Leading International Marathi News Daily
रविवार , ८ मार्च २००९
विविध

गांधीजींच्या वस्तू भारतात आल्या यातच समाधान!
न्यूयॉर्क, ७ मार्च/वृत्तसंस्था

महात्मा गांधींच्या वापरातील वस्तू भारतातील मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी तब्बल सव्वानऊ कोटी रुपये मोजून विकत घेतल्या. पण या व्यवहारामुळे या वस्तूंचा लिलाव करणाऱ्या ‘अँटीकोरम ऑक्शनीअर्स’ या कंपनीलाही तब्बल दीड कोटी रुपयांचे कमिशन मिळाले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल भारतीयांमध्ये केवळ दिवंगत नेता एवढीच भावना नाही. आपल्या घरातीलच जागतिक कीर्तीचा एक महान माणूस अशी ती भावना असते. त्यामुळे गांधीजींच्या नित्य वापरातील वस्तूंचा लिलाव होत असल्याचे जाहीर झाल्यावर समस्त भारतीयांच्या मनाला लाख इंगळ्या डसल्याची वेदना झाली होती. हा लिलाव थांबावा यासाठी देशभरातून प्रयत्न झाले होते. या दबावाची दखल घेत या वस्तू ज्यांच्या ताब्यात होत्या त्या जेम्स ओटीस यांनी अखेर लिलावातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु तोवर बराच उशीर झाला होता.

अमेरिकेचे हल्लेखोर ‘ड्रोन’ तालिबान्यांनी पाडले?
इस्लामाबाद, ७ मार्च/पी.टी.आय.

पाकिस्तानच्या दक्षिण वझिरीस्तानमध्ये आज अमेरिकेच्या मानवविरहित हल्लेखोर विमान (ड्रोन) तालिबान्यांनी पाडल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. दक्षिण वझिरीस्तानातील अंगूर अड्डा विभागात हे ‘ड्रोन’ तालिबानने पाडले. तत्पूर्वी या ड्रोनमधून काही भागांवर हल्ले झाल्याचेही स्थानिक रहिवाशांनी सांगितले. हे ‘ड्रोन’ जमिनीच्या अगदी जवळून जात असल्यामुळे, तालिबान्यांच्या कचाटय़ात सापडू शकले. त्याचे अवशेष हस्तगत करण्यासाठी प्रशासनाने शोध पथके पाठवली आहेत. दरम्यान, अमेरिकेचे ‘ड्रोन’ विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी वृत्त वाहिन्यांना दिली. तालिबान्यांनी हे ड्रोन पाडले, की त्यातील बिघाडामुळे कोसळले याची चौकशी अजून सुरू असल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकारी अथार अब्बास यांनी सांगितले.

जगाने पाकिस्तानबाबत आशा सोडू नये - बिलावल भुत्तो
इस्लामाबाद, ७ मार्च /पी. टी. आय.

श्रीलंका क्रिकेट संघावर झालेल्या धक्कादायक दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर जगभरात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांबाबत सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष व दिवंगत बेनझीर भुत्तो यांचे पुत्र बिलावल भुत्तो झरदारी यांनी जगाने पाकिस्तानबाबत आशा सोडू नये असे सांगून पाकिस्तान सध्या कठीण काळातून जात असल्याचे सांगितले. व्हिएन्ना येथे वार्षिक जागतिक महिला पुरस्कार प्रदान समारंभामध्ये बिलावल भुत्तो बोलत होते. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानबाबत आशा सोडून देऊ नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पाकिस्तानमधील हा दहशतवादी हल्ला अतिशय धक्कादाययक असून तो आमच्या समाजालाच हादरा देणारा आहे. जगात आपले अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात संघर्ष करीत असलेले आमचे राष्ट्र हे एक तरुण राष्ट्र असून माझ्या आईचे बेनझीर भुत्तोंचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करीत आहोत. इश्वराचीही हीच इच्छा आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या दिवंगत अध्यक्षा बेनझीर भुत्तो यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार या समारंभात अनिभनेत्री क्लॅडिया कार्डिनेल यांना प्रदान करण्यात आला. आपल्या आईच्या नावे दिला जाणाऱ्या या पुरस्कारामुळे पाकिस्तानचाच गौरव केला गेला असल्याचे सांगून बिलावल यांनी सध्या पाकिस्तान कठीण परिस्थितीला तोंड देत आहे, असे सांगितले.

दोन दलितांची हत्या
शंकरनकोईल, ७ मार्च/पी.टी.आय.

तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्य़ातील मुप्पीडती अम्माम येथे दोन दलितांची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. दलितांनी गावातील मंदिरात दर्शन घेतल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. के. परमशिवन (वय २७) हा तरुण काल रात्री आपल्या घराकडे निघाला असता अज्ञात व्यक्तींनी हल्ला चढवून त्याला ठार मारले. ई. ईश्वरन (५५) नावाच्या व्यक्तीची दुसऱ्या घटनेत हत्या करण्यात आली. या गावातील कोनार समाजाच्या मंदिरात दर्शनास प्रवेश देण्यावरून गेल्या वर्षभरापासून वाद सुरू आहे.

बिजद-भाजपमधील युती संपुष्टात
भुवनेश्वर, ७ मार्च/पी.टी.आय.

ओरिसामध्ये लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी बिजू जनता दल आणि भाजपामध्ये जागावाटपाची बोलणी अखेर अयशस्वी होऊन तेथे या पक्षांमधील युती संपुष्टात आल्याचे वृत्त आहे. या दोन्ही पक्षांमध्ये सहकार्याचा करार झाल्यानंतर २००० आणि २००४ मध्ये निवडणुका त्यांनी एकत्र लढविल्या होत्या. पण आता मागील आठ वर्षांंमधील युती अचानक संपुष्टात आली आहे. ओरिसामध्ये विधानसभेच्या १४७ जागा असून २१ लोकसभेच्या जागा आहेत. त्यामध्ये भाजपाने मोठय़ा संख्येने जागा मागितल्या होत्या. राज्यात घेतलेल्या एका सर्वेक्षण अहवालानुसार विधानसभेच्या ६३ जागांवर आणि लोकसभेच्या नऊ जागांवर भाजपाचे उमेदवार हरण्याचा धोका असल्यामुळे मुख्यमंत्री नवीन पटनायक भाजपाला पूर्वीच्या फॉम्र्युलाप्रमाणे जागा देण्यास तयार नव्हते. भाजपा नेते मात्र आपल्या मागणीवर हटून बसले होते. अखेरचा उपाय म्हणून भाजपाचे राज्यसभेतील खासदार आणि लालकृष्ण अडवाणी यांचे विश्वासू चंदन मित्रा यांना बिजदबरोबर चर्चेसाठी धाडण्यात आले. पण नवीन पटनायक यांचे मन मित्राही वळवू न शकल्याचे सिध्द झाले आहे.