डाव २९ षटकांत अवघ्या ५७ धावांत कोसळला. भारताच्या अंजुम चोप्रा व अनघा देशपांडे या सलामीच्या जोडीने केवळ १० षटकांत संघास विजय मिळवून दिला. साखळी ब गटात हा उद्घाटनाचा सामना एकतर्फी ठरला. भारताची पुढील लढत इंग्लंडशी सिडनी येथे १० मार्चला होणार आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवीत पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण उडविली.
पाकिस्तान संघाकडून साना मीर हिने १७ धावा केल्या तर नैन आबिदीने १० धावा केल्या. या दोन खेळाडूंचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य खेळाडू फार वेळ मैदानावर टिकू शकल्या नाहीत. त्यांच्या अन्य खेळाडू दोन आकडी धावाही करु शकल्या नाहीत. भारतीय गोलंदाजांनी १० अवांतर धावा देत पाकिस्तानचे अर्धशतक होण्यास हातभार लावला. पाकिस्तानच्या पहिल्या १० धावा अवांतर धावाच होत्या व त्यामध्ये त्यांनी तीन गडी गमावले होते. भारताच्या रुमेलीने ८ षटकांपैकी ५ षटके निर्धाव देत फक्त ७ धावांमध्ये तीन गडी बाद केले. अंजु शर्मा व प्रियांका रॉय यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करीत तिला चांगली साथ दिली. भारताने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा फक्त १० षटकांत पार केल्या चोप्राने नाबाद १७ धावा केल्या तर देशपांडे हिने नाबाद २६ धावा टोलविल्या.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी १२ वाईड चेंडूंसह १५ अवांतर धावा देत भारताचा विजय सुकर केला.