Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आयपीएलची सलामी ब्रेबॉर्नवर होण्याची शक्यता
मुंबई, ७ मार्च / क्री. प्र.

इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनावरील अनिश्चितेचे सावट आता दूर झाले असून या स्पर्धेची

 

सलामीची झुंज ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळविण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. आयपीएलचे प्रमुख ललित मोदी आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्यात यासंदर्भात बोलणी होणार असून त्यानंतर या स्पर्धेचा पहिला सामना ब्रेबॉर्नवर खेळविला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
येत्या सोमवारी या दोघांमध्ये चर्चा होणार आहे आणि त्यातून सन्मान्य तोडगा निघण्याची शक्यता आहे. आयपीएलचे सामने ब्रेबॉर्नवर खेळविण्यासंदर्भात जेव्हा क्लबची व्यवस्थापन समितीने क्लबच्या सदस्यांची मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला नकार देण्यात आला. त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलावून क्लबच्या नियमांतच बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता, पण हे पाऊलही शेवटी मागे घेण्यात आले. १९४८ ते १९७२ या कालावधीत ब्रेबॉर्नवर कसोटी सामने खेळविले गेले आहेत, त्यामुळे तेथे आयपीएलचे ट्वेन्टी-२० सामने होऊ नयेत, असे क्लबच्या सदस्यांचे मत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूंकडून तोडगा निघेल आणि आयपीएलचे सामने ब्रेबॉर्नवर होऊ शकतील.
पहिल्या आयपीएलची अंतिम लढत मुंबईत २४ मे रोजी मुंबईत घेण्यासंदर्भात आयपीएलने सीसीआयशी संपर्क साधला होता. पण क्लबच्या सदस्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे या प्रयत्नांत यश आले नाही. आयपीएलने मागणी केली होती की, या सामन्यासाठी संपूर्ण क्लबहाऊस आयोजकांकडे सोपवावे आणि सीसीआयच्या सदस्यांसाठी ५००० जागा वेस्ट स्टॅण्डमध्ये दिल्या जातील. सीसीआयच्या नियमांनुसार क्लबच्या सर्व सदस्यांना ब्रेबॉर्नवर होणारे सर्व सामने मोफत पाहता येऊ शकतात. असे असताना मोदी यांनी ठेवलेल्या प्रस्तावामुळे सदस्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे यावेळेस दोन्ही बाजूंकडून मध्यममार्ग काढण्यात येण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सकडून दोन उपान्त्य फेरीच्या सामन्यांचे आयोजन केले गेले होते तर अंतिम सामना मुंबईत खेळविण्याचा विचार करण्यात आला होता, पण अखेरीस हा सामना डी.व्हाय. पाटील स्टेडियमवर नवी मुंबईत झाला.